1 तीमथ्याला धडा 6
1. जे सर्व गुलाम म्हणून विधर्मी मालकाच्या जुवाखाली काम करीत आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना पूर्ण आदर देण्यायोग्य समजावे. यासाठी की देवाच्या नावाची आणि आमच्या शिक्षणावर अशीतशी टीका होणार नाही.
2. व ज्या गुलामांचे मालक विश्वासणारे आहेत, त्यांनी त्यांच्या मालकांना कमी मान देऊ नये. कारण वस्तुस्थिती अशी आहे की, ते मालक त्यांचे बंधू आहेत, उलट त्या गुलामांनी त्यांच्या मालकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी. कारण ज्यांना लाभ मिळतो ते विश्वासणारे व प्रियजन आहेत. या गोष्टी लोकांना शिकीव व बोध करुन तसे करायला सांग.
3. जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभु याची जी निकोप वचने आणि देवाच्या सेवेचे खरे शिक्षण मान्य करीत नाही
4. तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क
5. आणि ज्यांची मने डागाळलेली आणि सत्यापासून हिरावलेली आहेत अशा माणसांची सततची भांडणे होतात, त्यांना असे वाटते की, देवाची सेवा करणे हे श्रीमंत होण्याचे माध्यम आहे.
6. वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे.
7. कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की, आपणसुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही.
8. जर आपणांस अन्र, वस्र (आसरा) असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे.
9. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात.
10. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वत:लाच पुष्कळ दु:ख करून घेतले आहे.
11. पण देवाच्या माणासा, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता, आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर.
12. विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा. ज्यासाठी तुला बोलाविले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस
13. जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.
14. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ.
15. जोे धन्य, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु ह्या धन्यवादिताच्या निर्णयानुसार, योग्य समय आल्यावर हे घडवून आणील.
16. ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यार्पांत पोहोंचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो. ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो.
17. या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी.
18. चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वत:जवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी.
19. असे करण्याने ते स्वत:साठी स्वर्गीय धनाचा साठा करतील जो भावी काळासाठी भक्क म पाया असे होईल त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल.
20. तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी विश्वासापासून दूर जा.
21. ज्यांनी हा दावा केला ते या “विद्येमुळे” विश्वासाच्या खुणेपासून ढळले आहेत. देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.