1. ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमात ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे.
2. आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो.
3. याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो.
4. आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते.
5. आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंत:करणात देवाची प्रीति ओतली आहे.
6. आम्ही जेव्हा आमचे स्वत:चे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला.
7. आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील.
8. परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.
9. तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत.
10. आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील.
11. इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो. आदाम आणि ख्रिस्त
12. म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे, जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले.
13. नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते. परंतु नियमशास्त्र नमल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते.
14. परंतु मरणाने आदामाच्या काळपासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही, त्याच्यांवरसुद्धा मरणाने राज्य केले. देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला आदाम, ख्रिस्त जो येणार होता, त्याचे प्रतिरुप आहे.
15. पण देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही. कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान, एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आली व विशेषेकरुन सर्व लोकांकरिता विपुल झाली.
16. आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापांनंतर आली आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले.
17. एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले. पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे, ते अनुभवतात, ते विशेषेकरुन येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील.
18. म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले.
19. यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल.
20. पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली.
21. अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, त्याच रीतीने देवाची कृपाही, नीतिमत्वाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे अनंतकाळच्या जीवनसाठी राज्य करील.