प्रकटीकरण 18 : 1 (IRVMR)
मोठ्या नगरीचा अधःपात ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
प्रकटीकरण 18 : 2 (IRVMR)
तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला, “पडली, ती महान बाबेल पडली आहे!” ती भूतांना वस्ती झाली आहे, सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सर्व अशुद्ध आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे.
प्रकटीकरण 18 : 3 (IRVMR)
कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे; तिच्या शक्तीशाली संपत्तीने व ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत.
प्रकटीकरण 18 : 4 (IRVMR)
मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.
प्रकटीकरण 18 : 5 (IRVMR)
कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली.
प्रकटीकरण 18 : 6 (IRVMR)
तिने तुम्हास दिले तसे तिला परत द्या; तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा; आणि तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यामध्ये तिच्यासाठी ओता.
प्रकटीकरण 18 : 7 (IRVMR)
तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.
प्रकटीकरण 18 : 8 (IRVMR)
या कारणांमुळे, तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील, मरी, शोक आणि दुष्काळ. ती अग्नीने पुरी जळून जाईल; कारण तिचा न्याय करणारा, परमेश्वर देव सामर्थ्यशाली आहे.
प्रकटीकरण 18 : 9 (IRVMR)
9 “आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले,” जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील आणि ऊर बडवतील.
प्रकटीकरण 18 : 10 (IRVMR)
ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील, हाय! ही मोठी नगरी, ही पराक्रमी नगरी बाबेल; कारण एका घटकेत तुझा न्याय करण्यात आला आहे!
प्रकटीकरण 18 : 11 (IRVMR)
आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील; कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही.
प्रकटीकरण 18 : 12 (IRVMR)
सोन्याचा, रुप्याचा, हिऱ्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे;
प्रकटीकरण 18 : 13 (IRVMR)
दालचिनी व उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल व ऊद, द्राक्षरस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व मनुष्यांचे जीव, हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही.
प्रकटीकरण 18 : 14 (IRVMR)
आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत; सर्व स्वादिष्ट आणि विलासाचे पदार्थ तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते यापुढे कोणाला पुन्हा मिळणारच नाहीत.
प्रकटीकरण 18 : 15 (IRVMR)
आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील
प्रकटीकरण 18 : 16 (IRVMR)
आणि म्हणतील, हाय! ही मोठी नगरी! ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा आणि हिऱ्यामोत्यांचा साज घालीत असे.
प्रकटीकरण 18 : 17 (IRVMR)
एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे. आणि सगळे तांडेल, गलबतावरचे सगळे लोक आणि खलाशी आणि जितके समुद्रावर पोट भरणारे होते ते सर्व लोक दूरवर उभे राहिले,
प्रकटीकरण 18 : 18 (IRVMR)
आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, “कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे?”
प्रकटीकरण 18 : 19 (IRVMR)
आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली व ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले, हाय! ही महान नगरी! समुद्रावर ज्यांची गलबत होती ते सर्व हिच्या संपत्तीवर सधन झालेत! कारण ही एका घटकेत उजाड झाली.
प्रकटीकरण 18 : 20 (IRVMR)
हे स्वर्गा, अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा, कारण देवाने तिला दंड देवून तुम्हास न्याय दिला आहे.
प्रकटीकरण 18 : 21 (IRVMR)
मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला आणि तो म्हणाला, अशीच ती मोठी नगरी बाबेल जोरात खाली टाकण्यात येईल, आणि पुन्हा मुळीच सापडणार नाही.
प्रकटीकरण 18 : 22 (IRVMR)
तुझ्यात वीणा वाजविणाऱ्यांचा आवाज, संगीतकार, बासरी आणि कर्णे वाजविणाऱ्यांचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही. तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर ह्यापुढे कधी आढळणार नाही; आणि तुझ्यात जात्याचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही.
प्रकटीकरण 18 : 23 (IRVMR)
आणि तुझ्यात दिव्याचा उजेड. ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.
प्रकटीकरण 18 : 24 (IRVMR)
आणि तिच्यात संदेष्ट्यांचे, पवित्रजनांचे आणि पृथ्वीवर जे वधलेले त्या सर्वाचे रक्त सापडले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24