नहेम्या 4 : 1 (IRVMR)
बांधकाम करणारे विरोधकांवर नजर ठेवून काम करतात आम्ही यरूशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
नहेम्या 4 : 2 (IRVMR)
सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”
नहेम्या 4 : 3 (IRVMR)
तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.”
नहेम्या 4 : 4 (IRVMR)
आमच्या देवा, ऐक कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्यामस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदीवासात आहेत त्यामध्ये त्यांची लूट होवो.
नहेम्या 4 : 5 (IRVMR)
त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयांदेखत केलेल्या पापांची क्षमा करु नकोस. कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे.
नहेम्या 4 : 6 (IRVMR)
यरूशलेमचा कोट आम्ही बांधला. व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यंत तयार झाला कारण लोकांनी मनापासून काम केले.
नहेम्या 4 : 7 (IRVMR)
पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
नहेम्या 4 : 8 (IRVMR)
तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरूशलेमेविरुध्द हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला.
नहेम्या 4 : 9 (IRVMR)
पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
नहेम्या 4 : 10 (IRVMR)
मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, “भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.”
नहेम्या 4 : 11 (IRVMR)
11 आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”
नहेम्या 4 : 12 (IRVMR)
त्यावेळी जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्याविरूद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन दहा वेळा बोलले.
नहेम्या 4 : 13 (IRVMR)
तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती.
नहेम्या 4 : 14 (IRVMR)
सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.”
नहेम्या 4 : 15 (IRVMR)
आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करु लागला.
नहेम्या 4 : 16 (IRVMR)
त्यादिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, यासह चिलखत घालत, सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते.
नहेम्या 4 : 17 (IRVMR)
बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.
नहेम्या 4 : 18 (IRVMR)
तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता.
नहेम्या 4 : 19 (IRVMR)
मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.
नहेम्या 4 : 20 (IRVMR)
तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे एकत्र गोळा व्हा. आपला देवच आपल्यासाठी लढेल.”
नहेम्या 4 : 21 (IRVMR)
अशाप्रकारे आम्ही यरूशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत.
नहेम्या 4 : 22 (IRVMR)
त्यावेळी मी लोकांस असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरूशलेमेच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”
नहेम्या 4 : 23 (IRVMR)
मी, माझे बंधू, माझे सेवक, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जातानासुद्धा आम्ही प्रत्येकजण आपले शस्त्र धारण करीत असे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23