Marathi बायबल

स्तोत्रसंहिता total 150 अध्याय

स्तोत्रसंहिता

स्तोत्रसंहिता धडा 119
स्तोत्रसंहिता धडा 119

देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र आलेफ 1 ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत.

2 जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.

3 ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.

स्तोत्रसंहिता धडा 119

4 तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.

5 मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.

6 मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.

स्तोत्रसंहिता धडा 119

7 मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.

8 मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.

बेथ 9 तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.

स्तोत्रसंहिता धडा 119

10 मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.

11 मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.

12 हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव.

13 मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.

स्तोत्रसंहिता धडा 119

14 तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.

15 मी तुझ्या नियमांचे मनन करीन, आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.

16 मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.

स्तोत्रसंहिता धडा 119

गीमेल 17 आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे.

18 माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.

19 मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.

स्तोत्रसंहिता धडा 119

20 तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे.

21 तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.

22 माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

23 अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.

24 तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत.

दालेथ 25 माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.

स्तोत्रसंहिता धडा 119

26 मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव.

27 मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे.

28 माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.

स्तोत्रसंहिता धडा 119

29 असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव.

30 मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.

31 मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.

स्तोत्रसंहिता धडा 119

32 मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.

हे 33 हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.

34 मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.

स्तोत्रसंहिता धडा 119

35 तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.

36 माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.

37 निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.

स्तोत्रसंहिता धडा 119

38 तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.

39 ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.

40 पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.

स्तोत्रसंहिता धडा 119

वाव 41 हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.

42 जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.

43 तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.

स्तोत्रसंहिता धडा 119

44 मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.

45 मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.

46 मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.

47 मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.

स्तोत्रसंहिता धडा 119

48 ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.

जायिन 49 तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.

50 माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;

स्तोत्रसंहिता धडा 119

51 गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.

52 हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो.

53 दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो.

स्तोत्रसंहिता धडा 119

54 ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत.

55 हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.

56 हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.

खेथ 57 परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

58 मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;

59 मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.

60 मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही.

स्तोत्रसंहिता धडा 119

61 दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.

62 मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.

63 तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

64 हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.

ठेथ 65 हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.

66 योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

67 पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.

68 तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.

69 गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.

70 त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

71 मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.

72 सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.

योद 73 तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.

स्तोत्रसंहिता धडा 119

74 तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.

75 हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.

76 तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.

स्तोत्रसंहिता धडा 119

77 मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.

78 गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;

79 तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.

स्तोत्रसंहिता धडा 119

80 मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.

काफ 81 मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.

82 माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील?

स्तोत्रसंहिता धडा 119

83 कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.

84 तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?

85 गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

86 तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.

87 त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.

88 तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.

स्तोत्रसंहिता धडा 119

लामेद 89 हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.

90 तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.

91 त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.

स्तोत्रसंहिता धडा 119

92 जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.

93 मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.

94 मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.

स्तोत्रसंहिता धडा 119

95 दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.

96 प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.

मेम 97 अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.

स्तोत्रसंहिता धडा 119

98 तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.

99 माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.

100 वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो.

स्तोत्रसंहिता धडा 119

101 तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे.

102 मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.

103 तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.

स्तोत्रसंहिता धडा 119

104 तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.

नून 105 तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.

106 तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

107 मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.

108 हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.

109 माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता धडा 119

110 दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.

111 तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.

112 तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

सामेख 113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.

114 मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

115 वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.

स्तोत्रसंहिता धडा 119

116 तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.

117 मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.

118 तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.

स्तोत्रसंहिता धडा 119

119 पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.

120 तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.

ऐन 121 मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.

स्तोत्रसंहिता धडा 119

122 तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.

123 तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.

124 तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.

स्तोत्रसंहिता धडा 119

125 मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.

126 ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.

127 खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.

स्तोत्रसंहिता धडा 119

128 यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.

पे 129 तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.

130 तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.

स्तोत्रसंहिता धडा 119

131 मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.

132 तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.

133 तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.

स्तोत्रसंहिता धडा 119

134 मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.

135 तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.

त्सादे 136 माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.

स्तोत्रसंहिता धडा 119

137 हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.

138 तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.

139 रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.

140 तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

141 मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.

142 तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.

143 मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.

144 तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.

स्तोत्रसंहिता धडा 119

कोफ 145 मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.

146 मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.

147 मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

148 तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.

149 तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.

150 जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.

स्तोत्रसंहिता धडा 119

151 हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.

152 तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.

रेश 153 माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता धडा 119

154 तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.

155 दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.

156 हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.

स्तोत्रसंहिता धडा 119

157 मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.

158 विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.

159 तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव.

स्तोत्रसंहिता धडा 119

160 तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.

शीन 161 अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.

162 ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.

स्तोत्रसंहिता धडा 119

163 मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.

164 मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.

165 तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.

स्तोत्रसंहिता धडा 119

166 हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.

167 मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.

168 मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

ताव 169 हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.

170 माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.

171 तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.

स्तोत्रसंहिता धडा 119

172 माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.

173 तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.

174 हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.

स्तोत्रसंहिता धडा 119

175 माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो.

176 मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.