यहेज्केल 37 : 1 (ERVMR)
परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. परमेश्वराच्या आत्म्याने मला गावातून उचलून दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती दरी मृतांच्या हाडांनी भरलेली होती.
यहेज्केल 37 : 2 (ERVMR)
दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले.
यहेज्केल 37 : 3 (ERVMR)
मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?” मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.”
यहेज्केल 37 : 4 (ERVMR)
परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने त्या हाडांशी बोल. त्यांना सांग ‘सुक्या हाडांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
यहेज्केल 37 : 5 (ERVMR)
परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो: मी तुमच्यात प्राण निर्माण करीन मग तुम्ही जिवंत व्हाल.
यहेज्केल 37 : 6 (ERVMR)
मी तुमच्यावर स्नायू आणि मांस चढवीन आणि त्यावर कातडे ओढीन. मग तुमच्यात प्राण ओतीन. म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजून चुकेल की मीच परमेश्वर व प्रभू आहे.”
यहेज्केल 37 : 7 (ERVMR)
मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावतीने हाडांशी बोललो. माझे बोलणे सुरु असतानाच, मला मोठा आवाज ऐकू आला. हाडांचा खुळखुळाट झाला. ती एकमेकांना जोडली गेली.
यहेज्केल 37 : 8 (ERVMR)
माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस व कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.
यहेज्केल 37 : 9 (ERVMR)
मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.”
यहेज्केल 37 : 10 (ERVMR)
मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वाऱ्याशी बोललो. मग मृत शरीरांत जीव आला. ती जिवंत होऊन उभी राहिली ते पुष्कळ लोक होते. ते मोठे सैन्यच होते.
यहेज्केल 37 : 11 (ERVMR)
मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’
यहेज्केल 37 : 12 (ERVMR)
म्हणून त्यांच्याशी माझ्यावतीने बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. मग मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत आणीन.
यहेज्केल 37 : 13 (ERVMR)
माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे.
यहेज्केल 37 : 14 (ERVMR)
मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.” परमेश्वरच हे सर्व बोलला.
यहेज्केल 37 : 15 (ERVMR)
मला परमेश्वराचे शब्द पुन्हा ऐकू आले. तो म्हणाला,
यहेज्केल 37 : 16 (ERVMR)
“मानवपुत्रा, एक काठी घे आणि तिच्यावर पुढील संदेश लिही. ‘ही काठी यहूदा आणि त्याचे मित्र इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ मग दुसरी काठी घेऊन तिच्यावर लिही ‘ही एफ्राईमची काठी योसेफ व त्याचे मित्र इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’
यहेज्केल 37 : 17 (ERVMR)
मग त्या दोन काठ्या एकत्र जोड. तुझ्या हातांत ती एकच काठी असेल.
यहेज्केल 37 : 18 (ERVMR)
“तुझे लोक तुला ह्याचा अर्थ विचारतील.
यहेज्केल 37 : 19 (ERVMR)
त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘मी एफ्राईमच्या आणि त्याच्या मित्रांच्या म्हणजेच इस्राएलच्या लोकांच्या हातांत असलेली योसेफाची काठी घेईल. मग ती मी यहुदाच्या काठीबरोबर ठेवीन. माझ्या हातांत त्या दोन काठ्यांची एकच काठी होईल.’
यहेज्केल 37 : 20 (ERVMR)
“त्या काठ्या हातांत तुझ्या पुढे धर. त्यांच्यावर तू नांवे लिहिली आहेस.
यहेज्केल 37 : 21 (ERVMR)
लोकांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएल लोक वेगवेगळ्या राष्टांत गेले आहेत. तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सगळीकडून आणून, एकत्र गोळा करीन आणि त्यांना त्यांच्या देशात परत आणीन.
यहेज्केल 37 : 22 (ERVMR)
इस्राएलच्या पर्वतीय क्षेत्रात मी त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांचा मिळून एकच राजा असेल. यापुढे ती वेगवेगळी दोन राष्ट्रे असणार नाहीत, त्याचे दोन राज्यात विभाजन होणार नाही.
यहेज्केल 37 : 23 (ERVMR)
ते यापुढे स्वत:ला त्या मूर्ती मुळे वा पुतळ्यांमुळे अमंगळ होणार नाहीत. त्यांनी पापे केलेल्या सर्व ठिकाणापासून मी त्यांना सुरक्षित ठेवीन. त्यांना धुवून शुद्ध करीन. मग ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन.
यहेज्केल 37 : 24 (ERVMR)
“माझा सेवक, दावीद, हा त्यांचा राजा होईल. त्या सर्वांना मिळून एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमाप्रमाणे वागतील आणि माझ्या कायद्यांचे पालन करतील. मी त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी ते करतील.
यहेज्केल 37 : 25 (ERVMR)
माझा सेवक, याकोब, याला मी दिलेल्या भूमीवर ते राहतील. तुमचे पूर्वज तेथेच राहात होते. आता माझी माणसे तेथे राहतील. ते, त्यांची मुले, नातवंडे कायमची तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा कायमचा नेता असेल.
यहेज्केल 37 : 26 (ERVMR)
मी त्यांच्याबरोबर शांतता करार करीन. तो करार कायमस्वरुपी असेल. मी त्यांना त्यांची जमीन देण्यास, त्यांची संख्या वाढवून देण्यास, त्यांच्या तेथेच कायमचे माझे पवित्र स्थान ठेवण्यास कबूल आहे.
यहेज्केल 37 : 27 (ERVMR)
त्यांच्यामध्येच माझा पवित्र तंबू असेल. हो! मी त्यांचा देव असेल व ते माझे लोक असतील.
यहेज्केल 37 : 28 (ERVMR)
मग इतर राष्ट्रांना कळून येईल की मी परमेश्वर आहे आणि इस्राएलमध्ये चिरंतन असे माझे पवित्र स्थान करुन त्या लोकांना मी माझी कायमची खास माणसे बनविली आहेत.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28