स्तोत्रसंहिता 6 : 1 (IRVMR)
अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना *मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
स्तोत्रसंहिता 6 : 2 (IRVMR)
हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
स्तोत्रसंहिता 6 : 3 (IRVMR)
माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
स्तोत्रसंहिता 6 : 4 (IRVMR)
हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
स्तोत्रसंहिता 6 : 5 (IRVMR)
कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?
स्तोत्रसंहिता 6 : 6 (IRVMR)
मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
स्तोत्रसंहिता 6 : 7 (IRVMR)
शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
स्तोत्रसंहिता 6 : 8 (IRVMR)
अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
स्तोत्रसंहिता 6 : 9 (IRVMR)
परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
स्तोत्रसंहिता 6 : 10 (IRVMR)
माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.
❮
❯