यशया 66 : 1 (IRVMR)
परमेश्वराचा न्याय व सीयोनेची भावी भरभराट परमेश्वर असे म्हणतो, “आकाश माझे सिंहासन आणि पृथ्वी पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी कोठे घर बांधाल? मला विश्रांतीची जागा कुठे आहे?”
यशया 66 : 2 (IRVMR)
“सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत.” परमेश्वर असे म्हणतो. “पण जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे, आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्यास मी मान्य करतो.”
यशया 66 : 3 (IRVMR)
जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे. जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा असा आहे, जो धूप जाळतो तो मूर्तीची स्तुती करणारा असा आहे, त्यांनी स्वत: आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यांचा जीव त्याच्या अमंगळ पदार्थाच्या ठायी संतोष पावतो.
यशया 66 : 4 (IRVMR)
अशाच प्रकारे मी त्यांची शिक्षा निवडेन. ते ज्या गोष्टींना फार भितात तिच त्यांच्यावर आणीन. कारण जेव्हा मी बोलावले तेव्हा कोणी उत्तर दिले नाही. जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले आणि ज्यात मला संतोष नाही ते त्यांनी निवडले.
यशया 66 : 5 (IRVMR)
जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका, तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे, ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो. पण ते लाजवले जातील.
यशया 66 : 6 (IRVMR)
नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे.
यशया 66 : 7 (IRVMR)
“तिला कळा येण्यापुर्वीच ती प्रसूत झाली, तिला वेदना लागण्याच्या आधीच तिला पुरुषसंतान झाले.”
यशया 66 : 8 (IRVMR)
अशी गोष्ट कोणी ऐकली काय? कोणी अशी गोष्ट पाहिली आहे काय? एकाच दिवसात राष्ट्र जन्म घेते काय? एक राष्ट्र एका क्षणात स्थापन होईल का? कारण सियोन प्रसूतिवेदना पावली तेव्हाच ती आपली मुले प्रसवली.
यशया 66 : 9 (IRVMR)
परमेश्वर म्हणतो, मी आईला प्रसूतिच्या वेळेत आणून तिचे मुल जन्मविणार नाही काय? जो मी जन्मास आणतो तो मी गर्भस्थान बंद करीन काय? तुमचा देव असे म्हणतो.
यशया 66 : 10 (IRVMR)
यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.
यशया 66 : 11 (IRVMR)
कारण तुम्ही तिच्या सांत्वनांचे स्तन चोखून तृप्त व्हावे, आणि तिच्या महिम्याच्या विपूलतेचे दूध ओढून घेऊन संतुष्ट व्हावे.
यशया 66 : 12 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो “मी तुमच्यावर नदीप्रमाणे हे वैभव पसरवेल, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा वाहणारा ओघ तुमच्या कडे येईल. तुम्ही ते चोखाल, तुम्ही कडेवर वाहिले जाल आणि मांड्यांवर खेळविले जाल.
यशया 66 : 13 (IRVMR)
आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरूशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल.”
यशया 66 : 14 (IRVMR)
तुम्ही हे पाहाल आणि तुमचे हृदय हर्ष पावेल, आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे नवी होतील. आणि परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाकडे आहे हे कळेल, पण त्याच्या शत्रूंचा त्यास राग येईल.
यशया 66 : 15 (IRVMR)
कारण पाहा! परमेश्वर अग्नीसहीत येईल, आणि अग्नीद्वारे आपला क्रोध प्रकट करावा, आणि धमकीसोबत ज्वाला निघाव्यात म्हणून त्याचे रथ वावटळीसारखे होतील.
यशया 66 : 16 (IRVMR)
कारण परमेश्वर अग्नीने आणि तलवारीने सर्व मनुष्यावर न्याय करेल. परमेश्वर मारले जातील ते खूप असतील.
यशया 66 : 17 (IRVMR)
जे डुकराचे मांस खातात व अमंगळ गोष्टी व उंदीर खाऊन, बागांच्यामध्ये झाडा खाली आपणाला पवित्र करतात आपणांस स्वच्छ करतात, ते एकत्र नाश होतील असे परमेश्वर म्हणतो.
यशया 66 : 18 (IRVMR)
कारण मला त्यांचे विचार आणि कल्पना ठाऊक आहेत. ती वेळ येणार आहे जेव्हा मी सर्व राष्ट्रांना व भाषांना एकत्र करीन. आणि ते येतील व माझे वैभव पाहतील.
यशया 66 : 19 (IRVMR)
काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील.
यशया 66 : 20 (IRVMR)
आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
यशया 66 : 21 (IRVMR)
“ह्यातीलच काही लोकांस मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर असे म्हणतो.
यशया 66 : 22 (IRVMR)
कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो.
यशया 66 : 23 (IRVMR)
आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो.
यशया 66 : 24 (IRVMR)
“आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील, कारण त्यांचा किडा मरणार नाही आणि त्यांचा अग्नी कधी विझणार नाही. आणि ते मनुष्ये सर्व मनुष्यास घृणास्पद होतील.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24