स्तोत्रसंहिता 96 : 1 (MRV)
परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा. सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे.
स्तोत्रसंहिता 96 : 2 (MRV)
परमेश्वराला गाणे गा. त्याच्या नावाचा जयजयकार करा. चांगली बात्तमी सांगा. तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा.
स्तोत्रसंहिता 96 : 3 (MRV)
लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे. देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा.
स्तोत्रसंहिता 96 : 4 (MRV)
परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे. तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे.
स्तोत्रसंहिता 96 : 5 (MRV)
इतर देशांतले “देव” केवळ पुतळे आहेत. पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला.
स्तोत्रसंहिता 96 : 6 (MRV)
त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
स्तोत्रसंहिता 96 : 7 (MRV)
कुटुंबानो आणि राष्ट्रांनो, परमेश्वरासाठी स्तुतीपर आणि गौरवपर गीते गा.
स्तोत्रसंहिता 96 : 8 (MRV)
परमेश्वराच्या नावाचा जयजयकार करा. तुमची अर्पणे घेऊन मंदिरात जा.
स्तोत्रसंहिता 96 : 9 (MRV)
परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा. पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो.
स्तोत्रसंहिता 96 : 10 (MRV)
सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही. परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.
स्तोत्रसंहिता 96 : 11 (MRV)
स्वर्गांनो, सुखी राहा! पृथ्वीमाते आनंदोत्सव कर. समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा.
स्तोत्रसंहिता 96 : 12 (MRV)
शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा. जंगलातल्या वृक्षांनो गा आणि सुखी व्हा.
स्तोत्रसंहिता 96 : 13 (MRV)
परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा. परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.
❮
❯