नीतिसूत्रे 22 : 1 (ERVMR)
आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले. चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे.
नीतिसूत्रे 22 : 2 (ERVMR)
गरीब लोक आणि श्रीमंत लोक सारखेच असतात. सर्वांना परमेश्वरानेच निर्माण केले आहे.
नीतिसूत्रे 22 : 3 (ERVMR)
शहाण्या लोकांना संकट येताना दिसते आणि ते वाटेतून बाजूला होतात. पण मूर्ख लोक सरळ संकटात जातात आणि त्यामुळे सोसत राहातात.
नीतिसूत्रे 22 : 4 (ERVMR)
परमेश्वराला मान द्या आणि विनम्र राहा. नंतर तुम्हाला संपत्ती, मान आणि खरे जीवन मिळेल.
नीतिसूत्रे 22 : 5 (ERVMR)
वाईट लोक अनेक संकटांच्या जाळ्यात अडकले आहेत. पण जो माणूस आपल्या आत्म्याची काळजी करतो तो संकटांपासून दूर राहातो.
नीतिसूत्रे 22 : 6 (ERVMR)
लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा. मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गांने जगेल.
नीतिसूत्रे 22 : 7 (ERVMR)
गरीब लोक श्रीमंतांचे गुलाम असतात. जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो.
नीतिसूत्रे 22 : 8 (ERVMR)
जो माणूस संकटे पसरवतो तो संकटांचे पीक घेतो. आणि शेवटी त्या माणसाचा नाश होईल त्याने इतरांना दिलेल्या त्रासांमुळेच त्या माणसाचा नाश होईल.
नीतिसूत्रे 22 : 9 (ERVMR)
जो मनुष्य स्वखुशीने आनंदाने देतो त्याला आशीर्वाद मिळेल. कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
नीतिसूत्रे 22 : 10 (ERVMR)
जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला जबरदस्तीने जायला भाग पाडा. जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा त्याच्याबरोबर संकटही जाईल. नंतर वाद आणि फुशारक्याही बंद होतील.
नीतिसूत्रे 22 : 11 (ERVMR)
जर तुम्ही शुध्द मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल.
नीतिसूत्रे 22 : 12 (ERVMR)
जे लोक परमेश्वराला ओळखतात त्यांच्यावर तो नजर ठेवतो आणि त्यांचे रक्षण करतो. पण जे त्याच्याविरुध्द जातात त्यांचा तो नाश करतो.
नीतिसूत्रे 22 : 13 (ERVMR)
आळशी माणूस म्हणतो, “मी आता कामाला जाऊ शकत नाही. बाहेर सिंह आहे आणि तो मला खाईल.”
नीतिसूत्रे 22 : 14 (ERVMR)
व्यभिचाराचे पाप हा एक सापळा आहे. जो माणूस या सापळ्यात अडकतो त्याच्यावर परमेश्वर खूप रागावतो.
नीतिसूत्रे 22 : 15 (ERVMR)
मुले मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात. पण तुम्ही जर त्यांना शिक्षा केली तर त्या गोष्टी न करायलाही ते शिकतील.
नीतिसूत्रे 22 : 16 (ERVMR)
या दोन गोष्टी तुम्हाला गरीब बनवतील. स्वत:ला श्रीमंत बनवण्यासाठी गरीबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना नजराणे देणे.
नीतिसूत्रे 22 : 17 (ERVMR)
मी काय सांगतो ते ऐका. मी तुम्हाला विद्वानांनी जे सांगितले ते शिकवतो. या शिकवणीपासून शिका.
नीतिसूत्रे 22 : 18 (ERVMR)
तुम्ही जर या म्हणी लक्षात ठेवल्या तर ते तुमच्या दृष्टीने फार चांगले होईल. तुम्ही जर हे शब्द म्हणू शकलात तर तुम्हाला त्यांची मदत होईल.
नीतिसूत्रे 22 : 19 (ERVMR)
मी तुम्हाला आता या गोष्टी शिकवेन. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे.
नीतिसूत्रे 22 : 20 (ERVMR)
मी तुमच्यासाठी तीस म्हणी लिहिल्या. हे शब्द म्हणजे उपदेश आणि शहाणपण आहे.
नीतिसूत्रे 22 : 21 (ERVMR)
हे शब्द तुम्हाला खऱ्या आणि महत्वाच्या गोष्टी सांगतील. नंतर तुम्ही तुमच्याकडे पाठवलेल्यांना ज्यांनी तुम्हाला विचारले त्यांना तुम्ही चांगली उत्तरे देऊ शकता.
नीतिसूत्रे 22 : 22 (ERVMR)
गरिबांची चोरी करणे सोपे असते. पण ते करु नका आणि न्यायालयात या गरीब लोकांचा फायदा घेऊ नका.
नीतिसूत्रे 22 : 23 (ERVMR)
परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.
नीतिसूत्रे 22 : 24 (ERVMR)
जो खूप लवकर रागावतो त्या माणसाशी मैत्री करु नका. जो पटकन् वेडा होतो त्या माणसाजवळ जाऊ नका.
नीतिसूत्रे 22 : 25 (ERVMR)
जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यासारखेच व्हायला शिकाल. आणि तुमच्यावरही त्याच्यावर येतात तशीच संकटे येतील.
नीतिसूत्रे 22 : 26 (ERVMR)
दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहाण्याचे वचन देऊ नका.
नीतिसूत्रे 22 : 27 (ERVMR)
जर तुम्ही त्याचे कर्ज फेडू शकला नाही, तर तुम्ही तुमच्या जवळचे सर्व घालवून बसाल. तुमचे झोपायचे अंथरुण तुम्ही का घालवता?
नीतिसूत्रे 22 : 28 (ERVMR)
खूप पूर्वी तुमच्या पूर्वजांनी जामीन - जायदादीची आखून दिलेली रेषा पुसू नका.
नीतिसूत्रे 22 : 29 (ERVMR)
जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.
❮
❯