नहेम्या 4 : 1 (MRV)
आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटच्या कानावर गेले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
नहेम्या 4 : 2 (MRV)
सनबल्लटने आपले मित्र आणि शोमरोन येथील सैन्य यांच्याशी बातचीत केली. तो म्हणाला, “हे दुबळे यहुदी करताहेत तरी काय? आपण त्यांची गय करु असे त्यांना वाटते? आपण यज्ञ करु असे त्यांना वाटते की काय? अगदी एका दिवसात आपण सगळे बांधकाम पुरे करु असे त्यांना वाटत असावे. या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करु शकणार नाहीत. ते निव्वळ राखेचे आणि उकिरड्याचे ढीग आहेत.”
नहेम्या 4 : 3 (MRV)
तोबीया अम्मोनीची सनबल्लटला साथ होती. तोबीया म्हणाला, “यहूद्यांनी हे कसले बांधकाम आरंभले आहे? एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो हा दगडी कोट पाडून टाकील.”
नहेम्या 4 : 4 (MRV)
नहेम्याने देवाची प्रार्थना केली. तो म्हणाला, “आमच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. हे लोक आमचा तिरस्कार करतात. सनबल्लट आणि तोबीया आमचा अपमान करत आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्यावरच उलटव. त्यांना लाजिरवाणे कर. त्यांना निर्वासित अवस्थेत कैदी कर.
नहेम्या 4 : 5 (MRV)
त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयादेखत केलेल्या पापांना क्षमा करु नकोस. त्यांनी बांधकाम करणाऱ्यांचा अपमान केला आहे. आणि त्यांना नाउमेद केले आहे.”
नहेम्या 4 : 6 (MRV)
यरुशलेमचा कोट आम्ही बांधला. पूर्ण नगराभोवती तटबंदी बांधून काढली. पण तिची उंची असायला हवी त्यापेक्षा निम्मीच होती. लोकांनी मनापासून काम केले म्हणून आम्ही एवढे केले.
नहेम्या 4 : 7 (MRV)
पण सनबल्लट तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
नहेम्या 4 : 8 (MRV)
तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन यरुशलेम विरुध्द हल्ला करण्याचा कट केला. यरुशलेममध्ये गोंधळ उडवायचा त्यांनी बेत केला. शहरावर चाल करून येऊन हल्ला करायचे त्यांनी ठरवले.
नहेम्या 4 : 9 (MRV)
पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
नहेम्या 4 : 10 (MRV)
आणि त्यावेळी यहुदी लोक म्हणाले, “बांधकामावरचे लोक थकत चालले आहेत. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा माजला आहे. कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.
नहेम्या 4 : 11 (MRV)
आणि आपले शत्रू म्हणताहेत, “यहुदींना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आपण त्यांच्यात शिरकाव केलेला असेल. आपण त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”’
नहेम्या 4 : 12 (MRV)
मग आमच्या शत्रूंच्या मध्ये राहणारे जे यहुदी लोक होते त्यांनी आम्हाला पुढील गोष्ट दहादा सांगितली, “आपल्या शत्रूने आम्हाला चहूबाजूंनी वेढले आहे. पाहावे तिकडे तेच आहेत.”
नहेम्या 4 : 13 (MRV)
तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काही जणांना ठेवले. भिंतीतील भगदाडांजवळ त्याना ठेवले. आपापल्या तलवारी, भाले आणि धनुष्यांसह कुटुंबेच मी नेमली.
नहेम्या 4 : 14 (MRV)
सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूची धास्ती बाळगू नका. लक्षात ठेवा, आमचा प्रभु, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद मुलगे, मुली यांच्याकरता तुम्ही लढा दिला पाहिजे, आपल्या बायका आणि घरेदारे यांच्यासाठी लढले पाहिजे.”
नहेम्या 4 : 15 (MRV)
आपले बेत आम्हाला कळून चुकले आहेत हे मग आमच्या शत्रूंनी ऐकले. देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आल्या वाटचे काम करु लागला.
नहेम्या 4 : 16 (MRV)
त्या दिवसापासून माझ्याकडची निम्मी माणसे तटबंदीचे काम करत होती. आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, चिलखत यासह राखणीला सज्ज होते. भिंतीचे बांधकाम करणाऱ्या सर्व यहुदी लोकांच्या पाठीमागे सैन्यातील अधिकारी उभे होते.
नहेम्या 4 : 17 (MRV)
बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.
नहेम्या 4 : 18 (MRV)
तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इषाऱ्याचे रणशिंग वाजवणारा माणूस माझ्या शेजारीच होता.
नहेम्या 4 : 19 (MRV)
मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.
नहेम्या 4 : 20 (MRV)
तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे आपण एकत्रगोळा होऊ आणि देवच आपल्यासाठी लढेल.”
नहेम्या 4 : 21 (MRV)
तेव्हा आम्ही यरुशलेमच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्ध्या लोकांजवळ भाले होते. पहाट उजडल्यापासून ते थेट रात्री आकाशात चांदण्या दिसू लागेपर्यंत आम्ही काम करत होतो.
नहेम्या 4 : 22 (MRV)
त्यावेळी मी लोकांना असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरुशलेमच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”
नहेम्या 4 : 23 (MRV)
तेव्हा आमच्यापैकी कोणीही अंगावरचे कपडे उतरवले नाहीत. मी, माझे भाऊ, माझी माणसे, आणि राखणदार यांच्यापैकी कोणीही नाही. सदा सर्वकाळआम्ही सर्वजण शस्त्रसज्ज होतो-अगदी पाणवठ्यावर जात असू तेव्हा ही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23