यहेज्केल 20 : 1 (MRV)
एक दिवस, इस्राएलमधील काही वडीलधारी नेते परमेश्वराचा सल्ला विचाण्यासाठी माझ्याकडे आले. परागंदा अवस्थेतील काळाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या (आँगस्ट) दहाव्या दिवशी ते लोक आले आणि माझ्यापुढे बसले.
यहेज्केल 20 : 2 (MRV)
मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
यहेज्केल 20 : 3 (MRV)
“मानवपुत्रा, इस्राएलच्या वडीलधाऱ्यांशी (नेत्यांशी) बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही माझा सल्ला घेण्यासाठी आला आहात का? जर तसे असेल. तर मी तुम्हाला सल्ला देणार नाही. परमेश्वर माझा प्रभू, असे म्हणाला,
यहेज्केल 20 : 4 (MRV)
मानवपुत्रा, तू त्यांची परीक्षा करशील का? तू त्यांची पारख करशील का? त्यांच्या वडिलांनी केलेल्या भयंकर गोष्टींबद्दल तू त्यांना सांगितले पाहिजेस.
यहेज्केल 20 : 5 (MRV)
‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्यांना सागितले पाहिजेस; ज्या दिवशी मी इस्राएलची निवड केली, याकोबाच्या वंशाला अभिवचन दिले आणि अभय देऊन मी त्यांना माझी ओळख दिली. ‘मीच तुमचा परमेश्वर आहे. असे वचन मी त्यांना निसरमध्ये दिले,
यहेज्केल 20 : 6 (MRV)
त्याच दिवशी, त्यांना मिसरमधून बाहेर काढून, मी त्यांना देत असलेल्या भूमीकडे घेऊन जाण्याचेही कबूल केले. ती भूमी अनेक चांगल्या गोष्टीनी भरलेली होती.सर्व देशांपेक्षा हा देश सुंदर होता.
यहेज्केल 20 : 7 (MRV)
“इस्राएलच्या लोकांना त्यांच्या भयंकर मूर्ती दूर फेकून देण्यास मी सांगितले. मिसरच्या त्या अमंगळ पुतळ्यांबरोबर तुम्ही स्वत:ही अमंगळ होऊ नका, असेही मी त्यांना सांगितले. मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
यहेज्केल 20 : 8 (MRV)
पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली व माझे ऐकण्याचे नाकारले, त्यांनी त्यांच्या त्या भयंकर मूर्ती ऐकल्या नाहीत ते मिसरचे घाणेरडे पुतळे त्यांनी मिसरमध्येच टाकून दिले नाहीत. मग माझ्या रागाचा पारा किती चढतो हे त्यांना कळावे म्हणून मी (देवाने) मिसरमध्येच त्यांचा नाश करण्याचा निश्चय केला.
यहेज्केल 20 : 9 (MRV)
पण मी त्यांचा नाश केला नाही. माझे लोक जेथे राहात होते तेथे, त्यांना, मिसरमधून बाहेर काढण्याचे मी अगोदरच कबूल केले होते. तेव्हा त्या सर्वांच्या देखत इस्राएलचा नाश मी केला नाही कारण, मला माझ्या नावाला बट्टा लावायचा नव्हता.
यहेज्केल 20 : 10 (MRV)
मी इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणले. व त्यांना वाळवंटात नेले.
यहेज्केल 20 : 11 (MRV)
मग मी त्यांना माझे कायदे शिकविले, माझे नियम घालून दिले. एखाद्याने ते नियम पाळल्यास, तो जगेल.
यहेज्केल 20 : 12 (MRV)
मी त्यांना विश्रांतीच्या खास दिवसाबद्दलही सांगितले. त्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्या व माझ्यामधील विशेष संकेत होते, खूण होती. मीच परमेश्वर आहे व ह्या माणसाना, मी, माझी विशेष (पवित्र) माणसे करीत आहे हेच त्या खुणेवरुन दिसे.
यहेज्केल 20 : 13 (MRV)
“पण वाळवंटात इस्राएली लोक माझ्याविरुध्द गेले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत. माझे नियम पाळायला त्यांनी नकार दिला. खरे म्हणजे, ते नियम अतिशय चांगले होते. एखाद्याने ते पाळले असते तर तो नक्कीच जगला असता! माझ्या सुट्ट्यांच्या विशेष दिवसांकडे त्यांनी त्यांना काही महत्व नसल्याप्रमाणे दुर्लक्ष केले. पुष्कळ वेळा, त्यांनी त्या दिवशी काम केले. म्हणून माझ्या क्रोधाचा पूर्णाविष्कार दाखविण्यासाठी, त्यांचा वाळवंटात नाश करण्याचा मी निश्चय केला.
यहेज्केल 20 : 14 (MRV)
पण मी त्यांचा नाश केला नाही. मी इस्राएलला मिसर मधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्यांच्यासमोर इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला काळिमा फासायचा नव्हता.
यहेज्केल 20 : 15 (MRV)
वाळवंटात त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले. ते असे जी भूमी मी त्यांना देत होतो, तेथे मी त्यांना नेणार नाही. ती समृध्द भूमी होती. तो प्रदेश सर्व देशांपेक्षा सुंदर होता.
यहेज्केल 20 : 16 (MRV)
“इस्राएलच्या लोकांनी माझे नियम पाळण्यास नकार दिला. ते माझ्या नियमनुसार वागले नाहीत. त्यांनी माझ्या सुट्ट्यांच्या दिवसाला महत्व दिले नाही. त्यांची मने त्या गलिच्छ मूर्तीमध्ये गुंतली असल्याने ते असे वागले.
यहेज्केल 20 : 17 (MRV)
पण मला त्यांची दया आल्याने मी त्यांचा वाळवंटात संपूर्ण नाश केला नाही.
यहेज्केल 20 : 18 (MRV)
मी त्यांच्या मुलांशी वाळवंटात बोललो. मी त्यांना सांगितले, “तुमच्या आई-वडिलासारखे होऊ नका. त्यांच्या गलिच्छ मूर्तीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका. नियम पाळू नका. त्यांच्या आज्ञा पाळू नका. त्यांच्या त्या गलिच्छ गोष्टीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका.
यहेज्केल 20 : 19 (MRV)
मी परमेश्वर आहे, मीच तुमचा देव आहे. माझे नियम पाळा. माझ्या आज्ञांचे पालन करा. मी सांगतो तसे वागा.
यहेज्केल 20 : 20 (MRV)
माझ्या सुट्ट्यांच्या दिवसांचे महत्व तुम्हाला वाटते हे दाखवा ते दिवस हे तुमच्या माझ्यामधील विशेष खूण आहे, ह्याची आठवण ठेवा. मी परमेश्वर आहे आणि ते सुट्ट्यांचे दिवस ‘मी तुमचा देव आहे’ हेच दाखवितात.
यहेज्केल 20 : 21 (MRV)
“पण ती मुले माझ्याविरुध्द गेली. त्यांनी माझे नियम मानले नाहीत. माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. खरे म्हणजे, माझे नियम चांगले आहेत. माणसाने ते पाळल्यास, तो अवश्य जगेल. त्यांनी माझ्या सुट्टयांच्या विशेष दिवसांकडे दुर्लक्ष केले. मग माझा राग किती आहे, हे त्यांना कळावे म्हणून मी वाळवंटात त्यांचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले.
यहेज्केल 20 : 22 (MRV)
पण मी मलाच आवरले. मी इस्राएलला मिसरमधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्या सर्वांसमक्ष इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला कलंक लावायचा नव्हता.
यहेज्केल 20 : 23 (MRV)
म्हणून त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले की मी त्यांना इतर राष्ट्रांत पसरवीन, पुष्कळ वेगवेगळ्या देशांत पाठवीन.
यहेज्केल 20 : 24 (MRV)
“इस्राएल लोकांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी माझ्या नियमाप्रमाणे वागायचे नाकारले. माझ्या सुटृ्यांच्या विशेष दिवसांना त्यांनी महत्व दिले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अमंगळ मूर्तीचीच पूजा केली.
यहेज्केल 20 : 25 (MRV)
म्हणून मी त्यांना वाईट नियम शिकविले त्यांना शुद्धीवर न आणणाऱ्या आज्ञा मी त्यांना दिल्या.
यहेज्केल 20 : 26 (MRV)
त्यांच्या दानांबरोबर मी त्यांना अमंगळ होऊ दिले. त्यांनी स्वत:च्याच पहिल्यां अपत्यांचेसुध्दा बळी देण्यास सुरवात केली. अशा रीतीने, मी त्यांचा नाश केल्यावर त्यांना मीच परमेश्वर आहे. हे समजेल!’
यहेज्केल 20 : 27 (MRV)
तेव्हा मानवपुत्रा, आता इस्राएलाच्या लोकांशी बोल ‘परमेश्वर, माझा देव पुढील गोष्टी सांगतो, असे साग: इस्राएलच्या लोकांनी माझी निंदा केली आणि माझ्याविरुद्ध कट रचले.
यहेज्केल 20 : 28 (MRV)
पण तरीसुद्धा, त्यांना कबूल केलेल्या प्रदेशात मी त्यांना आणले. त्यांनी टेकड्या व हिरवीगार झाडे पाहिली आणि ते त्या सर्व ठिकाणी पूजा करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्याबरोबर बळी आणि संतापदायक नैवेद्य नेले सुंदर गंध निर्माण करणारे यज्ञ त्यांनी केले, त्यांनी तेथे पेये अर्पण करण्यासाठी नेली.
यहेज्केल 20 : 29 (MRV)
मी इस्राएली लोकांना विचारले की तुम्ही ह्या उच्चस्थानी कशा करिता जात आहात? आज देखिल ते उच्चस्थान आहे.”
यहेज्केल 20 : 30 (MRV)
देव म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनी अशा सर्व वाईट गोष्टी केल्या म्हणून त्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो, तुमच्या पूर्वजांनी केलेली कृत्ये करुन तुम्ही स्वत:ला अमंगळ करुन घेतले आहे, गलिच्छ करुन घेतले आहे, तुम्ही वेश्येप्रमाणे वागला आहात. तुमच्या वाडवडिलांनी पूजलेल्या भयंकर दैवतांसाठी तुम्ही माझा त्याग केला.
यहेज्केल 20 : 31 (MRV)
तुम्ही तुमच्या पूर्वजांनी अर्पण केलेल्या गोष्टीच आजही दैवताला अर्पण करीत आहात. तुमच्या खोट्या देवांना बळी म्हणून तुम्ही स्वत:चीच मुले आगीत टाकीत आहात. आजसुद्धा तुम्ही त्या घाणेरड्या, अमंगळ देवांबरोबर स्वत:ला घाणेरडे करुन घेत आहात. मी तुम्हाला माझ्याजवळ येऊ देईन आणि तुम्हाला सल्ला देईन. उपदेश करीन असे खरंच तुम्हाला वाटते का? मी परमेश्वर व प्रभू आहे. मी स्वत:ची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की मी तुमच्या प्रश्र्नांना उत्तर देणार नाही वा तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही.
यहेज्केल 20 : 32 (MRV)
तुम्हाला इतर राष्ट्रांसारखे व्हायचे आहे असे सारखे तुम्ही म्हणत राहता. पण तुमचा उद्देश आणि इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांतील लोकांसारखे वागता. तुम्ही लाकडाच्या तुकड्यांची व दगडांची (मूर्तीची) पूजा करता.”
यहेज्केल 20 : 33 (MRV)
परमेश्वर, माझा देव, म्हणतो, “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी राजा म्हणून तुमच्यावर राज्य करीन. पण मी सामर्थ्यशाली हात तुमच्यावर उगारीन. तुम्हाला शिक्षा करीन. माझा तुमच्यावरचा क्रोध मी प्रकाट करीन.
यहेज्केल 20 : 34 (MRV)
मी ह्या इतर राष्ट्रांतून तुम्हाला बाहेर काढीन. इतर राष्ट्रांत तुम्हाला पसरविले पण मी तुम्हाला ह्या सर्व देशांतून परत आणून एकत्र करीन. मग मी माझा हात तुमच्यावर उचलून तुम्हाला शिक्षा करीन. मी तुमच्यावर माझा राग किती आहे हे दाखवून देईल.
यहेज्केल 20 : 35 (MRV)
मी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच वाळवंटात नेईन. पण तेथे इतर राष्ट्रे वसत असतील. आपण समोरासमोर उभे राहू व मग मी तुमचा न्यायनिवाडा करीन.
यहेज्केल 20 : 36 (MRV)
मिसरजवळच्या वाळवंटात मी जसा तुमच्या पूर्वजांचा न्यायनिवाडा केला तसाच मी तुमचाही करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
यहेज्केल 20 : 37 (MRV)
“मी तुम्हाला अपराधी समजून, कराराप्रमाणे तुम्हाला शिक्षा करीन.
यहेज्केल 20 : 38 (MRV)
माझ्याविरुध्द गेलेल्या पापी लोकांना तुमच्या मातृभूमीतून मी हालवीन. ते इस्राएलमध्ये कधीच परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे पटेल.”
यहेज्केल 20 : 39 (MRV)
इस्राएल लोकांनो, परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या, कोणाला “त्या अमंगळ मूर्तीची पूजा करावीशी वाटत असेल, तर खुशाल करु दे. पण नंतर माझ्या सल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही त्या गलिच्छ मूर्तीना बलिदान देऊन ह्यापुढे अजिबात माझ्या नावाला बट्टा लावू शकणार नाही.”
यहेज्केल 20 : 40 (MRV)
परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “लोकांनी माझ्या पवित्र डोंगरावर इस्राएलच्या उंच पर्वतावर माझी सेवा करण्यासाठी आलेच पाहिजे. सर्व इस्राएलचे लोक त्यांच्या भूमीवर असतील. ते त्यांच्या स्वत:च्या देशात असतील. माझा सल्ला विचारायला येण्याची तीच जागा आहे. तेथेच तुम्ही मला नैवेद्य दाखविला पाहिजे. त्या जागीच तुम्ही मला अर्पण करण्यासाठी तुमच्या पिकाचा पहिला भाग आणलाच पाहिजे. तुमची पवित्र दाने तेथेच तुम्ही मला दिली पाहिजेत.
यहेज्केल 20 : 41 (MRV)
मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन.
यहेज्केल 20 : 42 (MRV)
तुमच्या पूर्वजांना जी भूमी देण्याचे मी वचन दिले होते, त्या इस्राएलच्या भूमीत मी तुम्हाला परत आणीन, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजेल.
यहेज्केल 20 : 43 (MRV)
तेथेच तुम्हाला अमंगळ करणाऱ्या तुमच्या वाईट कृत्यांची आठवण होऊन, तुम्ही शरमिंदे व्हाल.
यहेज्केल 20 : 44 (MRV)
इस्राएल लोकांनो, तुम्ही खूप वाईट कृत्ये केलीत. त्यासाठी तुमचा सर्वनाश व्हायला पाहिजे होता. पण माझे नाव राखण्यासाठी तुम्हाला योग्य अशी शिक्षा मी केली नाही. ह्यावरुन तुम्हाला मीच देव आहे हे समजून येईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
यहेज्केल 20 : 45 (MRV)
मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला,
यहेज्केल 20 : 46 (MRV)
“मानवपुत्रा, यहूदाच्या दक्षिणेकडच्या भागाकडे, म्हणजे नेगेवकडे पाहा. नेगेवच्या रानाविरुद्ध बोल.
यहेज्केल 20 : 47 (MRV)
नेगेवच्या रानाला सांग, ‘परमेश्वराचे शब्द ऐका. प्रभू, माझा देव, असे म्हणाला की तुझ्या रानात आग लावण्याची मी तयारी केली आहे. ती आग प्रत्येक झाड-हिरवे व वाळलेले जाळेल. ज्वाळा विझणार नाहीत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा प्रदेश आगीत जळेल.
यहेज्केल 20 : 48 (MRV)
मी, परमेश्वराने, आग लावली हे सर्व लोकांना समजेल. ती विझणार नाही.”
यहेज्केल 20 : 49 (MRV)
मग मी (यहेज्केल) म्हणालो, “बाप रे! परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे सांगितले, तर मी गोष्ट सांगत आहे. असे लोक म्हणतील हे खरेच घडून येईल. ह्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49