1 करिंथकरांस 13 : 1 (IRVMR)
प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
1 करिंथकरांस 13 : 2 (IRVMR)
आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
1 करिंथकरांस 13 : 3 (IRVMR)
आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
1 करिंथकरांस 13 : 4 (IRVMR)
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
1 करिंथकरांस 13 : 5 (IRVMR)
प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.
1 करिंथकरांस 13 : 6 (IRVMR)
प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते.
1 करिंथकरांस 13 : 7 (IRVMR)
प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
1 करिंथकरांस 13 : 8 (IRVMR)
प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;
1 करिंथकरांस 13 : 9 (IRVMR)
कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो.
1 करिंथकरांस 13 : 10 (IRVMR)
पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.
1 करिंथकरांस 13 : 11 (IRVMR)
जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
1 करिंथकरांस 13 : 12 (IRVMR)
आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन,
1 करिंथकरांस 13 : 13 (IRVMR)
सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13