नीतिसूत्रे 14 : 1 (IRVMR)
सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
नीतिसूत्रे 14 : 2 (IRVMR)
जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो.
नीतिसूत्रे 14 : 3 (IRVMR)
मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.
नीतिसूत्रे 14 : 4 (IRVMR)
गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते.
नीतिसूत्रे 14 : 5 (IRVMR)
विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो.
नीतिसूत्रे 14 : 6 (IRVMR)
निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे.
नीतिसूत्रे 14 : 7 (IRVMR)
मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही.
नीतिसूत्रे 14 : 8 (IRVMR)
शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे.
नीतिसूत्रे 14 : 9 (IRVMR)
मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.
नीतिसूत्रे 14 : 10 (IRVMR)
हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही.
नीतिसूत्रे 14 : 11 (IRVMR)
दुष्टाच्या घराचा नाश होईल, पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल.
नीतिसूत्रे 14 : 12 (IRVMR)
मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो.
नीतिसूत्रे 14 : 13 (IRVMR)
हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.
नीतिसूत्रे 14 : 14 (IRVMR)
जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.
नीतिसूत्रे 14 : 15 (IRVMR)
भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो.
नीतिसूत्रे 14 : 16 (IRVMR)
शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही.
नीतिसूत्रे 14 : 17 (IRVMR)
शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो.
नीतिसूत्रे 14 : 18 (IRVMR)
भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात.
नीतिसूत्रे 14 : 19 (IRVMR)
दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील.
नीतिसूत्रे 14 : 20 (IRVMR)
गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात.
नीतिसूत्रे 14 : 21 (IRVMR)
जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे.
नीतिसूत्रे 14 : 22 (IRVMR)
जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो.
नीतिसूत्रे 14 : 23 (IRVMR)
सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
नीतिसूत्रे 14 : 24 (IRVMR)
शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते.
नीतिसूत्रे 14 : 25 (IRVMR)
खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे.
नीतिसूत्रे 14 : 26 (IRVMR)
परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
नीतिसूत्रे 14 : 27 (IRVMR)
परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे.
नीतिसूत्रे 14 : 28 (IRVMR)
प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे.
नीतिसूत्रे 14 : 29 (IRVMR)
सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
नीतिसूत्रे 14 : 30 (IRVMR)
शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
नीतिसूत्रे 14 : 31 (IRVMR)
जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
नीतिसूत्रे 14 : 32 (IRVMR)
दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.
नीतिसूत्रे 14 : 33 (IRVMR)
बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते.
नीतिसूत्रे 14 : 34 (IRVMR)
योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे.
नीतिसूत्रे 14 : 35 (IRVMR)
शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.
❮
❯