यशया 51 : 1 (MRV)
“तुम्ही काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता. तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे धाव घेता. माझे ऐका. तुम्ही तुमचे वडील अब्राहाम यांच्याकडे पाहावे तुम्हाला ज्यापासून कापून काढले तो तो खडक आहे.
यशया 51 : 2 (MRV)
अब्राहाम तुमचा पिता आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहावे. जिने तुम्हाला जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहावे. मी बोलाविले तेव्हा अब्राहाम एकटा होता. मी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याने मोठ्या वंशाचा आरंभ केला. त्याचा वंश खूप वाढला.”
यशया 51 : 3 (MRV)
त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.
यशया 51 : 4 (MRV)
“माझ्या लोकांनो, माझे ऐका. नियम माझ्यापासूनच पुढे सुरू होतील. मी लोकांना प्रकाश ठरेल असा न्याय ठरवीन.
यशया 51 : 5 (MRV)
मी न्यायी आहे हे मी लवकरच दाखवीन. मी लवकरच तुम्हाला वाचवीन. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करीन. दूरदूरची ठिकाणे माझी वाट पाहत आहेत. ते त्यांच्या मदतीसाठी माझ्या सामर्थ्याची वाट पाहत आहेत.
यशया 51 : 6 (MRV)
वर स्वर्गाकडे पाहा, खाली पृथ्वीवर तुमच्या सभोवती पाहा. धुक्याच्या ढगाप्रमाणे आकाश नाहीसे होईल. पृथ्वी वृध्द होईल. पृथ्वीवरची माणसे मरतील, पण माझे तारण अनंत कालापर्यंत चालू राहील. माझ्या चांगुलपणाला अंत नाही.
यशया 51 : 7 (MRV)
ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते त्यांनी माझे ऐकावे. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागणाऱ्यांनी मी काय सांगतो ते ऐकावे. दुष्टांना घाबरू नका. त्यांनी तुमची निंदा केली तरी भिऊ नका.
यशया 51 : 8 (MRV)
का? त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल. कसर त्याना खाईल. ते लाकडाप्रमाणे होतील. वाळवी त्यांना खाईल. पण माझा चांगुलपणा चिरंतन राहील. माझे तारण अखंड चालू राहील.”
यशया 51 : 9 (MRV)
परमेश्वराच्या बाहूंनो जागे व्हा (सामर्थ्या) जागा हो ऊठ आणि बलवान हो. प्राचीन काळी वापरली होतीस तशी तुझी शक्ती वापर. राहाबचा पराभव करणारी शक्ती तूच आहेस. तू आक्राळ-विक्राळ मगरीचा पराभव केलास.
यशया 51 : 10 (MRV)
समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास. मोठ्या डोहातील पाणी तू आटविलेस. समुद्रातील अती सखोल भागाचा तू रस्ता केलास. तुझे लोक त्या रस्त्यावरून पार झाले आणि वाचविले गेले.
यशया 51 : 11 (MRV)
परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील. ते आनंदाने सियोनला परततील. ते खूप खूप सुखी होतील. त्यांचे सुख त्यांच्या डोक्यांवरील मुकुटांप्रमाणे निरंतर राहील. ते आनंदाने गात राहतील. सर्व दु:ख कायमचे नाहीसे होईल.
यशया 51 : 12 (MRV)
परमेश्वर म्हणतो, “मीच तो एकमेव ज्याने तुमचे दु:ख हलके केले. मग तुम्ही लोकांना का भ्यावे? ती जन्म मृत्यु पावणारी माणसेच आहेत. ते फक्त मनुष्यप्राणी आहेत. ते गवताप्रमाणे मरतात.”
यशया 51 : 13 (MRV)
परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले. त्याच्या सामर्थ्याने त्याने पृथ्वी निर्माण केली. आपल्या सामर्थ्याच्या जोरावरच त्याने पृथ्वीवर आकाश पसरविले. पण तुम्ही तुमचा निर्माता, देव आणि त्याच्या सामर्थ्याला विसरता म्हणूनच तुम्हाला दुखविणाऱ्या आणि रागावलेल्या माणसाला तुम्ही नेहमी घाबरता. त्या लोकांनी तुमच्या नाशाचा कट केला, पण आता ते कोठे आहेत? ते सर्व गेले.
यशया 51 : 14 (MRV)
तुरूंगातील कैद्यांना लवकरच सोडून देण्यात येईल. ते तुरूंगात कुजून मरणार नाहीत. त्यांना पोटभर अन्न मिळेल.
यशया 51 : 15 (MRV)
“मी, परमेश्वर, तुमचा देव आहे, मी समुद्र घुसळतो आणि लाटा निर्माण करतो.” (सर्वशक्तिमान परमेश्वर हेच त्याचे नाव आहे.)
यशया 51 : 16 (MRV)
“माझ्या सेवका, मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन. मी तुला माझ्या हाताने झाकून तुझे रक्षण करीन. नवीन स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करण्यासाठी मी तुझा उपयोग करीन. इस्राएलला ‘तुम्ही माझे लोक आहात.’ हे सांगण्यास मी तुला सांगीन.”
यशया 51 : 17 (MRV)
ऊठ, ऊठ, यरूशलेम, जागी हो. परमेश्वर तुझ्यावर फार रागावला होता. म्हणून तुला शिक्षा झाली. विषाचा प्याला प्यायला लागावा तशी ही शिक्षा होती. तू तो विषाचा प्याला प्यायलीस.
यशया 51 : 18 (MRV)
यरूशलेममध्ये खूप लोक होते. पण त्यातील कोणीही तिचे नेते झाले नाहीत. तिने वाढविलेली कोणीही मुले, तिला पुढे नेण्यास, मार्गदर्शक झाली नाहीत.
यशया 51 : 19 (MRV)
दोन-दोनच्या गटाने यरूशलेमवर संकटे आली चोरी आणि नुकसान, भूक आणि युध्द.तू संकटात असताना तुला कोणीही मदत केली नाही. कोणी तुझ्यावर दया केली नाही.
यशया 51 : 20 (MRV)
तुझे लोक दुबळे होऊन जमिनीवर पडले आणि तिथेच पडून राहिले. प्रत्येक चौकात ते पडून राहिले. ते जणू जाळ्यात पकडलेले प्राणी होते. त्यांना आणखी शिक्षा सहन न होईपर्यंत परमेश्वराने रागाने त्यांना शिक्षा केली. जेव्हा देव त्यांना म्हणाला की मी तुम्हाला आणखी शिक्षा करीन, तेव्हा ते अगदीच लोळागोळा झाले.
यशया 51 : 21 (MRV)
ऐक, बिचाऱ्या यरूशलेम, ऐक, मद्यप्याप्रमाणे तू दुबळी झाली आहेस. पण तू मद्य घेतले नाहीस. “त्या विषाच्या प्याल्याने” तुला दुर्बल केले आहे.
यशया 51 : 22 (MRV)
तुझा देव, प्रभू परमेश्वर, त्याच्या लोकांसाठी लढेल. तो तुला म्हणतो, “मी हा ‘विषाचा प्याला’ (शिक्षा) तुझ्यापासून दूर करीत आहे. मी आता तुझ्यावर रागावणार नाही. ह्यापुढे माझ्या रागामुळे तुला शिक्षा होणार नाही.
यशया 51 : 23 (MRV)
आता तुला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मी माझा राग काढीन व त्यांना शिक्षा करीन. त्या लोकांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते तुला म्हणाले, ‘आमच्यापुढे वाक. आम्ही तुला तुडवून जाऊ.’ त्यांनी बळजबरीने तुला वाकविले आणि माती तुडवल्याप्रमाणे ते तुझ्या पाठीवरून चालले. तू जणू काही त्यांचा रस्ता होतीस.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: