यिर्मया 2 : 1 (MRV)
1 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता:
यिर्मया 2 : 2 (MRV)
2 “यिर्मया, जा आणि यरुशलेममधील लोकांशी बोल. त्यांना सांग:“तुमचे राष्ट्र तरुण होते त्या वेळी तुम्ही माझ्याशी निष्ठावंत होता. नववधूप्रमाणे तुम्ही मला अनुसरलात. तुम्ही वाळवंटातून आणि पडिक जमिनीतून माझ्या मागे आलात.
यिर्मया 2 : 3 (MRV)
3 इस्राएलचे लोक म्हणजे परमेश्वराला मिळालेली पवित्र देणगी होती. परमेश्वराने तोडलेले ते पहिले फळ होते. त्यांना दुखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला अपराधी ठरविले गेले. त्या पापी लोकांचे वाईट झाले.”‘ हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
यिर्मया 2 : 4 (MRV)
4 याकोबच्या वंशजांनो, इस्राएलमधल्या कुळांनो, परमेश्वराचा संदेश ऐका.
यिर्मया 2 : 5 (MRV)
5 परमेश्वर असे म्हणतो: “मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का? म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का? त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना पूजले व स्वत: कवडीमोल झाले.
यिर्मया 2 : 6 (MRV)
6 तुमचे पूर्वज असे म्हणाले नाहीत ‘परमेश्वराने आम्हाला मिसरहून आणले. परमेश्वराने आम्हाला वाळवंटातून पार नेले. त्यानेच आम्हाला ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून बाहेर नेले. काळोख व धोका असलेल्या, निर्जन, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून देवाने आम्हाला पार केले. तो परमेश्वर आता कोठे आहे?”
यिर्मया 2 : 7 (MRV)
7 परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेल्या उत्तम प्रदेशात आणले. तुम्हाला तेथे पिकणारी फळे व धान्य खायला मिळावे म्हणून मी हे केले. पण तुम्ही माझी ही भूमी ‘गलिच्छ’ केली. मी तुम्हाला दिलेली ही भूमी तुम्ही खराब केली.
यिर्मया 2 : 8 (MRV)
8 “याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. कायदा जाणणाऱ्यांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. इस्राएलचे नेते माझ्याविरुद्ध गेले. संदेष्ट्यांनी खोटा देव बआल याच्या नावे भविष्य वर्तविले. त्यांनी निरुपयोगी मूर्तीची पूजा केली.”
यिर्मया 2 : 9 (MRV)
9 परमेश्वर म्हणतो, “म्हणून आता मी तुम्हाला पुन्हा दोषी ठरवीन आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन.
यिर्मया 2 : 10 (MRV)
10 समुद्र पार करुन कित्ती बेटावर जा. कोणाला तरी केदारला पाठवा. लक्षपूर्वक पाहा. कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!
यिर्मया 2 : 11 (MRV)
11 कोणत्या राष्ट्राने, नवीन दैवतांची पूजा करायची म्हणून, जुन्या, दैवतांना पूजायचे थांबविले आहे का? नाही. आणि त्यांचे दैवत मुळी देवच नाही. पण माझ्या लोकांनी त्यांच्या तेजस्वी देवाची पूजा करायचे सोडून कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा करणे सुरु केले.
यिर्मया 2 : 12 (MRV)
12 “आकाशा, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्र्चर्याचा धक्का बसू दे. भीतीने थरथर काप.” हा परमेश्वराचा संदेश होता.
यिर्मया 2 : 13 (MRV)
13 “माझ्या लोकांनी दोन पापे केली. ते माझ्यापासून दूर गेले. (मी जिवंत पाण्याचा झरा आहे.) आणि त्यांनी स्वत:ची पाण्याची टाकी खोदली. (ते दैवंताकडे वळले.) पण ती टाकी फुटली आहे. त्यात पाणी राहू शकत नाही.
यिर्मया 2 : 14 (MRV)
14 “इस्राएलचे लोक गुलाम झाले आहेत का? गुलाम म्हणूनच जन्माला आलेल्या माणसाप्रमाणे ते आहेत का?इस्राएलची संपत्ती लोकांनी का लुटली?
यिर्मया 2 : 15 (MRV)
15 तरुण सिंह (शत्रू) इस्राएलकडे बघून डरकाळ्या फोडतात व गुरगुरतात. त्यांनी इस्राएलचा नाश केला. इस्राएलमधील शहरे जाळली गेली आहेत. तेथे कोणीही मागे उरले नाही.
यिर्मया 2 : 16 (MRV)
16 नोफ (मंमेफिस) आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे.
यिर्मया 2 : 17 (MRV)
17 तुमच्याच चुकीने हे संकट आले आहे. परमेश्वर तुमचा देव तुम्हाला योग्य मार्गाने नेत होता. पण तुम्हीच उलटे फिरलात.
यिर्मया 2 : 18 (MRV)
18 यहूदातील लोकांनो, पुढील गोष्टींचा विचार करा. मिसरला जाण्याने काही फायदा झाला का? शिहोराचे (नील नदीचे) पाणी पिण्याने काही लाभ झाला का? नाही. अश्शूरला जाण्याने आणि मोठ्या नदीचे (फरात नदीचे) पाणी पिण्याने काही मदत झाली का? नाही.
यिर्मया 2 : 19 (MRV)
19 तुम्ही दुष्कृत्ये केली. त्यामुळे तुम्हाला फक्त शिक्षा मिळेल. तुमच्यावर संकट येईल. मग तुम्हाला समजेल की देवापासून दूर जाणे कीती वाईट आहे! मला न घाबरणे व मान न देणे हे चूक आहे.” माझा प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचा, हा संदेश होता.
यिर्मया 2 : 20 (MRV)
20 “यहूदा, फार वर्षांपूर्वी तू तुझे जोखड दूर फेकलेस. मी तुझ्यावर नियंत्रण ठेवत होतो ती बंधने तोडलीस. तू मला म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’ प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील वारांगनेप्रमाणे तू झालीस.
यिर्मया 2 : 21 (MRV)
21 यहूदा, मी खास वेल म्हणून तुला लावले. तुम्ही सर्वजण उत्तम बीजाप्रमाणे होता. मग वाईट फळे देणाऱ्या वेलीत तुझे रुपांतर कसे झाले?
यिर्मया 2 : 22 (MRV)
22 जरी तू स्वत:ला खारान धुतलेस, खूप साबण लावलास, तरी मला तुझ्या अपराधाचा डाग दिसू शकेल.” हा परमेश्वर देवाकडून आलेला संदेश होता.
यिर्मया 2 : 23 (MRV)
23 “यहूदा, ‘मी अपराधी नाही. मी बआलदैवताच्या मूर्तीची पूजा केली नाही’ असे तू मला कसे म्हणू शकतेस? तू दरीमध्ये केलेल्या गोष्टींचा विचार कर. तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.
यिर्मया 2 : 24 (MRV)
24 तू वाळवंटात राहणाऱ्या रानगाढवीप्रमाणे आहेस. समागमाच्या काळात ती वारा हुंगते. ती माजावर असताना कोणीही तिला परत आणू शकत नाही. त्या काळात ज्याला पाहिजे त्या नराला ती मिळू शकते. तिला मिळविणे सोपे असते.
यिर्मया 2 : 25 (MRV)
25 यहूदा, मूर्तीमागे धावण्याचे थांबव. त्या दैवतांची लागलेली तहान आता पुरे़. पण तू म्हणतेस, ‘त्याचा काही उपयोग नाही. मी त्यांना सोडू शकत नाही. मला ते दैवत आवडतात. मला त्यांना अनुसरायचे आहे.’
यिर्मया 2 : 26 (MRV)
26 “चोराला लोकांनी पकडताच तो शरमिंदा होतो. त्याचप्रमाणे इस्राएलचे लोक झाले आहेत. राजे आणि नेते, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.
यिर्मया 2 : 27 (MRV)
27 ते लाकडाच्या तुकड्याशी बोलतात त्याला ‘माझे वडील’ म्हणतात. ते खडकाशी बोलतात. ते म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्या सर्व लोकांना शरमेने मान खाली घालायला लागतील. ते लोक माझ्याकडे पाहत नाहीत. त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे. पण जेव्हा यहूदातील लोक संकटात सापडतात, तेव्हा ते मला म्हणतात, ‘ये आणि आम्हाला वाचव.’
यिर्मया 2 : 28 (MRV)
28 त्या मूर्तींना येऊ देत आणि तुम्हाला वाचवू देत. तुम्ही स्वत: घडविलेल्या त्या मूर्ती कोठे आहेत? तुम्ही संकटात असताना त्या मूर्ती येऊन तुम्हाला सोडवितात का ते पाहू या. यहूदा, तुला तुझ्या शहरांइतक्या मूर्ती आहेत!
यिर्मया 2 : 29 (MRV)
29 “तुम्ही माझ्याशी वाद का घालता? तुम्ही सर्व माझ्याविरुद्ध गेलात.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
यिर्मया 2 : 30 (MRV)
30 “यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला शिक्षा केली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. तुम्हाला शिक्षा झाल्यावरही तुम्ही परत आला नाहीत तुमच्याकडे आलेल्या संदेष्ट्यांना तुम्ही तलवारीने मारले. तुम्ही धोकादायक सिंहासारखे होता. तुम्ही संदेष्ट्यांना ठार मारले.”
यिर्मया 2 : 31 (MRV)
31 ह्या पिढीतील लोकांनो, परमेश्वराच्या संदेशाकडे लक्ष द्या. “इस्राएलच्या लोकांना मी वाळवंटासारखा आहे का? मी काळोखी आणि धोकादायक प्रदेशासारखा त्यांना वाटतो का? माझे लोक म्हणतात, ‘आमच्या मार्गाने जायला आम्ही स्वतंत्र आहोत. परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे परत येणार नाही.’ ते असे का म्हणतात.?
यिर्मया 2 : 32 (MRV)
32 तरुण स्त्री आपले दागिने विसरत नाही. वधू आपला कमरपट्ठा विसरत नाही. पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.
यिर्मया 2 : 33 (MRV)
33 “यहूदा, प्रियकरांच्या (खोट्या देवांच्या) पाठलाग कसा करायचा हे तुला बरोबर माहीत आहे. दुष्कृत्ये करायला खरोखरच तू शिकली आहेस.
यिर्मया 2 : 34 (MRV)
34 तुझ्या हातांना रक्त लागले आहे. ते रक्त गरीब व निष्पाप माणसांचे आहे. तुझे घर फोडताना तू त्यांना पकडले नाहीस. तू कारण नसताना त्यांना ठार मारलेस.
यिर्मया 2 : 35 (MRV)
35 पण तरी तू म्हणतेस, ‘मी निरपराध आहे. परमेश्वर माझ्यावर रागावलेला नाही.’ मी तुला खोटे बोलल्याबद्दलही दोषी ठरवीन. का? कराण तू म्हणतेस, ‘मी काहीही चूक केलेली नाही.’
यिर्मया 2 : 36 (MRV)
36 मन बदलणे तुला अगदी सोपे आहे. अश्शूरने तुझी निराशा केली, म्हणून तू अश्शूरला सोडले आणि मदतीसाठी तू मिसरला गेलीस. पण मिसरसुध्दा तुझी निराशा करील.
यिर्मया 2 : 37 (MRV)
37 मग अखेरीला तुला मिसरलाही सोडावे लागेल आणि लाजेने तोंड लपवावे लागेल. तू त्या देशांवर विश्वास ठेवलास. पण परमेश्वराने त्या देशांना नाकारले. म्हणून जिंकण्यासाठी ते तुला मदत करु शकत नाहीत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: