यिर्मया 14 : 1 (MRV)
अवर्षणाबद्दल यिर्मयाला परमेश्वराने पुढील संदेश दिला.
यिर्मया 14 : 2 (MRV)
“यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे. यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत ते जमिनीवर पडून आहेत. यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत.
यिर्मया 14 : 3 (MRV)
नेते मंडळी आपल्या नोकरांना पाणी आणण्यासाठी पाठवितात. नोकर पाण्याच्या टाक्यांकडे जातात, पण त्यांना थोडेसुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना रिकामी भांडी घेऊन परत यावे लागते. म्हणून ते लज्जित व खजील होऊन आपले चेहरे झाकून घेतात.
यिर्मया 14 : 4 (MRV)
कोठेही पाऊस न पडल्यामुळे कोणीही पिकांसाठी जमिनीची मशागत करीत नाही.शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे त्यांनी आपले चेहरे झाकून घेतले आहेत.
यिर्मया 14 : 5 (MRV)
कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसाला एकटेच सोडून देते.
यिर्मया 14 : 6 (MRV)
उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे हवा हुंगतात. पण त्यांना कोठेही काहीही खाण्यालायक दिसत नाही. कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.”
यिर्मया 14 : 7 (MRV)
या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत. परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर. कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे. आम्ही तुझ्याशी पापाचरण केले,
यिर्मया 14 : 8 (MRV)
देवा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. संकटकाळी तू इस्राएलला वाचवितोस. पण, आता, तू, फक्त रात्री मुक्काम करुन पुढे जाणाऱ्या प्रवाशासारखा वाटतोस.
यिर्मया 14 : 9 (MRV)
अचानकपणे हल्ला झाल्यावर चकित झालेल्या माणसाप्रमाणे तू वाटतोस. कोणालाही वाचविण्यास असमर्थ असलेल्या हतबल सैनिकासारखा तू दिसतोस. पण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो तेव्हा आम्हाला मदत न करता जाऊ नकोस.”
यिर्मया 14 : 10 (MRV)
यहूदाच्या लोकांबद्दल देवाचे म्हणणे असे आहे: “यहूदाच्या लोकांना माझा त्याग करणे आवडते. माझा त्याग करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. तेव्हा आता परमेश्वर त्यांचा स्वीकार करणार नाही. तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.”
यिर्मया 14 : 11 (MRV)
नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या लोकांच्या भल्यासाठी तू विनवणी करु नकोस.
यिर्मया 14 : 12 (MRV)
यहूदाचे लोक कदाचित् उपवास करुन माझी प्रार्थना करतील. पण ती त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. जरी त्यांनी मला होमार्पण व धान्यार्पणचा नैवेद्य दाखविला, तरी मी त्या लोकांचा स्वीकार करणार नाही. मी युद्धात यहूदाच्या लोकांचा नाश करीन. अन्न तोडून मी त्यांची उपासमार करीन. भयंकर रोगराई पसरवून मी त्यांना नष्ट करीन.”
यिर्मया 14 : 13 (MRV)
पण मी परमेश्वराला म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, संदेष्टे तर लोकांना काही वेगळेच सांगत होते. ते लोकांना सांगत होते, ‘शत्रू कधीच तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुमची कधीही उपासमार होणार नाही. परमेश्वर तुमच्या देशात शांती राखेल.”
यिर्मया 14 : 14 (MRV)
मग परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना आज्ञा केली नाही वा त्यांच्याशी बोललोही नाही. ते लोकांपुढे खोटे दृष्टान्त सांगतात, त्यांना मोहजालात फसवितात व स्वत:चे स्वप्नरंजन करतात.
यिर्मया 14 : 15 (MRV)
माझ्या नावावर प्रवचने देणाऱ्या संदेष्ट्यांबद्दल बोलायचे झालेच तर, मी त्यांना पाठविले नाही. ते म्हणतात ‘या देशावर कोणीही हल्ला करणार नाही.’ ह्या देशाची कधीही उपासमार होणार नाही.’ पण ते संदेष्टेच उपासमारीने मरतील. शत्रू त्यांना ठार करील.
यिर्मया 14 : 16 (MRV)
आणि ज्या लोकांशी ते संदेष्टे बोलले, ते लोक रस्त्यावर उघडे पडतील. उपासमार व शत्रू यांचे ते बळी ठरतील. त्यांचे वा त्यांच्या बायकामुलांचे दफन करण्यास कोणीही असणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन.
यिर्मया 14 : 17 (MRV)
“यिर्मया, यहूदाच्या लोकांना माझा संदेश सांग: ‘माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेत. माझ्या कुमारी मुलीसाठी मी रात्रंदिवस अव्याहतपणे आक्रोश करीन. माझ्या लोकांसाठी मी न थांबता आक्रोश करीन. का? कारण कोणीतरी त्यांच्यावर वार करुन त्यांना चिरडले आहे. ते लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
यिर्मया 14 : 18 (MRV)
मी जर त्या देशात गेलो, तर मला तलवारीने मारले गेलेले लोक दिसतील. मी जर शहरात गेलो, तर मला सर्वत्र दौर्बल्य आढळेल. कारण लोकांच्याजवळ अन्न नाही. याजकांना आणि संदेष्ट्यांना परदेशात नेले आहे.”‘
यिर्मया 14 : 19 (MRV)
“परमेश्वरा, तू यहूदाला पूर्णपणे त्याज्य ठरविले आहेस का? सियोनचा तुला तिरस्कार वाटतो का? आमची स्थिती परत न सुधारण्याइतके तू आमचे नुकसान केले आहेस. तू असे का केलेस? आम्हाला शांती पाहिजे होती. पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही. जखमा भरुन येण्याची आम्ही आशा केली, पण आमच्या वाट्याला फक्त भीती आली.
यिर्मया 14 : 20 (MRV)
परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझे अपराध केले.
यिर्मया 14 : 21 (MRV)
परमेश्वरा, तुझ्या नावाचा लौकिक राखण्याकरिता, आम्हाला दूर लोटू नकोस तुझ्या वैभवशाली सिंहासनाचा मान राख. आमच्याशी केलेला करार आठव. त्या कराराचा भंग करु नकोस.
यिर्मया 14 : 22 (MRV)
परदेशातील मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य नाही. पावसाच्या सरी पाडण्याची ताकद आकाशात नाही. तूच एक आमचे आशास्थान आहेस. या सर्व गोष्टी करणारा तूच एकमेव आहेस.”
❮
❯