मार्क 2 : 1 (IRVMR)
येशू एका पक्षघाती मनुष्यास बरे करतो
मत्त. 9:2-8; लूक 5:17-26
काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले.
मार्क 2 : 2 (IRVMR)
तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता.
मार्क 2 : 3 (IRVMR)
मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते.
मार्क 2 : 4 (IRVMR)
परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली.
मार्क 2 : 5 (IRVMR)
त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
मार्क 2 : 6 (IRVMR)
तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की,
मार्क 2 : 7 (IRVMR)
“हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”
मार्क 2 : 8 (IRVMR)
आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता?
मार्क 2 : 9 (IRVMR)
तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?”
मार्क 2 : 10 (IRVMR)
परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला,
मार्क 2 : 11 (IRVMR)
“मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
मार्क 2 : 12 (IRVMR)
मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
मार्क 2 : 13 (IRVMR)
लेवीला पाचारण
मत्त. 9:9-13; लूक 5:27-32
येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिक्षण दिले.
मार्क 2 : 14 (IRVMR)
नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.
मार्क 2 : 15 (IRVMR)
नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.
मार्क 2 : 16 (IRVMR)
तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, “हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतो?”
मार्क 2 : 17 (IRVMR)
हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”
मार्क 2 : 18 (IRVMR)
उपवासाविषयीचा प्रश्न
मत्त. 9:14-17; लूक 5:33-39
जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?”
मार्क 2 : 19 (IRVMR)
येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.
मार्क 2 : 20 (IRVMR)
परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील.
मार्क 2 : 21 (IRVMR)
कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल.
मार्क 2 : 22 (IRVMR)
तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.”
मार्क 2 : 23 (IRVMR)
नंतर असे झाले की, येशू शब्बाथ* विश्रांती, विसाव्याचा दिवस दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले.
मार्क 2 : 24 (IRVMR)
तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”
मार्क 2 : 25 (IRVMR)
येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय?
मार्क 2 : 26 (IRVMR)
अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?”
मार्क 2 : 27 (IRVMR)
तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही.
मार्क 2 : 28 (IRVMR)
म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28