यशया धडा 13
1. आमोजचा मुलगा यशया ह्याला देवाने बाबेलोनबद्दल दु:खदायक हा संदेश दिला.
2. देव म्हणाला,“जेथे काहीही उगवत नाही अशा ओसाड डोंगरावर ध्वज उभारा. लोकांना हाका मारा. हातांनी खुणा करा. त्यांना प्रतिष्ठितासाठी असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगा.”
3. देव पुढे म्हणाला, “मी त्या लोकांना इतरांपासून वेगळे केले आहे. मी स्वत: त्याच्यावर सत्ता गाजवीन. मी रागावलो आहे. मी माझ्या योध्द्यांना त्या लोकांना शिक्षा करण्यासाठी, गोळा केले आहे. मला ह्या सुखी लोकांचा अभिमान वाटतो.
4. “डोंगरावर मोठा आवाज होत आहे तो लक्षपूर्वक ऐका. खूप माणसांच्या गोंगाटासारखा तो आवाज आहे कारण पुष्कळ राज्यातील माणसे एकत्र येत आहेत. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या सैन्याला एकत्र बोलावीत आहे.
5. दूरच्या प्रदेशातून परमेश्वर व हे सैन्य येत आहे. क्षितिजापलीकडून ते येत आहेत. ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे. हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”
6. परमेश्वराने ठरविलेला खास दिवस जवळ आला आहे. तेव्हा आक्रोश करा व शोक करा शत्रूकडून तुमची लूट होण्याची वेळ जवळ येत आहे. सर्व शक्कितमान देव हे घडवून आणील.
7. लोकांचे धैर्य गळेल. त्यांची भीतीने गाळण उडेल.
8. प्रत्येक माणूस भेदरलेला असेल. बाळंत होत असलेल्या स्त्रीप्रमाणे भितीने त्यांच्या पोटात गोळा उठेल. त्यांची तोंडे अग्रीप्रमाणे लाल होतील. सर्वांच्याच तोंडावर ही कळा पाहून ते आश्चर्यचकीत होतील.
9. पाहा परमेश्वराचा खास दिवस येत आहे. तो फारच भयानक दिवस असेल. देव फारच संतप्त होईल. आणि तो देशाचा नाश करील. ह्या देशातील पापी लोकांना देश सोडण्यास तो भाग पाडील.
10. आकाश अंधकारमय होईल. सूर्य, चंद्र, तारे प्रकाश देणार नाहीत.
11. देव म्हणतो, “मी जगात वाईट गोष्टी घडवून आणीन. पाप्यांना त्यांच्या पापांबद्दल मी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचे गर्वहरण करीन. दुसऱ्यांशी क्षुद्र वृत्तीने वागणाऱ्या बढाईखोरांचा तोरा उतरवीन. तेव्हा थोडेच लोक शिल्लक राहतील.
12. दुर्मिळ सोन्याप्रमाणे चांगले लोकही थोडेच राहतील आणि शुध्द सोन्याहून त्यांची किंमत जास्त असेल.
13. माझ्या रागाने मी आकाशाला हलवेन व पृथ्वी तिच्या स्थानावरून ढळविली जाईल.”हे सर्व, सर्वशक्तिमान परमेश्वर रागावेल तेव्हा घडून येईल.
14. त्या वेळी बाबेलोनमधील प्रजा घायाळ हरणाप्रमाणे पळ काढेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे ते सैरावैरा धावतील. प्रत्येकजण आपल्या देशात व आपल्या लोकात पळून जाईल.
15. पण शत्रू त्यांचा पाठलाग करील. आणि शत्रूच्या हाती सापडणाऱ्याला शत्रू तलवारीने ठार मारील.
16. त्यांची घरे लुटली जातील. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील, त्यांच्या डोळ्यादेखत लहान मुलांना मरेपर्यंत मारले जाईल.
17. देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील.
18. ते बाबेलोनमधील तरूणावर हल्ला करून त्यांना मारतील मुलांना ते दया दाखविणार नाहीत. लहानग्यांची ते कीव करणार नाहीत. सदोम व गमोरा यांच्याप्रमाणे बाबेलोनचा संपूर्ण नाश होईल. देव सर्वनाश घडवून आणील मागे काहीही उरणार नाही.
19. “बाबेलोन सर्व देशांहून सुंदर आहे. बाबेलोनच्या रहिवाशांना आपल्या शहराबद्दल गर्व आहे.
20. पण बाबेलोनचे सौंदर्य टिकणार नाही. भविष्यकाळात लोक तेथे राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत. मेंढपाळ मेंढ्या चारण्यास तेथे येणार नाहीत.
21. वाळवंटातील जंगली प्राण्यांशिवाय तेथे कोणी राहणार नाही. बाबेलोनमधील घरे ओस पडतील. वटवाघुळांची व घुबडांची तेथे वस्ती असेल. बोकडांच्या रूपातील पिशाच्चे त्या घरात खेळतील.
22. बाबेलोनच्या भव्य आणि सुंदर इमारतीतून रानकुत्री आणि लांडगे केकाटतील, बाबेलोन नष्ट होईल. त्याचा शेवट जवळ आला आहे. मी त्याचा नाश लांबणीवर टाकू देणार नाही.”