2 शमुवेल 19 : 1 (IRVMR)
लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्यास म्हणाले, राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु:खात आहे.
2 शमुवेल 19 : 2 (IRVMR)
दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु:खाचा दिवस ठरला राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु:खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले.
2 शमुवेल 19 : 3 (IRVMR)
ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते.
2 शमुवेल 19 : 4 (IRVMR)
राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अबशालोम याच्या नावाने, माझ्या मुला अबशालोमा, असा मोठ्याने आक्रोश करत होता.
2 शमुवेल 19 : 5 (IRVMR)
यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्यास म्हणाला, आपल्या सेवकांना तुम्ही आज मान खाली घालायला लावली आहे. तुमच्या सेवकांनी तुमचा जीव वाचवला. तुमचे पुत्र, कन्या, पत्नी, पत्नी दासी यांचे प्राण वाचवले.
2 शमुवेल 19 : 6 (IRVMR)
ज्यांनी तुमचा द्वेष केला त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवता आहात, आणि ज्यांनी तुमच्यावर लोभ केला त्यांना तुम्ही दूर सारता आहात. तुमची माणसे, तुमचे सेवक यांना तुमच्या दृष्टीने काही किंमत नाही हे तुमच्या वागण्यावरून स्पष्ट झाले आहे. आज अबशालोम जगला असता आणि आम्ही सर्व मरण पावलो असतो तर तुम्हास फार आनंद झाला असता असे दिसते.
2 शमुवेल 19 : 7 (IRVMR)
आता ऊठा आणि आपल्या सेवकांशी बोला. त्यांना प्रोत्साहन द्या. आताच उठून तुम्ही हे ताबडतोब केले नाही, तर आज रात्रीपर्यंत तुमच्या बाजूला एकही मनुष्य उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो. आणि हा तुमच्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वांत मोठा आघात असेल.
2 शमुवेल 19 : 8 (IRVMR)
तेव्हा राजा उठून वेशीपाशी गेला. राजा तेथे आल्याची खबर सर्वत्र पसरली. तेव्हा सर्व जण राजाच्या दर्शनाला जमले. अबशालोमला पाठिंबा देणारे सर्व इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी पळून गेले होते.
2 शमुवेल 19 : 9 (IRVMR)
दावीद यरूशलेमेस परत येतो इस्राएलच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले “पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दावीदाने आपल्याला संरक्षण दिले, पण तो अबशालोमपासून पळून गेला.”
2 शमुवेल 19 : 10 (IRVMR)
म्हणून अबशालोमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली. पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दावीदाला राजा करू.
2 शमुवेल 19 : 11 (IRVMR)
सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत.
2 शमुवेल 19 : 12 (IRVMR)
तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात?
2 शमुवेल 19 : 13 (IRVMR)
आणि अमासास सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही, तर देव मला शासन करो.
2 शमुवेल 19 : 14 (IRVMR)
दावीदाने यहूदातील सर्व लोकांच्या हृदयाला हात घातला. त्यामुळे ते सर्व एकदिलाने राजी झाले. यहूदी लोकांनी राजाला संदेश पाठवला की, तुम्ही आणि तुमचे अधिकारी, सेवक यांनी माघारे यावे.
2 शमुवेल 19 : 15 (IRVMR)
मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्यास भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता.
2 शमुवेल 19 : 16 (IRVMR)
गेराचा पुत्र शिमी हा बन्यामिनी होता तो बहूरीम येथे राहत असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला.
2 शमुवेल 19 : 17 (IRVMR)
बन्यामीनच्या वंशातील हजार माणसेही त्याच्याबरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सीबा हा ही आला. आपले पंधरा पुत्र आणि वीस नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दावीदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तात्काळ पोहोचले.
2 शमुवेल 19 : 18 (IRVMR)
राजाच्या कुटुंबियांना उतरून घ्यायला ते यार्देनच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.
2 शमुवेल 19 : 19 (IRVMR)
तो राजाला म्हणाला, स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करू नका. महाराज, तुम्ही यरूशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरून जा.
2 शमुवेल 19 : 20 (IRVMR)
आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.
2 शमुवेल 19 : 21 (IRVMR)
पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे.
2 शमुवेल 19 : 22 (IRVMR)
दावीद म्हणाला, सरुवेच्या मुलानो मी तुमच्या बरोबर कसे वागावे? तुमचे हे बोलणे आज माझ्या विरूद्ध आहे. इस्राएलमध्ये कोणालाही ठार केले जाणार नाही कारण आज मी इस्राएलचा राजा आहे.
2 शमुवेल 19 : 23 (IRVMR)
मग राजा शिमीला म्हणाला, तू मरणार नाहीस. आपण शिमीचा वध करणार नाही, असे राजाने शिमीला वचन दिले.
2 शमुवेल 19 : 24 (IRVMR)
शौलाचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरूशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वत:कडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत.
2 शमुवेल 19 : 25 (IRVMR)
मफीबोशेथ यरूशलेमेहून आला तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तेथून निघालो तेव्हा तू ही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस?
2 शमुवेल 19 : 26 (IRVMR)
मफीबोशेथने सांगितले, महाराज, माझ्या नोकराने, सीबाने, मला फसवले, त्यास मी म्हणालो, मी पांगळा आहे, तेव्हा गाढवावर खोगीर चढव म्हणजे त्यावर बसून मी राजाबरोबर जाईन.
2 शमुवेल 19 : 27 (IRVMR)
पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरूद्ध तुमचे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा.
2 शमुवेल 19 : 28 (IRVMR)
माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?
2 शमुवेल 19 : 29 (IRVMR)
तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.
2 शमुवेल 19 : 30 (IRVMR)
मफीबोशेथ राजाला म्हणाला महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरुप परत आला यामध्ये सगळे आले.
2 शमुवेल 19 : 31 (IRVMR)
गिलादाचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला.
2 शमुवेल 19 : 32 (IRVMR)
बर्जिल्ल्यचे वय झाले होते तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला.
2 शमुवेल 19 : 33 (IRVMR)
दावीद त्यास म्हणाला, नदी उतरून माझ्याबरोबर चल. तू यरूशलेमेमध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन.
2 शमुवेल 19 : 34 (IRVMR)
पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का?
2 शमुवेल 19 : 35 (IRVMR)
मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करू शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुमच्या मागे लोढणे कशाला लावून देऊ?
2 शमुवेल 19 : 36 (IRVMR)
आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी?
2 शमुवेल 19 : 37 (IRVMR)
पण मला पुन्हा परत घरी जाऊ द्या. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किम्हानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्यास वागवा.
2 शमुवेल 19 : 38 (IRVMR)
तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल.” तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
2 शमुवेल 19 : 39 (IRVMR)
राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.
2 शमुवेल 19 : 40 (IRVMR)
नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किम्हाम त्याच्याबरोबर होता. यहूदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्राएल लोक राजाला नदी ओलांडून पोहचवायला आले.
2 शमुवेल 19 : 41 (IRVMR)
सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करून आणले असे का?”
2 शमुवेल 19 : 42 (IRVMR)
तेव्हा सर्व यहूदी लोकांनी त्या इस्राएल लोकांस सांगितले. “कारण राजा आमचा जवळचा आप्त आहे. तुम्हास एवढा राग का यावा? आम्ही राजाचे अन्न खाल्ले काय? ज्यासाठी आम्हास काही द्यावे लागेल? किंवा त्याने आम्हास काही बक्षीस दिले काय?”
2 शमुवेल 19 : 43 (IRVMR)
इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43