स्तोत्रसंहिता 142 : 1 (IRVMR)
अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना दाविदाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.
स्तोत्रसंहिता 142 : 2 (IRVMR)
मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो.
स्तोत्रसंहिता 142 : 3 (IRVMR)
जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.
स्तोत्रसंहिता 142 : 4 (IRVMR)
माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.
स्तोत्रसंहिता 142 : 5 (IRVMR)
हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.
स्तोत्रसंहिता 142 : 6 (IRVMR)
माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
स्तोत्रसंहिता 142 : 7 (IRVMR)
मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.
❮
❯