मार्क धडा 6
1. येशू तेथून निघाला आणि आपल्या गावी गेला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले.
2. शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या माणासाला ही शिकवण कोठून मिळाली? आणि त्याला कोणते ज्ञान देण्यात आले आहे की, यासारखे चमत्कार त्याच्या हातून केले जातात? तो सुतार नाही काय?
3. तो मरीयेचा मुलगाच ना? तो याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनाचा भाऊ नव्हे काय? व या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याच्या स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.
4. मग येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही पण त्याच्या गावात, शहरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात होत नसतो.’
5. आणि तेथे त्याला चमत्कार करता आला नाही. फक्त त्याने काही रोगी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. त्यांच्या अविश्वासमुळे त्याला आश्चर्य वाटले.
6. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.
7. त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला.
8. त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका.
9. त्यांनी वहाणा घालाव्यात पण जास्तीचा अंगरखा नको.
10. तो त्यांना म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत राहा.
11. आणि ज्या ठिकणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत ते गाव तुम्ही सोडून जा. आणि त्यांच्याविरूद्ध साक्ष म्हणून तुमच्या पायाची धूळ तेथेच झटकून टाका.
12. मग शिष्य गेले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी उपदेश केला.
13. त्यांनी पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना जैतुनाचे तेल लावून त्यांना बरे केले.
14. हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. कही लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ आहे.
15. इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे” तर काही जण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.
16. परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो मरणातून उठविला गेला आहे.”
17. कारण हेरोदाने स्वत: योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती. त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले. त्या कारणामुळे त्याने असे केले.
18. योहान हेरोदाला सांगत असे की, “तुझ्या भावाच्या पत्नीशी असे लग्न करणे तुला योग्य नाही.”
19. याकरिता हेरोदीयाने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्याला ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्याला मारु शकली नाही.
20. कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे.
21. मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली.
22. हेरोदीयाची मुलगी मेजवानीच्या ठिकाणी आली व तिने नाच केला आणि हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदीत केले.तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.”
23. तो गंभीरपणे शपथ वाहून म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मगशील ते मी तुला देईन.”
24. ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.”
25. आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणान्या याहानाच् शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.”
26. राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्याला तिला नकार द्यावा असे वाटले नाही.
27. तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठविले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले.
28. ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.
29. योहानाच्या शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते तेथे आले. त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
30. प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले.
31. नंतर येशू त्यांना म्हाणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.
32. तेव्हा ते सर्वजण नावेत बसून निर्जन ठिकाणी गेले.
33. परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व येशू तेथे येण्याअगोदरच ते तेथे पोहोंचले.
34. येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.
35. या वेळेलर्यंत बराच उशीर झाला होता आणि (दिवस मावळतीला आला होता) मग त्याचे शिष्य त्याच्याकडे आले व म्हणाले, “ही निर्जन जागा आहे व बराच उशीर झाला आहे.
36. लोकांना पाठवून द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.”
37. परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशी दीनारांच्याभाकरी विकत आणाव्या काय?”
38. तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा, की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
39. येशूने शिष्यांना सांगतले, “सर्व लोकांना गटागटाने हिरवळीवर बसायला सांगा.”
40. तेव्हा सर्व लोक गटागटाने बसले. प्रत्येक गटात पन्नास ते शंभर लोक होते.
41. येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने त्याचे वाटे केले. त्याने तेथे आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले. भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या. दोन मासेसुद्धा वाटून दिले.
42. मग ते सर्व जेवून तृप्त झाले.
43. त्यांनी भाकरीच्या व माशांच्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या भरल्या.
44. आणि जे पुरुष जेवले, त्यांची संख्या पाच हजार होती.
45. नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगतिले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले.
46. त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
47. संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता.
48. मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला.
49. जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले.
50. कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,”
51. नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.
52. कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती.
53. त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली.
54. ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले.
55. लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले.
56. खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे झाले.