प्रकटीकरण 3 : 1 (IRVMR)
सार्दीस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.
प्रकटीकरण 3 : 2 (IRVMR)
जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही.
प्रकटीकरण 3 : 3 (IRVMR)
म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले याची आठवण करा, त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हास कळणार नाही.
प्रकटीकरण 3 : 4 (IRVMR)
तरी ज्यांनी आपली वस्त्रे मलीन केली नाहीत अशी थोडी नावे सार्दीसमध्ये तुझ्याजवळ आहेत, ते माझ्याबरोबर शुभ्र वस्त्रात चालतील कारण ते लायक आहेत.
प्रकटीकरण 3 : 5 (IRVMR)
जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
प्रकटीकरण 3 : 6 (IRVMR)
आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
प्रकटीकरण 3 : 7 (IRVMR)
फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
प्रकटीकरण 3 : 8 (IRVMR)
मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर द्वार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस.
प्रकटीकरण 3 : 9 (IRVMR)
पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.
प्रकटीकरण 3 : 10 (IRVMR)
धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.
प्रकटीकरण 3 : 11 (IRVMR)
मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये.
प्रकटीकरण 3 : 12 (IRVMR)
जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.
प्रकटीकरण 3 : 13 (IRVMR)
आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
प्रकटीकरण 3 : 14 (IRVMR)
लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
प्रकटीकरण 3 : 15 (IRVMR)
मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते.
प्रकटीकरण 3 : 16 (IRVMR)
पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.
प्रकटीकरण 3 : 17 (IRVMR)
तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.
प्रकटीकरण 3 : 18 (IRVMR)
मी तुम्हास सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.
प्रकटीकरण 3 : 19 (IRVMR)
ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.
प्रकटीकरण 3 : 20 (IRVMR)
20 पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.
प्रकटीकरण 3 : 21 (IRVMR)
21 ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.
प्रकटीकरण 3 : 22 (IRVMR)
आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22