शास्ते 6 : 1 (MRV)
नंतर पुन्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराने निषिध्द म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्यांना सलग सात वर्षे ठेवले.
शास्ते 6 : 2 (MRV)
मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इस्राएल लोकांशी क्रौर्यानेही वागत. तेव्हा इस्राएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहांमध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नधान्य ठेवत.
शास्ते 6 : 3 (MRV)
कारण मिद्यानी आणि पूर्वेकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत.
शास्ते 6 : 4 (MRV)
ते या प्रदेशात तळ देत आणि इस्राएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गज्जा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची वाट लावली. त्यामुळे इस्राएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्व्यामेंढ्या, गुरेढोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत.
शास्ते 6 : 5 (MRV)
आपला कुटुंब कबिला आणि जनावरे यांच्या सकट मिद्यानी लोकांनी येऊन तेथे तळ ठोकला. टोळधाडीसारखे ते घुसले. ते लोक व त्यांचे उंट यांची संख्या अक्षरश: अगाणित होती. त्यांनी या प्रदेशात येऊन त्याची नासधूस करायला सुरुवात केली.
शास्ते 6 : 6 (MRV)
त्यामुळे इस्राएल लोक कंगाल झाले. त्यांनी मदतीसाठी परमेश्वराच्या नावाने आक्रोश करायला सुरुवात केली.
शास्ते 6 : 7 (MRV)
मिद्यानी लोकांच्या छळणुकीमुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला.
शास्ते 6 : 8 (MRV)
तेव्हा परमेश्वराने एका संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवले. तो संदेष्टा इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे. “मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. तेथून मी तुम्हाला सोडवून बाहेर आणले.
शास्ते 6 : 9 (MRV)
मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची सुटका केली. नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला. पुन्हा मी तुम्हाला वाचवले. त्यांना मी तो देश सोडायला लावला, आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली.’
शास्ते 6 : 10 (MRV)
मग मी तुम्हाला सांगितले, “मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही अमोरी लोकांच्या देशात राहाल पण त्यांच्या दैवतांची उपासना करु नका.’ पण तुम्ही माझे ऐकले नाही.”
शास्ते 6 : 11 (MRV)
याच सुमाराला गिदोन नावाच्या माणसाकडे परमेश्वराचा दूत आला. आणि अफ्रा येथे योवाशच्या मालकीच्या ओक वृक्षाखाली बसला. योवाश अबियेजरच्या कुळातील होता. गिदोन योवाशचा मुलगा होता. गिदोन द्राक्षकुंडात गव्हाची झोडणी करत होता. परमेश्वराचा दूत गिदोनच्या शेजारी बसला. गिदोन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता.
शास्ते 6 : 12 (MRV)
त्याला दर्शन देऊन परमेश्वराचा दूत म्हणाला, “हे वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”
शास्ते 6 : 13 (MRV)
तेव्हा गिदोन म्हणाला, “परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर मग आमच्यावर ही वेळ का यावी? आमच्या पूर्वजांसाठी त्याने मोठे चमत्कार केले असे ऐकले आहे. परमेश्वराने आमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले असे ते सांगतात. पण परमेश्वराने तर आमची साथ सोडली आहे. मिद्यानी लोकांच्या तावडीत आम्ही सापडलो आहोत.”
शास्ते 6 : 14 (MRV)
मग परमेश्वर गिदोनकडे वळला व म्हणाला, “तुझ्या शक्तीचा वापर कर मिद्यानी लोकांपासून इस्राएल लोकांची सोडवणूक कर. त्यांना वाचवण्यासाठी मी तुला पाठवत आहे.”
शास्ते 6 : 15 (MRV)
पण गिदोन उत्तरादाखल म्हणाला, “मला क्षमा कर कारण मी इस्राएल लोकांना कसा काय वाचवू शकणार? मनश्शेच्या वंशात सगव्व्यात दुबळे माझे कूळ आहे आणि मी घरातला सर्वात धाकटा”
शास्ते 6 : 16 (MRV)
तेव्हा परमेश्वर गिदेनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.”
शास्ते 6 : 17 (MRV)
गिदोन परमेश्वराला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली तर तू खरोखरच परमेश्वर असल्याची मला खात्री पटवून दे.
शास्ते 6 : 18 (MRV)
आणि कृपा करून येथेच थांब. तुला अर्पण करायला मी भेट घेऊन येतो. तोपर्यंत येथून निघून जाऊ नको.”तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी थांबतो.
शास्ते 6 : 19 (MRV)
मग गिदोन गेला आणि त्याने एक करडू शिजवले. शिवाय, वीस पौंड पीठ घेऊन त्याचे बेखमीर भाकरी केल्या मग शिजवलेले मांस एका टोपलीत आणि त्याचा रस्सा एका पातेल्यात घेतला. मग बेखमीर भाकरींसह ते सर्व अन्न ओक वृक्षाखाली येऊन परमेश्वराला दिले.”
शास्ते 6 : 20 (MRV)
परमेश्वराचा दूत तेव्हा गिदोनला म्हणाला, “ते मांस आणि बेखमीर भाकरी त्या खडकावर ठेव आणि त्यावर रस्सा ओत.” गिदोनने त्याप्रमाणे केले.
शास्ते 6 : 21 (MRV)
परमेश्वराचा दूताच्या हातात एक काठी होती. तिच्या टोकाने त्याने मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला. तत्क्षणी खडकातून अग्नी प्रकट झाला. मांस व भाकरी जळून भस्मसात झाले आणि परमेश्वराचा दूत अदृश्य झाला.
शास्ते 6 : 22 (MRV)
तेव्हा गिदोनच्या लक्षात आले की इतका वेळ आपण परमेश्वराच्या दूताशी बोलत होतो. तेव्हा तो चित्कारला, “सर्व शक्तिमान परमेश्वरा! मी परमेश्वराच्या दूताला समोरासमोर पाहिले!”
शास्ते 6 : 23 (MRV)
तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “शांत हो! घाबरु नकोस. तू मरणार नाहीस.”
शास्ते 6 : 24 (MRV)
त्याठिकाणी गिदोनने परमेश्वराच्या उपासनेसाठी वेदी बांधली. तिचे नाव “परमेश्वर म्हणजे शांती” असे ठेवेले अफ्रा येथे ही वेदी अजूनही आहे. अफ्रा म्हणजे अबियेजेर कुटुंबाचे वसतिस्थान आहे.
शास्ते 6 : 25 (MRV)
त्याच रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला. तो म्हणाला, “तू तुझ्या वडीलांचा, सात वर्षाचा पूर्ण वाढलेला बैल घे. तुझ्या वडीलांनी बआल या खोट्या दैवताची वेदी बांधली आहे. तिच्या शेजारी लाकडी स्तंभही आहे. अशेरा या देवीच्या सन्मानार्थ तो आहे. बैलाकरवी तू तुझ्या वडीलांच्या मालकीची ती वेदी नष्ट कर आणि अशेरा स्तंभाची मोडतोड कर.
शास्ते 6 : 26 (MRV)
मग परमेश्वर देवासाठी योग्य अशा वेदीची उंचवट्यावर उभारणी कर. त्या वेदीवर या बैलाचा बळी देऊन त्याला जाळ. या यज्ञापर्णासाठी अशेरा स्तंभाच्या लाकडांचा वापर कर.”
शास्ते 6 : 27 (MRV)
तेव्हा आपल्या दहा सेवकांच्या मदतीने गिदोनने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने ते केले खरे पण घरातील आणि नगरातील माणसे बघतील या भीतीने हे काम त्याने दिवसाढवव्व्या न करता रात्री केले.
शास्ते 6 : 28 (MRV)
सकाळी लोक उठून बघतात तर बआलची वेदी उध्वस्त झोलेली! वेदीच्या शेजारचा अशेरा स्तंभ मोडून पडलेला. गिदोनने बांधलेली वेदी आणि तिच्यावर अर्पण केलेल्या बैलालाही त्यांनी पाहिले.
शास्ते 6 : 29 (MRV)
नगरातील लोक मग एकमेकांना विचारू लागले. “आपली वेदी कोणी पाडली? आपला अशेरा स्तंभ कोणी मोडला? या नवीन वेदीवर बैलाचे यज्ञार्पण कोणी केले?” असे अनेक प्रश्न ते आपले कुतूहल शमवायला विचारु लागले.कोणीतरी त्यांना सांगितले, “योवाशचा मुलगा गिदोन याने हे केले आहे.”
शास्ते 6 : 30 (MRV)
तेव्हा नगरवासी योवाशकडे येऊन त्याला म्हणाले, “तुझ्या मुलाला बाहेर आण. त्याने बआल वेदीची आणि तिच्या शेजारच्या अशेरा स्तंभाची मोडतोड केलेली आहे. तेव्हा त्याला मृत्युदंड दिलाच पाहिजे.”
शास्ते 6 : 31 (MRV)
तेव्हा भोवतालच्या जमावाला योवाश म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेणार का? त्याला तारणार का? जो बआलाची बाजू घेईल त्याला सकाळपर्यंत मृत्युदंड दिला जावा. बआल जर खरा देव असेल तर जेव्हा लोक वेदीची मोडतोड करायचा प्रयत्न करतील तेव्हा स्वत:चे रक्षण त्याने स्वत:च करुन दाखवावे.”
शास्ते 6 : 32 (MRV)
योवाश पुढे म्हणाला, “जर गिदोनने बआलच्या वेदीचा विध्वंस केला आहे तर बआलाच त्याच्याशी वाद करु द्या.” त्या दिवसापासून योवाशने गिदोनला नवे नाव दिले ते म्हणजे यरुब्बाल.
शास्ते 6 : 33 (MRV)
मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर लोक एकत्र येऊन इस्राएल लोकांविरुध्द लढण्यास सज्ज झाले. यार्देन पलीकडे जाऊन त्यांनी एज्रीलच्या खोऱ्यात तळ दिला.
शास्ते 6 : 34 (MRV)
गिदोनच्या ठायी परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि गिदोन सामर्ध्यवान बनला. अबियेजर कुटुंबातील लोकांना आपल्या मागोमाग येण्याचे आवाहन करण्यासाठी त्याने रणशिंग फुंकले.
शास्ते 6 : 35 (MRV)
मनश्शेच्या वंशातील सर्व लोकांकडे त्याने दूत रवाना केले. दूतांनी त्या लोकांना शस्त्रास्त्रे घेऊन युध्दासाठी सज्ज राहायला सांगितले. आशेर, जबुलून आणि नफताली यांच्या कडेही गिदोनने आपल्या दूतांकरवी असाच निरोप पाठवला. तेव्हा तेही सर्व लोक गिदोनला येऊन मिळाले.
शास्ते 6 : 36 (MRV)
मग गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्या हातून तू इस्राएल लोकांना वाचवणार आहेस, याची मला साक्ष पटव.
शास्ते 6 : 37 (MRV)
मी आता खव्व्यात कातरलेली लोकर ठेवतो. सर्व जमीन कोरडी राहून फक्त लोकरीवर दव पडलेले आढळले तर मला समजेल की इस्राएल लोकांचा बचाव करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे तू माझा उपयोग करणार आहेस.”
शास्ते 6 : 38 (MRV)
आणि नेमके तसेच घडले. गिदोन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि त्याने लोकर दाबून पाहिली तर त्यातून वाटीभर पाणी निघाले.
शास्ते 6 : 39 (MRV)
ते पाहून गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्यावर रागवू नको. मला आणखी एक गोष्ट विचारू दे. लोकरीद्वारे मला आणखी एकदा तुझी परीक्षा घ्यायची आहे. ह्या वेळी आजूबाजूची जमीन दवाने भिजलेली असताना लोकर मात्र कोरडी राहू दे.”
शास्ते 6 : 40 (MRV)
परमेश्वराने त्या रात्री तसेच करुन दाखवले. फक्त लोकर तेवढी कोरडी राहून भोवतालची जमीन दवाने ओली झाली होती.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40