निर्गम 23 : 1 (IRVMR)
न्याय आणि दयेविषयी नियम खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.
निर्गम 23 : 2 (IRVMR)
दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस.
निर्गम 23 : 3 (IRVMR)
एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस.
निर्गम 23 : 4 (IRVMR)
आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड.
निर्गम 23 : 5 (IRVMR)
तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्यास सोडून जाऊ नकोस, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोड.
निर्गम 23 : 6 (IRVMR)
तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नकोस;
निर्गम 23 : 7 (IRVMR)
कोणावरही खोटे दोषारोप करू नकोस; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नकोस. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.
निर्गम 23 : 8 (IRVMR)
लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तू मुळीच घेऊ नकोस; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते.
निर्गम 23 : 9 (IRVMR)
परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे; कारण तुम्ही देखील एके काळी मिसर देशात परके होता.
निर्गम 23 : 10 (IRVMR)
शब्बाथ वर्ष आणि शब्बाथ दिवस याविषयी नियम सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव.
निर्गम 23 : 11 (IRVMR)
परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक राहू दे. त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे.
निर्गम 23 : 12 (IRVMR)
तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.
निर्गम 23 : 13 (IRVMR)
मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका.
निर्गम 23 : 14 (IRVMR)
वार्षिक तीन सण
निर्ग. 34:18-26; अनु. 16:1-17
वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ.
निर्गम 23 : 15 (IRVMR)
बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
निर्गम 23 : 16 (IRVMR)
शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
निर्गम 23 : 17 (IRVMR)
वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे.
निर्गम 23 : 18 (IRVMR)
तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करू नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.
निर्गम 23 : 19 (IRVMR)
आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
निर्गम 23 : 20 (IRVMR)
इस्त्राएल लोकांस मार्ग दाखवणारा देवाचा दूत पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
निर्गम 23 : 21 (IRVMR)
त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळ आणि त्याच्यामागे चाल; त्याच्याविरुध्द बंड करू नकोस. कारण तो तुम्हास क्षमा करणार नाही; कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे* अर्थ-मी त्याला पूर्ण अधिकार देईन .
निर्गम 23 : 22 (IRVMR)
जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व करशील तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शत्रूंचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.
निर्गम 23 : 23 (IRVMR)
देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन.
निर्गम 23 : 24 (IRVMR)
परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नकोस; त्यांची सेवा करू नकोस, त्यांना जमीनदोस्त करावेस; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावेस.
निर्गम 23 : 25 (IRVMR)
तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
निर्गम 23 : 26 (IRVMR)
तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुला दीर्घायुषी करीन.
निर्गम 23 : 27 (IRVMR)
ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन.
निर्गम 23 : 28 (IRVMR)
मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, व हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळावयास लावतील.
निर्गम 23 : 29 (IRVMR)
मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुला त्रास देतील.
निर्गम 23 : 30 (IRVMR)
तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन.
निर्गम 23 : 31 (IRVMR)
“मी तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकांस मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून द्याल.
निर्गम 23 : 32 (IRVMR)
तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नकोस.
निर्गम 23 : 33 (IRVMR)
तू त्यांना तुझ्या देशात राहू देऊ नकोस; तू जर त्यांना तुझ्यामध्ये राहू देशील तर ते पुढे तुला सापळ्यासारखे अडकविणारे होतील, ते तुला माझ्याविरूद्ध पाप करायला लावतील व तू त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरुवात करशील.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33