नीतिसूत्रे 1 : 1 (ERVMR)
हे शब्द म्हणजे दावीदाचा मुलगा शलमोन याची शहाणपणाची शिकवण आहे. तो इस्राएलचा राजा होता.
नीतिसूत्रे 1 : 2 (ERVMR)
लोक शहाणे व्हावेत आणि त्यांना योग्य गोष्ट कोणती ते कळावे म्हणून हे शब्द लिहिले गेले. या शब्दांमुळे लोकांना खरे शिक्षण समजण्यास मदत होईल.
नीतिसूत्रे 1 : 3 (ERVMR)
हे शब्द लोकांना जगण्याची सर्वोत्कृष्ट पध्दत शिकवतील. लोक न्यायी, इमानी आणि चांगले राहाण्याचा योग्य मार्ग शिकतील.
नीतिसूत्रे 1 : 4 (ERVMR)
ज्या लोकांना शहाणपण शिकण्याची गरज आहे, त्यांना हे शब्द शहाणपण शिकवतील. तरुण माणसे या शब्दांपासून शिकू शकतील.
नीतिसूत्रे 1 : 5 (ERVMR)
या शब्दांतली शिकवण शहाण्या माणसांनी सुध्दा अतिशय काळजीपूर्वक ऐकली पाहिजे, तरच ते अधिक शिकू शकतील आणि अधिक शहाणे होतील. आणि जे लोक चांगले वाईट ओळखण्यात तरबेज आहेत त्यांना अधिक चांगले समजू शकेल. त्या
नीतिसूत्रे 1 : 6 (ERVMR)
नंतरच लोकांना शहाणपणाच्या गोष्टींचा आणि म्हणींचा अर्थ समजू शकेल. शहाणे लोक ज्या गोष्टी सांगतात त्या लोकांना समजू शकतील.
नीतिसूत्रे 1 : 7 (ERVMR)
पहिली गोष्ट म्हणजे माणसाने परमेश्वराला मान दिला पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. नंतर त्याला खरे ज्ञान मिळायला सुरुवात होईल. पण ज्या लोकांना पाप आवडते ते शहाणपणाचा आणि योग्य शिकवणीचा तिरस्कार करतात.
नीतिसूत्रे 1 : 8 (ERVMR)
मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण पाळली पाहिजेस. आणि तू तुझ्या आईची शिकवणही पाळायला हवीस.
नीतिसूत्रे 1 : 9 (ERVMR)
तुझ्या आईचे आणि वडिलांचे शब्द म्हणजे तुझे मस्तक सुशोभित करणारा फुलांचा मुकुट आहे. ते शब्द म्हणजे तुझ्या गळ्याभोवती असलेली सुंदर माळ आहे.
नीतिसूत्रे 1 : 10 (ERVMR)
मुला, ज्या लोकांना पाप आवडते ते लोक तुला प्रलोभने दाखवतील. तू त्यांचे ऐकू नकोस.
नीतिसूत्रे 1 : 11 (ERVMR)
ते पापी म्हणतील, “आमच्याबरोबर चल. आपण लपू आणि कोणाला तरी मारण्याची वाट बघू.
नीतिसूत्रे 1 : 12 (ERVMR)
आपण कोणत्या तरी निरपराध माणसावर हल्ला करु आपण त्या माणसाला मारु आणि त्याला मृत्युलोकात पाठवू
नीतिसूत्रे 1 : 13 (ERVMR)
आपण किमती वस्तूंची चोरी करु. आपण त्या माणसाचा सर्वनाश करु व त्याला कबरेत पाठवू. आपण अशा वस्तूंनी आपले घर भरु.
नीतिसूत्रे 1 : 14 (ERVMR)
तेव्हा आमच्याबरोबर ये आणि या गोष्टी करायला आम्हाला मदत कर. आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्या आपण वाटून घेऊ.”
नीतिसूत्रे 1 : 15 (ERVMR)
मुला, ज्या लोकांना पाप आवडते त्यांच्या मागे जाऊ नकोस. ते ज्या रस्त्यावर राहातात त्या रस्त्यावर एक पाऊलही टाकू नकोस.
नीतिसूत्रे 1 : 16 (ERVMR)
ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
नीतिसूत्रे 1 : 17 (ERVMR)
लोक पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे पसरतात. पण पक्षी जेव्हा तुम्हाला बघत असतो तेव्हा त्याला पकडण्यासाठी जाळे टाकण्यात अर्थ नसतो.
नीतिसूत्रे 1 : 18 (ERVMR)
ते वाईट लोक लपतात व कोणाला तरी मारण्यासाठी वाट बघतात पण खरोखर तेच त्या सापळ्यात अडकतील. त्यांच्या सापळ्यामुळे त्यांचाच नाश होईल.
नीतिसूत्रे 1 : 19 (ERVMR)
आधाशी लोकांचे असेच असते. ते नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू घेतात. त्या वस्तूंनीच त्यांचा नाश होतो.
नीतिसूत्रे 1 : 20 (ERVMR)
ऐक! ज्ञान (रुपी स्त्री) लोकांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे. ती रस्त्यात आणि बाजारात ओरडत आहे.
नीतिसूत्रे 1 : 21 (ERVMR)
ती गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावरुन बोलावत आहे. लोकांनी तिचे ऐकावे म्हणून शहाच्या दरवाजाशी प्रयत्न करीत आहे. ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते.
नीतिसूत्रे 1 : 22 (ERVMR)
“तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात?
नीतिसूत्रे 1 : 23 (ERVMR)
तुम्ही माझ्या सल्ल्याकडे आणि शिकवणुकीकडे लक्ष दिले असते तर मला जे माहित आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितले असते. मला जे सर्व माहित आहे ते तुम्हाला सांगितले असते. मी माझे सर्व ज्ञान तुम्हाला दिले असते.
नीतिसूत्रे 1 : 24 (ERVMR)
“परंतु तुम्ही माझे ऐकायला नकार दिला. मी मदत करायचा प्रयत्न केला. मी माझा हात दिला. पण तुम्ही माझी मदत झिडकारली.
नीतिसूत्रे 1 : 25 (ERVMR)
तुम्ही दूर गेलात आणि माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही माझे शब्द स्वीकारायला नकार दिलात.
नीतिसूत्रे 1 : 26 (ERVMR)
म्हणून मी तुमच्या संकटांना हसेन. तुमच्यावर संकटे आलेली पाहून मला आनंद होईल.
नीतिसूत्रे 1 : 27 (ERVMR)
मोठ्या वादळांप्रमाणे तुमच्यावर मोठी संकटे येतील. जोरदार वाऱ्याप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील. तुमची संकटे आणि दु:ख तुम्हाला खूप मोठ्या ओइयासारखे वाटेल.
नीतिसूत्रे 1 : 28 (ERVMR)
“या सर्व गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही माझी मदत मागाल. पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मला शोधाल पण मी तुम्हाला सापडणार नाही.
नीतिसूत्रे 1 : 29 (ERVMR)
मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला.
नीतिसूत्रे 1 : 30 (ERVMR)
तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही.
नीतिसूत्रे 1 : 31 (ERVMR)
म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात.
नीतिसूत्रे 1 : 32 (ERVMR)
“मूर्ख लोक मरतात कारण त्यांनी ज्ञानाचा मार्ग चोखाळायला नकार दिलेला असतो. त्यांचा मूर्ख मार्ग चोखाळण्यात त्यांना आनंद मिळतो. आणि त्यानेच त्यांचा नाश होतो.
नीतिसूत्रे 1 : 33 (ERVMR)
परंतु जो माझी आज्ञा पाळतो तो सुरक्षित राहातो. तो समाधानी असतो. त्याला वाईट गोष्टींची भीती बाळगायचे कारण उरत नाही.”
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33