Marathi बायबल

अनुवाद total 34 अध्याय

अनुवाद

अनुवाद धडा 28
अनुवाद धडा 28

1 “आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.

2 तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकलेत तर तुम्हांला हे आशीर्वाद मिळतील:

3 “तुम्हाला तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील.

4 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील.

अनुवाद धडा 28

5 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने सदोदित भरलेल्या राहतील.

6 तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला सदासर्वकाळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल.

7 “तुमच्यावर चाल करुन येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हाला परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी सैरावैरा पळत सुटेल.

अनुवाद धडा 28

8 “परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात तुमची भरभराट होईल.

9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करुन घेईल.

10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रातील लोकांना तुमचा धाक वाटेल.

अनुवाद धडा 28

11 “परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हाला भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल.

12 आपले आशीर्वादाचे भांडार तो तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही.

13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा.

अनुवाद धडा 28

14 या शिकवणीपासून परावृत होऊ नका. डावी उजवी कडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका.

15 “पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.

16 “नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल.

17 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.

अनुवाद धडा 28

18 परमेश्वराच्या शापाने तुम्हाला फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे - करडे शापित होतील.

19 बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हाला शाप देईल.

20 “तुम्ही दुष्कृत्ये करुन परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अडचणी येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलित होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल.

अनुवाद धडा 28

21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हाला भयंकर रोगराईने ग्रस्त करील.

22 परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.

23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल.

अनुवाद धडा 28

24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.

25 “शत्रू तुम्हांला पराभूत करतील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.

26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्र्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.

अनुवाद धडा 28

27 “परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हांला शासन करील.

28 वेड, अंधत्व, भांबावलेपण यांनी तुम्ही ग्रस्त व्हाल.

29 भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हाला एकसारखे नागवतील, दुखावतील. आणि तुम्हाला कोणी त्राता राहणार नाही.

अनुवाद धडा 28

30 “तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.

31 लोक तुमच्यादेखत तुमच्या गायी कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्या मेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा नाही.

अनुवाद धडा 28

32 “तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसामागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील. पण ती सापडणार नाहीत. आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.

33 “तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील.

34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल.

अनुवाद धडा 28

35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हाला शासन करील.

36 “तुम्ही तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठ पाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल.

37 तुमच्यावर येणारी संकटे पाहून तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा तुम्ही विषय व्हाल.

अनुवाद धडा 28

38 “तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.

39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यात खूप मेहनत कराल. पण द्राक्षं किंवा द्राक्षारस तुम्हाला मिळणार नाही. कारण कीड ते खाऊन टाकील.

40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण फळ जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील.

अनुवाद धडा 28

41 तुम्हाला मुलं-बाळं होतील पण ती तुम्हाला लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल.

42 टोळधाडीने तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होईल.

43 तुमच्या गावात राहाणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल.

44 ते तुम्हाला कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून राहाल.

अनुवाद धडा 28

45 “तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही तर हे सर्वशाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील.

46 तुम्हाला व तुमच्या वंशजांना हे परमेश्वराचे शाप कायमचे भोवतील. ते पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील.

47 “सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून

अनुवाद धडा 28

48 परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल.

49 “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.

अनुवाद धडा 28

50 ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत.

51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही.

52 “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.

अनुवाद धडा 28

53 “तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.

54 “तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत.

अनुवाद धडा 28

55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही-अगदी आपल्या घरातल्यांनाही-वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.

56 “तुमच्यामधील अतिशय कोमल ह्दयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.

अनुवाद धडा 28

57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.

58 “या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि विस्मयकारी तुमचा देव परमेश्वर ह्याचा आदर करा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर

अनुवाद धडा 28

59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर संकटे कोसळतील, भयंकर रोगराई पसरेल.

60 अशा रोगराईला आणि उपद्रावांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हाला धास्ती वाटत असे. त्या सगळ्यातून तुम्हाला पुन्हा जावे लागेल.

61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील.

62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक राहाल.

अनुवाद धडा 28

63 “तुमची भरभराट करायला आणि तुमची संरव्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसानळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल.

64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.

अनुवाद धडा 28

65 “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल.

66 तुम्ही नेहमी संकटग्रस्त आणि धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची खात्री वाटणार नाही. रात्रंदिवस तुम्ही झुरणीला लागाल.

67 सकाळी तुम्ही म्हणाल, ‘ही रात्र असती तर बरे! आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे!’ तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.

अनुवाद धडा 28

68 परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूंचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.