यहोशवा 2 : 1 (ERVMR)
नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषत: यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले. त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.
यहोशवा 2 : 2 (ERVMR)
यरीहोच्या राजाला कोणीतरी सांगितले की, आज रात्री इस्राएलमधून काही माणसे येथे आपल्या देशातील दुर्बलता शोधण्यासाठी व टेहेळणीसाठी आली आहेत.
यहोशवा 2 : 3 (ERVMR)
तेव्हा राजाने रहाबला निरोप पाठवला “तुझ्याकडे वस्तीला आलेल्या त्या व्यक्तींना लपवू नकोस त्यांना बाहेर काढ. ते हेर म्हणून आलेले आहेत.”
यहोशवा 2 : 4 (ERVMR)
तिने खरे तर त्या दोघांना लपवले होते. पण ती म्हणाली, “दोघेजण इथे आले होते खरे,पण कुठून आले हे मला माहीत नाही.
यहोशवा 2 : 5 (ERVMR)
संध्याकाळी वेशीचे दरवाजे बंद व्हायच्या सुमाराला ते निघून गेले. लगेच पाठलाग केलात तर ते सापडू शकतील.”
यहोशवा 2 : 6 (ERVMR)
(पण प्रत्यक्षात तिने त्यांना घराच्या छपरावर नेऊन अंबाडीच्या गंजीत लपवले होते.)
यहोशवा 2 : 7 (ERVMR)
त्यांच्या मागावर गेलेली माणसे वेशीच्या बाहेर पडली आणि लोकांनी वेशीचे दरवाजे लावून घेतले. त्या दोघांचा तपास करत ही माणसे यार्देन नदीपर्यंत गेली आणि नदी ओलांडायच्या सर्व जागांचा तपास करू लागली.
यहोशवा 2 : 8 (ERVMR)
इकडे हे दोन हेर झोपायची तयारी करत होते, पण रहाब वर जाऊन
यहोशवा 2 : 9 (ERVMR)
त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे हे मला माहीत आहे. तुमची आम्हांला भीती वाटते. या देशातील सर्व लोक घाबरून गेले आहेत.
यहोशवा 2 : 10 (ERVMR)
कारण परमेश्वराने तुम्हाला कशी कशी मदत केली हे आम्ही ऐकले आहे. तुम्ही मिसरदेशामधून बाहेर पडताना त्याने तांबडचा समुद्राचे पाणी कसे आटवले हे आम्ही ऐकून आहोत. यार्देनच्या पूर्वेकडे असलेल्या त्या सीहोन आणि ओग या दोन अमोरी राजांचा नाश तुम्ही कसा केलात हे आमच्या कानावर आले.
यहोशवा 2 : 11 (ERVMR)
हे सर्व ऐकून आम्ही फार घाबरून गेलो आहोत. आता तुमच्याशी लढण्याचे शौर्य आमच्या कोणातच नाही. कारण वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर तुमच्या परमेश्वर देवाची सत्ता आहे.
यहोशवा 2 : 12 (ERVMR)
तेव्हा तुम्ही मला एक वचव द्या. मी तुमच्यावर दया दाखवली आणि तुमच्या मदतीला आले. तेव्हा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही दया दाखवा. तशी परमेश्वराची शपथ घ्या मला तसे वचन द्या.
यहोशवा 2 : 13 (ERVMR)
माझे वडील, आई, बहीण, भावंडे आणी त्यांचे परिवार आम्हा सर्वांना तुम्ही जिवंत ठेवाल, जिवे मारणार नाही असे वचन द्या.”
यहोशवा 2 : 14 (ERVMR)
याला ते तयार झाले. ते म्हणाले, “तुमच्या करता आम्ही प्राणही देऊ. कोणालाही आम्ही काय करत आहोत हे सांगू नका. परमेश्वराने आमचा देश आम्हाला दिला की आम्ही तुमच्याशी दयाळूपणाने वागू. आमच्यावर विश्वास ठेव.”
यहोशवा 2 : 15 (ERVMR)
या स्त्रीचे घर तटबंदीच्या भिंतीतच बांधलेले होते. तेव्हा तिने दोराच्या साहाय्याने या दोघांना खिडकीतून खाली उतरवले.
यहोशवा 2 : 16 (ERVMR)
मग ती म्हाणाली, “आता पश्चिमेला जाऊन टेकड्यांमध्ये तीन दिवस लपून राहा. म्हाणजे राजांच्या तपास करणाऱ्या माणसांच्या हाती तुम्ही लागणार नाही ती माणसे परतली की तुम्ही आपल्या वाटेने जा.”
यहोशवा 2 : 17 (ERVMR)
यावर ते म्हणाले, “आम्ही तुला वचन दिले आहे पण एक गोष्ट कर. नाहीतर दिलेला शब्द पाळायाची जबाबदारी आमच्यावर नाही.
यहोशवा 2 : 18 (ERVMR)
आमच्या सुटकेसाठी तू हा लाल दोर वापरला आहेस. आम्ही येथे परत येऊ तेव्हा खिडकीला हाच लाल दोर बांधून ठेव. तसेच तुझे आई-वडील, भावंडे वगैरे सर्व कुटुंबिय यांना या घरी एकत्र बोलाव.
यहोशवा 2 : 19 (ERVMR)
या घरात राहणाऱ्या सर्वांचे आम्ही रक्षण करू. त्यांच्यापैकी कोणालाही काही इजा झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर राहील. पण येथून कोणी बाहेर पडल्यास तो मारला जाऊ शकेल मग आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. ती त्याचीच चूक असेल.
यहोशवा 2 : 20 (ERVMR)
तुझ्याशी अम्ही हा करार करत आहोत. पण तू आम्ही काय करत आहोत हे कोणाला सांगितलेस तर आम्ही या करारातून मुक्त होऊ.”
यहोशवा 2 : 21 (ERVMR)
यावर ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” मग तिने त्यांना निरोप दिला. ते बाहेर पडले त्यानंतर तिने तो लाल दोर खिडकीला बांधला.
यहोशवा 2 : 22 (ERVMR)
ती माणसे बाहेर पडून टेकड्यांमध्ये गेली. तेथे त्यांनी तीन दिवस मुक्काम केला. त्यांचा तपास करणाऱ्यांनी सर्वत्र शोध केला. व तीन दिवसांनंतर तपास सोडून देऊन ते लोक नगरात परत आले.
यहोशवा 2 : 23 (ERVMR)
मग हे दोन हेर टेकड्यांमधून बाहेर पडून नदी ओलांडून नूनाचापुत्र यहोशवाकडे आले. आपल्याला समजलेले सर्व काही त्यांनी यहोशवाच्या कानावर घातले.
यहोशवा 2 : 24 (ERVMR)
व ते म्हणाले, “परमेश्वराने हा प्रदेश खरोखरच आपल्याला दिला आहे. तेथील सर्वांची गाळण उडाली आहे.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: