होशेय 7 : 1 (MRV)
“मी इस्राएलला बरे करीन.मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल. लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल. त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
होशेय 7 : 2 (MRV)
मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही. त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत. मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.
होशेय 7 : 3 (MRV)
त्यांची दुष्कृत्ये त्यांत्या राजाला आनंद देतात. त्यांची दैवते त्यांच्या नेत्यांना खूश करतात.
होशेय 7 : 4 (MRV)
रोटीवाला रोट्या बनविण्यासाठी कणीक मळतो तो रोटी भट्टीत ठेवतो रोटी फुगत असताना तो आच मोठी ठेवत नाही. पण इस्राएलचे लोक तसे नाहीत. ते त्यांची आच नेहमीच मोठी ठेवतात.
होशेय 7 : 5 (MRV)
आमच्या राजाच्या दिवशी, ते आच जास्त मोठी करतात. ते पेयांच्या मेजवान्या देतात. मद्याच्या गरमीने नेत्यांना मळमळते. मग राजाही परमेश्वराच्या निंदकांत सामील होतो.
होशेय 7 : 6 (MRV)
लोक कट रचतात. त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात. त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते. आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.
होशेय 7 : 7 (MRV)
ते तापलेल्या भट्टीप्रमाणे आहेत. त्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांचा नाश केला. त्यांचे सर्व राजे पडले पण एकानेही मदतीसाठी मला हाक मारली नाही.”
होशेय 7 : 8 (MRV)
“एफ्राईम राष्ट्राबरोबर मिसळतो तो दोन्हीकडून न भाजलेल्या भाकरीप्रमाणे आहे.
होशेय 7 : 9 (MRV)
परके एफ्राईमची शक्ती नष्ट करतात. पण एफ्राईमला ते कळत नाही. त्याच्यावर पिकलेले केस पसरले आहेत. पण ते त्याला माहीत नाही.
होशेय 7 : 10 (MRV)
एफ्राईमचा गर्व त्यांच्याविरुध्द बोलतो लोकांना खूपच अडचणी आहेत, तेरी ते परमेश्वराकडे, त्यांच्या परमेश्वराकडे परत जात नाहीत. ते मदतीसाठी त्याच्याकडे पाहात नाहीत.
होशेय 7 : 11 (MRV)
म्हणजेच एफ्राईम मूर्ख पारव्याप्रमाणे बेअक्कल झाला आहे. लोकांनी मदतीसाठी मिसरला हाक मारली. ते मदत मागायला अश्शूरकडे गेले.
होशेय 7 : 12 (MRV)
ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे, पण मी त्यांना सापळ्यात पकडीन. मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन, आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन. त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
होशेय 7 : 13 (MRV)
ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे. त्यांनी माझा त्याग केला. त्यांनी माझी आज्ञा पाळण्यांस नकार दिला म्हणून त्यांचा नाश होईल. मी त्या लोकांचे रक्षण केले. पण ते माझ्याविरुध्द खोटे बोलतात.
होशेय 7 : 14 (MRV)
मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत. हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वत:ला माझ्यापासून अलगच करतात मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
होशेय 7 : 15 (MRV)
मी त्यांना शिकवण दिली आणि त्यांचे हात बळकट केले. पण त्यांनी माझ्याविरुध्द दुष्ट बेत रचले आहेत.
होशेय 7 : 16 (MRV)
ते मोडक्या धनूष्याप्रमाणे आहेत. त्यांनी दिशा बदलल्या पण ते परत माझ्याकडे आले नाहीत. त्यांचे नेते त्यांच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारतात. पण ते तलवारीच्या वाराने मारले जातील. मग मिसरचे लोक त्यांना हसतील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16