लेवीय 13 : 1 (MRV)
परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
लेवीय 13 : 2 (MRV)
“एखाद्या माणसाच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ठ्यासारखा दिसत असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.
लेवीय 13 : 3 (MRV)
मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्ठा तपासावा व त्या चट्ठ्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्ठा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्ठा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
लेवीय 13 : 4 (MRV)
“त्या माणसाच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा चट्ठा पडलेल्या माणसाला सात दिवस इतर माणसापासून वेगळे ठेवावे.
लेवीय 13 : 5 (MRV)
सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्ठा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.
लेवीय 13 : 6 (MRV)
सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्ठा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.
लेवीय 13 : 7 (MRV)
“परंतु त्या माणसाने स्वत:ला शुद्ध ठरविण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
लेवीय 13 : 8 (MRV)
याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
लेवीय 13 : 9 (MRV)
“एखाद्या माणसाला महारोगाचा चट्ठा असेल तर त्याला याजकाकडे न्यावे.
लेवीय 13 : 10 (MRV)
याजकाने त्याला तपासावे; आणि जर त्याच्या कातडीला पांढच्या चट्ठ्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर
लेवीय 13 : 11 (MRV)
त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्याला काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
लेवीय 13 : 12 (MRV)
“एखाद्या माणसाच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्याला अंगभर तपासावे,
लेवीय 13 : 13 (MRV)
त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्याला दिसून आले तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.
लेवीय 13 : 14 (MRV)
पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा.
लेवीय 13 : 15 (MRV)
याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
लेवीय 13 : 16 (MRV)
“परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;
लेवीय 13 : 17 (MRV)
याजकाने पुन्हा त्याला तपासावे आणि जर त्याचा चट्ठा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
लेवीय 13 : 18 (MRV)
कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला
लेवीय 13 : 19 (MRV)
व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.
लेवीय 13 : 20 (MRV)
याजकाने त्याला तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्ठा आहे.
लेवीय 13 : 21 (MRV)
पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागाकातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
लेवीय 13 : 22 (MRV)
तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो चट्ठा आहे.
लेवीय 13 : 23 (MRV)
पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या माणसाला शुद्ध ठरवावे.
लेवीय 13 : 24 (MRV)
“एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात पांढरा डाग दिसून येईल.
लेवीय 13 : 25 (MRV)
तर याजकाने त्याला तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय.
लेवीय 13 : 26 (MRV)
पण तपासल्यावर त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती फुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
लेवीय 13 : 27 (MRV)
सातव्या दिवशी त्याने त्याला तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय;
लेवीय 13 : 28 (MRV)
परंतु तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
लेवीय 13 : 29 (MRV)
“एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्ठा असला,
लेवीय 13 : 30 (MRV)
तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ती चाई डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय.
लेवीय 13 : 31 (MRV)
तो चाईचा चट्ठा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्ठा असलेल्या व्यक्तीला त्याने सात दिवस वेगळे ठेवावे;
लेवीय 13 : 32 (MRV)
सातव्या दिवशी त्याने त्या चट्ठ्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
लेवीय 13 : 33 (MRV)
तर त्या माणसाने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या माणसाला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
लेवीय 13 : 34 (MRV)
सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या माणसाने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे.
लेवीय 13 : 35 (MRV)
परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली
लेवीय 13 : 36 (MRV)
तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या माणसाला अशुद्ध ठरवावे.
लेवीय 13 : 37 (MRV)
परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो माणूस शुद्ध झाला आहे; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
लेवीय 13 : 38 (MRV)
“कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत पांढरे डाग असतील.
लेवीय 13 : 39 (MRV)
तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीत्या अंगावरील ते तकतकीत डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय न करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
लेवीय 13 : 40 (MRV)
“कोणा माणसाचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो माणूस शुद्ध होय.
लेवीय 13 : 41 (MRV)
त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो माणूस शुद्ध आहे.
लेवीय 13 : 42 (MRV)
परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्ठा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.
लेवीय 13 : 43 (MRV)
मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,
लेवीय 13 : 44 (MRV)
तर त्या माणसाच्या डोक्यावर पडलेला चट्ठा महारोगाचा होय; तो माणूस अशुद्ध होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.”
लेवीय 13 : 45 (MRV)
“ज्याला महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांना इशारा देण्यासाठी ‘अशुद्ध अशुद्ध’ असे ओरडत जावे.
लेवीय 13 : 46 (MRV)
जोपर्यत त्याच्या अंगावर चट्ठा असेल तितक्या दिवसापर्यत त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे राहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
लेवीय 13 : 47 (MRV)
(47-48) “एकाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्ठा पडला, किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमाड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला पडला.
लेवीय 13 : 49 (MRV)
आणि तो चट्ठा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्ठा होय; तो याजकाला दाखवावा;
लेवीय 13 : 50 (MRV)
याजकाने तो चट्ठा तपासावा; चट्ठा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करुन ठेवावी.
लेवीय 13 : 51 (MRV)
(51-52) त्याने सातव्या दिवशी तो चट्ठा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे. याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे;
लेवीय 13 : 53 (MRV)
“परंतु तो चट्ठा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
लेवीय 13 : 54 (MRV)
याजकाने लोकांना ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
लेवीय 13 : 55 (MRV)
त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
लेवीय 13 : 56 (MRV)
“परंतु धुतल्यावर तो चट्ठा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
लेवीय 13 : 57 (MRV)
इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पुन्हा आला तर तो चट्ठा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
लेवीय 13 : 58 (MRV)
परंतु तो चट्ठा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर मग ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
लेवीय 13 : 59 (MRV)
लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्ठा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
❮
❯