निर्गम 17 : 1 (IRVMR)
खडकातून पाणी
गण. 20:1-13
सर्व इस्राएल लोकांचा समुदाय सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेला, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदिम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना.
निर्गम 17 : 2 (IRVMR)
तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हांला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात?”
निर्गम 17 : 3 (IRVMR)
परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हांला तू येथे आणलेस काय?”
निर्गम 17 : 4 (IRVMR)
तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी या लोकांस काय करू? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत.”
निर्गम 17 : 5 (IRVMR)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.
निर्गम 17 : 6 (IRVMR)
पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील,” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.
निर्गम 17 : 7 (IRVMR)
मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा * परीक्षा व मरीबा † कलह ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.
निर्गम 17 : 8 (IRVMR)
अमालेकी लोकांबरोबर युद्ध
उत्प. 14:7; गण. 13:29; 14:25
रफीदिम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
निर्गम 17 : 9 (IRVMR)
तेव्हा मोशे यहोशवाला इस्राएली सैन्यांचा अधिपती म्हणाला, “काही लोकांस निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”
निर्गम 17 : 10 (IRVMR)
यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.
निर्गम 17 : 11 (IRVMR)
जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकी लोकांची सरशी होई.
निर्गम 17 : 12 (IRVMR)
काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.
निर्गम 17 : 13 (IRVMR)
तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकी लोकांचा पराभव केला.
निर्गम 17 : 14 (IRVMR)
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांस पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
निर्गम 17 : 15 (IRVMR)
मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला “परमेश्वर माझा झेंडा”§ यहोवा-निस्सी असे नाव दिले.
निर्गम 17 : 16 (IRVMR)
आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासनावर अमालेकी लोकांनी हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युध्द होईल.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16