निर्गम 30 : 1 (IRVMR)
{धूपवेदी} [PS] तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.
निर्गम 30 : 2 (IRVMR)
ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.
निर्गम 30 : 3 (IRVMR)
वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
निर्गम 30 : 4 (IRVMR)
त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरूद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.
निर्गम 30 : 5 (IRVMR)
हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.
निर्गम 30 : 6 (IRVMR)
वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.
निर्गम 30 : 7 (IRVMR)
अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;
निर्गम 30 : 8 (IRVMR)
पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा.
निर्गम 30 : 9 (IRVMR)
तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.
निर्गम 30 : 10 (IRVMR)
अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे. [PS]
निर्गम 30 : 11 (IRVMR)
{जिवाच्या खंडणीसाठी द्यायचा पैसा} [PS] मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
निर्गम 30 : 12 (IRVMR)
“तू इस्राएल लोकांची शिरगणती करशील तेव्हा गणनेवेळी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वरास खंड द्यावा;
निर्गम 30 : 13 (IRVMR)
जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.
निर्गम 30 : 14 (IRVMR)
वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे.
निर्गम 30 : 15 (IRVMR)
तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;
निर्गम 30 : 16 (IRVMR)
इस्राएल लोकांकडून प्रायश्चित्ताचा पैसा घ्यावा आणि त्याचा दर्शनमंडपामधील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.” [PS]
निर्गम 30 : 17 (IRVMR)
{पितळेचे गंगाळ} [PS] परमेश्वर मोशेला म्हणाला,
निर्गम 30 : 18 (IRVMR)
“पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.
निर्गम 30 : 19 (IRVMR)
या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत;
निर्गम 30 : 20 (IRVMR)
दर्शनमंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.
निर्गम 30 : 21 (IRVMR)
अहरोन व त्याचे वंशज ह्याच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.” निर्ग. 37:29 [PE][PS]
निर्गम 30 : 22 (IRVMR)
{अभिषेकाचे तेल आणि धूपद्रव्य} [PS] मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
निर्गम 30 : 23 (IRVMR)
“तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,
निर्गम 30 : 24 (IRVMR)
आणि पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतूनाचे तेल घे,
निर्गम 30 : 25 (IRVMR)
व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;
निर्गम 30 : 26 (IRVMR)
या तेलाने दर्शनमंडप व साक्षीकोश,
निर्गम 30 : 27 (IRVMR)
तसेच मेज व त्यांवरील सर्व वस्तू, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,
निर्गम 30 : 28 (IRVMR)
तसेच होमवेदी व होमवेदीच्या सर्व वस्तू आणि गंगाळ व त्याची बैठक या सर्वांना अभिषेक करावा.
निर्गम 30 : 29 (IRVMR)
त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.
निर्गम 30 : 30 (IRVMR)
आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;
निर्गम 30 : 31 (IRVMR)
इस्राएल लोकांस तू सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हास माझ्यासाठीच हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार.
निर्गम 30 : 32 (IRVMR)
हे तेल कोणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही. व या प्रकारचे तेल कोणीही तयार करू नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच मानावे.
निर्गम 30 : 33 (IRVMR)
जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परक्याला लावील तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
निर्गम 30 : 34 (IRVMR)
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;
निर्गम 30 : 35 (IRVMR)
आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून मिठाने खारावलेले, निर्भेळ शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे;
निर्गम 30 : 36 (IRVMR)
त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शनमंडपामधील ज्या साक्षकोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन तेथे ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.
निर्गम 30 : 37 (IRVMR)
हे परमेश्वरासाठी पवित्र लेखावे; त्यासारखे दुसरे धूपद्रव्य तुम्ही स्वतःसाठी तयार करू नये.
निर्गम 30 : 38 (IRVMR)
सुवास घेण्याकरता कोणी असले काही तयार करील तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.” [PE]
❮
❯