Marathi बायबल
उत्पत्ति total 50 अध्याय
उत्पत्ति धडा 21
1 परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले.
2 सारा गरोदर राहिली आणि अब्राहामाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या.
3 अब्राहामापासून साराला मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले.
4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहामाने इसहाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता केली.
उत्पत्ति धडा 21
5 इसहाक जन्मला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
6 आणि सारा म्हणाली, “परमेश्वर देवाने मला हास्य म्हणजे आनंदीआनंद दिला आहे. ज्या कोणाला हे समजेल त्या प्रत्येकाला माइयाबरोबर आनंद होईल.
7 मला आता ह्या वयात अब्राहामापासून मूल होईल असे कोणाला वाटले असते काय? परंतु अब्राहाम म्हातारा झाला असताना देखील मी त्यास मुलगा दिला आहे.”
उत्पत्ति धडा 21
8 इसहाक वाढत राहिला, तो दुधाऐवजी जेवण घेण्याइतक्या वयाचा झाला तेव्हा त्याचे दूध तोडण्याच्या प्रसंगी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
9 ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता.
10 तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी व तुमचा वारस होणार नाही.”
उत्पत्ति धडा 21
11 ह्या गोष्टीमुळे अब्राहामाला वाईट वाटले व त्याला इश्माएलाची चिंता वाटू लागली;
12 परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “त्या मुलाबद्दल बिलकूल चिंता करु नकोस, तसेच त्या दासीचीही चिंता करु नकोस. साराच्या इच्छेप्रमाणे कर. इसहाकच तुझा एकटाच वारस होईल.
13 परंतु मी त्या दासीच्या मुलालाही आशीर्वाद देईन; तो तुझा मुलगा आहे म्हणून त्याच्या कुटुंबांपासूनही मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
उत्पत्ति धडा 21
14 दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.
15 काही वेळाने पिशवीतील सर्व पाणी संपले, एक थेंबही पिण्यासाठी राहिला नाही; तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली ठेवले;
16 आणि तेथून काही अंतर ती चालून गेली व थांबून तेथे बसली. आपला मुलगा पाण्यावाचून मरेल असे तिला वाटले; त्याचा मृत्यू आपल्याला पाहवणार नाही असे समजून ती तेथे दूर अंतरावर बसली, व हंबरडा फोडून रडू लागली.
उत्पत्ति धडा 21
17 देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला; आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारुन म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस; तुझ्या मुलाचे रडणे परमेश्वराने ऐकले आहे
18 ऊठ मुलाला उचलून घे; त्याचा हात धर व त्याला घेऊन पुढे चल; मी त्याच्या पासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
19 मग देवाने हागारेला पाण्याची विहीर दिसू दिली. तेव्हा हागार त्या विहिरीपाशी गेली आणि तिने मसक पाण्याने भरली, नंतर आपल्या तहानलेल्या मुलाला तिने पाणी पाजिले.
उत्पत्ति धडा 21
20 तो मुलगा वाढत असताना देव सतत त्याच्याबरोबर राहिला; इश्माएल वाळवंटात लहानाचा मोठा होऊन शिकारी झाला; तो धनुष्यबाण मारावयास शिकला व तरबेज तिरंदाज झाला;
21 नंतर त्याच्या आईने त्याला मिसर देशातील मुलगी बायको करुन दिली. ते पारानच्या वाळवंटात राहिले.
22 त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापति पीकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली; ते अब्राहामास म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात देव तुझ्याबरोबर असतो;
उत्पत्ति धडा 21
23 तेव्हा आता देवासमोर येथे मला वचन दे की तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या संतानाशी न्यायनीतीने वागशील असा माझ्याशी करार कर; तू माझ्याशी व ज्या ह्या माझ्या देशात तू राहिलास त्या देशाशी दयाळूपणे राहशील, असे वचन दे, तसेच मी जसा तुझ्याशी दयाळूपणाने वागलो तसाच तूही माझ्याशी दयाळूपणाने राहशील असे वचन तू मला दे, व असा करार तू माझ्याशी कर.”
24 आणि अब्राहाम म्हणाला, “मी असे वचन देतो की जसा तू माझ्याशी दयाळूपणे वागलास तसाच मी ही तुझ्याशी वागेन.”
उत्पत्ति धडा 21
25 मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.
26 परंतु अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्या पूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस”
27 अशा रीतीने अब्राहाम व अबीमलेख यांनी आपसात करार केला. अब्राहामाने अबीमलेखाला काही मेंढरे व बैल, कराराचा पुरावा म्हणून दिले;
उत्पत्ति धडा 21
28 अब्राहामाने अबीमलेखा पुढे मेंढ्याच्या सात माद्या ठेवल्या.
29 अबीमलेखाने अब्राहामाला विचारले, “या सात मेंढ्या तू अशा बाजूला का काढल्यास?”
30 अब्राहामाने उत्तर दिले, “जेव्हा तू ह्या मेंढया माझ्याकडून स्वीकारशील तेव्हा ही विहीर मी खाणली असा तो पुरावा होईल.”
31 तेव्हा त्यानंतर त्या विहिरीला बैर - शेबा असे नाव पडले, कारण त्या ठिकाणी अब्राहाम व अबीमलेख यांनी एकमेकांना वचन देऊन करार केला.
उत्पत्ति धडा 21
32 त्यांनी बैर शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
33 (33-34) अब्राहामाने बैर - शेबा येथे एक विशेष प्रकारचे झाड लावले, आणि त्याच जागी, जो निरंतर राहतो अशा परमेश्वराची प्रार्थना केली; आणि तो बराच काळ पलिष्ट्यांच्या देशात राहिला.
34