स्तोत्रसंहिता 141 : 1 (IRVMR)
वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक.
स्तोत्रसंहिता 141 : 2 (IRVMR)
माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
स्तोत्रसंहिता 141 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ.
स्तोत्रसंहिता 141 : 4 (IRVMR)
अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 141 : 5 (IRVMR)
नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत.
स्तोत्रसंहिता 141 : 6 (IRVMR)
त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत.
स्तोत्रसंहिता 141 : 7 (IRVMR)
जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.
स्तोत्रसंहिता 141 : 8 (IRVMR)
तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस.
स्तोत्रसंहिता 141 : 9 (IRVMR)
त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर.
स्तोत्रसंहिता 141 : 10 (IRVMR)
दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, मी त्यातून निसटून जाईन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10