1. परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
2. दावीदाने परमेश्वराला वचन दिले. दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
3. दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही. मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही. मी झोपणार नाही.
4. माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
5. मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी, याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”
6. आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले. आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
7. आपण पवित्र तंबूत जाऊ. या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
8. परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
9. परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत. तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
10. तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी, निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
11. परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
12. परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
13. परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला. त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
14. परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील, मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
15. मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन. गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.
16. मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
17. मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन. मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
18. मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”