यहोशवा 11 : 1 (MRV)
या सर्व घटना हासोराचा राजा याबीन याने ऐकल्या. तेव्हा त्याने अनेक राजांच्या फौजा एकत्र आणण्याचे ठरवले. मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचा राजा, अक्षाफाचा राजा.
यहोशवा 11 : 2 (MRV)
तसेच उत्तरेत डोंगराळ प्रदेशात व वाळवंटी भागात राज्य करीत असलेले राजे यांना याबीनने त्याप्रमाणे कळवले. किन्नेरोथ, नेगेव येथील व पश्चिमेकडील डोंगर उत्तरणीच्या भागातील राजांनाही निरोप पाठवले. पश्चिमेकडील नाफोत दोर येथील राजाला तसेच
यहोशवा 11 : 3 (MRV)
पूर्व व पश्चिमेच्या कनानी लोकांच्या राजांनाही कळवले. अमोरी, हित्ती, परिज्जी व डेंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना तसेच हर्मोन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मिस्पा जवळील हिव्वी लोकांनाही खबर दिली.
यहोशवा 11 : 4 (MRV)
तेव्हा या सर्व राजांच्या फौजा एकत्र आल्या. अगणित योध्दे जमा झाले. घोडे, रथ बहुसंख्य होते. ती एक अतिविशल सेना होती असंख्य माणसांचा समुदाय समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांसारखा पसरला होता.
यहोशवा 11 : 5 (MRV)
हे सर्व राजे मेरोम या लहानशा नदीजवळ भेटले. त्या सर्वांनी तेथेच तळ ठोकला आणि ते इस्राएलविरुध्द लढाईची आखणी करू लागले.
यहोशवा 11 : 6 (MRV)
तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याला घाबरू नको. मी तुमच्याहातून त्यांचा पराभव करवीन. उद्या या वेळेपर्यंत तुम्ही त्या सर्वांचा संहार केलेला असेल. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडा व रथांना आगी लावा.”
यहोशवा 11 : 7 (MRV)
यहोशवा व त्याचे सैन्य यांनी शत्रूला विस्मयचकित केले. मेरोम नदीपाशीच त्यांनी शत्रूवर हल्ला केला.
यहोशवा 11 : 8 (MRV)
इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पराभव केला परमेश्वरानेच त्यांना हे बळ दिले. इस्राएलने त्यांचा सीदोन महानगरापर्यंत तसेच मिस्त्रपोथ-माईमापर्यंत व पूर्वेकडील मिस्पाच्या खोऱ्यापर्यंत पाठलाग केला. शत्रुसैन्यातील सर्वांचा संहार होईपर्यंत इस्राएल लोकांनी लढा दिला.
यहोशवा 11 : 9 (MRV)
परमेश्वराने सांगितले होते तसेच यहोशवाने केले. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडले व रथ अगीच्या भक्ष्यस्थानी टाकले.
यहोशवा 11 : 10 (MRV)
मग मागे वळून यहोशवाने हासोर घेतले. हासोरच्या राजाला त्याने ठार केले. (इस्राएलविरुध्द लढणाऱ्या सर्व राज्यांचे नेतृत्व हासोरने केले होते.)
यहोशवा 11 : 11 (MRV)
इस्राएल सैन्याने या नगरातील सर्वांना ठार केले. सर्वांचा समूळनाश केला. जिवंतपणाची खूण म्हणून शिल्लक ठेवली नाही. नंतर नगराला आग लावली.
यहोशवा 11 : 12 (MRV)
यहोशवाने ही सर्व नगरे घेतली तेथील सर्व राजांना ठार केले. या नगरांमधील सर्वच्या सर्व गोष्टींचा विध्वंस केला. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे त्याने हे केले.
यहोशवा 11 : 13 (MRV)
पण टेकड्यांवर वसवलेली कोणतीही नगरे इस्राएल सैन्याने जाळली नाहीत. हासोर हे टेकडीवर वसलेले व त्यांनी जाळलेले एकमेव नगर ते यहोशवाने जाळले.
यहोशवा 11 : 14 (MRV)
या नगरांमध्थे मिळालेली लूट इस्राएल लोकांनी स्वत:करता ठेवली. तसेच तेथील जनावरेही घेतली. पण तेथील लोकांना मारले कोणालाही जिवंत ठेवले नाही.
यहोशवा 11 : 15 (MRV)
परमेश्वराने आपला सेवक मोशे याला फार पूर्वीच ही आज्ञा दिली होती. नंतर मोशेने हे यहोशवाला सांगितले होते. यहोशवाने परमेश्वराचे ऐकले. परमेश्वराने मोशेला सांगितले ते ते सर्व यहोशवाने न चुकता केले.
यहोशवा 11 : 16 (MRV)
अशाप्रकारे यहोशवाने त्या संपूर्ण प्रदेशातील सर्व लोकांचा पराभव केला. डोंगराळ प्रदेश, नेगेव, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमेकडील डोंगरपायथा, यार्देनचे खोरे. इस्राएलचा व त्याच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश यावर त्याने ताबा मिळवला.
यहोशवा 11 : 17 (MRV)
सेईर जवळच्या हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनच्या खोऱ्यातील बालगाद पर्यंतचा सर्व प्रदेशही यहोशवाने हस्तगत केला. तेथील सर्व सजांना बंदी करून त्यांना ठार केले.
यहोशवा 11 : 18 (MRV)
अनेक दिवस या राजांशी त्याने हा लढा दिला होता.
यहोशवा 11 : 19 (MRV)
या सर्व प्रदेशातील फक्त एकाच नगराने इस्राएल लोकांशी शांततेचा करार केला. ते म्हणजे गिबोन मधील हिव्वी. इतर सर्व नगरांचा युध्दात पाडाव झाला.
यहोशवा 11 : 20 (MRV)
आपण समर्थ आहोत असे त्यांना वाटावे अशी परमेश्वराचीच इच्छा होती. जेव्हा ते इस्राएलविरुध्द लढायला उभे राहतील. तेव्हा त्यांच्यावर दया न दाखवता संहार करता येईल. मोशेला परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे, यहोशवा त्यांचा धुव्वा उडवेल (अशीच ती योजना होती)
यहोशवा 11 : 21 (MRV)
हब्रोन, दबीर, अनाब व यहुदा या डोंगराळ प्रदेशातील भागात अनाकी लोक राहात असत. यहोशवाने त्यांच्याशी लढाई करुन तेथील लोकांचा व नगरांचा संपूर्ण संहार केला.
यहोशवा 11 : 22 (MRV)
इस्राएलाच्या देशात एकही अनाकी माणूस शिल्लक उरला नाही. गज्जा, गथ व अश्दोद येथे मात्र काही अनाकी लोक जिवंत राहीले.
यहोशवा 11 : 23 (MRV)
परमेश्वराने मोशेला फार पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे यहोशवाने सर्व इस्राएल देश ताब्यात घेतला. परमेश्वराने कबूल केल्या प्रमाणे हा प्रदेश इस्राएल लोकांना दिला. यहोशवाने इस्राएलाच्या वंशांप्रमाणे त्यांची हिश्श्यांमध्ये वाटणी केली. अखेर युध्द संपले आणि शांतता नांदू लागली.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23