नीतिसूत्रे 10 : 1 (ERVMR)
ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो.
नीतिसूत्रे 10 : 2 (ERVMR)
जर एखाद्याने वाईट गोष्टी करुन पैसे मिळवले तर ते पैसे कवडी मोलाचे असतात. पण सत्कर्म तुम्हाला मरणापासून वाचवू शकते.
नीतिसूत्रे 10 : 3 (ERVMR)
परमेश्वर चांगल्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना हवे असलेले अन्न देतो. परंतु परमेश्वर वाईट लोकाक़डून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी काढून घेतो.
नीतिसूत्रे 10 : 4 (ERVMR)
आळशी माणूस गरीब राहील. पण जो माणूस कष्ट करील तो श्रीमंत होईल.
नीतिसूत्रे 10 : 5 (ERVMR)
हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो.
नीतिसूत्रे 10 : 6 (ERVMR)
लोक देवाला चांगल्या माणसाला आशीर्वाद द्यायला सांगतात. वाईट लोक त्या चांगल्या गोष्टी म्हणतील परंतु त्याचे शब्द त्यांच्या वाईट योजना फक्त लपवतात.
नीतिसूत्रे 10 : 7 (ERVMR)
चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.
नीतिसूत्रे 10 : 8 (ERVMR)
चांगला, इमानी माणूस सुरक्षित असतो. परंतु कुटिल, फसवणारा माणूस मात्र पकडला जातो.
नीतिसूत्रे 10 : 9 (ERVMR)
शहाण्या माणसाला जर एखाद्याने काही करायला सांगितले तर तो त्या आज्ञा पाळतो. परंतु मूर्ख माणूस वाद घालतो आणि स्वत:वर संकट ओढवून घेतो.
नीतिसूत्रे 10 : 10 (ERVMR)
जो माणूस सत्य लपवतो तो संकटे निर्माण करतो. जो माणूस उघडपणे बोलतो तो शांती निर्माण करतो.
नीतिसूत्रे 10 : 11 (ERVMR)
चांगल्या माणसाच्या शब्दांमुळे आयुष्य चांगले होते. पण दुष्टाच्या शब्दांतून त्याच्या मनातला वाईटपणा तेव्वढा दिसतो.
नीतिसूत्रे 10 : 12 (ERVMR)
मत्सरमुळे वादविवाद होतात. पण प्रेम लोकांनी केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला क्षमा करते.
नीतिसूत्रे 10 : 13 (ERVMR)
शहाणे लोक ऐकायला योग्य अशा गोष्टी बोलतात. पण मूर्ख लोकांनी सुधारावे म्हणून त्यांना शिक्षा करायला हवी.
नीतिसूत्रे 10 : 14 (ERVMR)
शहाणे लोक शांत असतात आणि नवीन गोष्टी शिकतात. पण मूर्ख लोक बोलतात आणि संकटे ओढवून घेतात.
नीतिसूत्रे 10 : 15 (ERVMR)
संपत्ती श्रीमंत माणसाचे रक्षण करते आणि गरिबी गरिबांचा नाश करते.
नीतिसूत्रे 10 : 16 (ERVMR)
जर एखाद्याने चांगले कृत्य केले तर त्याला बक्षीस मिळते. त्याला आयुष्य दिले जाते. पण दुष्टावा केवळ शिक्षा आणतो.
नीतिसूत्रे 10 : 17 (ERVMR)
जो माणूस शिक्षेपासून काही शिकतो तो इतरांनासुध्दा जगायला शिकवू शकतो. पण जो माणूस शिकायला नकार देतो तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेतो.
नीतिसूत्रे 10 : 18 (ERVMR)
जो माणूस त्याचा मत्सर लपवतो तो खोटे बोलत असतो. पण केवळ मूर्खच पसरवता येण्यासारख्या अफवा शोधण्याचा प्रयत्न करतो.
नीतिसूत्रे 10 : 19 (ERVMR)
जो माणूस खूप बडबड करतो तो संकंटांना आमंत्रण देतो. शहाणा माणूस गप्प राहायला शिकतो.
नीतिसूत्रे 10 : 20 (ERVMR)
चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात.
नीतिसूत्रे 10 : 21 (ERVMR)
चांगल्या माणसांच्या शब्दामुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते.
नीतिसूत्रे 10 : 22 (ERVMR)
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल. आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाही.
नीतिसूत्रे 10 : 23 (ERVMR)
मूर्ख माणसाला चुका करायला आवडते. परंतु शहाणा माणूस ज्ञानाने खुश होतो.
नीतिसूत्रे 10 : 24 (ERVMR)
दुष्ट माणसाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींकडूनच त्याचा पराभव होतो. पण चांगल्या माणसाला मात्र हव्या असलेल्या गोष्टी मिळतात.
नीतिसूत्रे 10 : 25 (ERVMR)
दुष्टांचा नाश त्यांच्या संकटांमुळे होतो. पण चांगली माणसे नेहमी बलवान राहातात.
नीतिसूत्रे 10 : 26 (ERVMR)
आळशी माणसाला तुमच्यासाठी, काहीही करायला सांगू नका. तुमच्या तोंडात शिरलेल्या आंबेप्रमाणे किंवा डोळ्यांत गेलेल्या धुराप्रमाणे तो तुम्हाला चीड आणील.
नीतिसूत्रे 10 : 27 (ERVMR)
जर तुम्ही परमेश्वराचा आदर करीत असाल तर तुम्ही खूप जगाल. पण दुष्टाची त्याच्या आयुष्यातली अनेक वर्ष कमी होतील.
नीतिसूत्रे 10 : 28 (ERVMR)
चांगले लोक ज्या गोष्टींची आशा करतात त्या त्यांना आनंद मिळवून देतात. ज्या गोष्टींची आशा वाईट लोक करतात त्या त्यांना विनाश आणतात.
नीतिसूत्रे 10 : 29 (ERVMR)
परमेश्वर चांगल्या माणसांचे रक्षण करतो. पण जे लोक चुका करतात त्यांचा परमेश्वर नाश करतो.
नीतिसूत्रे 10 : 30 (ERVMR)
चांगले लोक नेहमी सुरक्षित असतात. पण दुष्टांना जबरदस्तीने देश सोडणे भाग पडते.
नीतिसूत्रे 10 : 31 (ERVMR)
चांगले लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण जो संकटे आणणाऱ्या गोष्टी सांगतो त्याचे ऐकणे लोक बंद करतात.
नीतिसूत्रे 10 : 32 (ERVMR)
चांगले लोक बोलण्याच्या योग्य गोष्टी जाणतात. पण वाईट लोक संकटे आणणाऱ्या गोष्टीच बोलतात.
❮
❯