1 प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा,2 आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नावही निघू नये, हे देवाच्या पवित्र लोकांसाठी योग्य नाही.4 तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. उलट उपकारस्तुति असावी.5 कारण तुम्हांला हे माहीत असावे की: जो मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा अधाशी जे मूर्तिपूजेसारखेच आहे, त्या मनुष्याला देवाच्या आणि ख्रिस्ताच्या राज्यात वतन असणार नाही.6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये. कारण या कारणांमुळे जे आज्ञा मोडतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे.7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका.8 मी हे सांगतो कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.9 कारण प्रकाशाची फळे प्रत्येक चांगुलपणात, नीतीमत्वात, आणि सत्यात दिसून येतात.10 नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा.11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्यांचे भागीदार होऊ नका. तर उलट, ती उघडकीस आणा.12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयी बोलणेही लज्जास्पद आहे.13 पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते.14 आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते, ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो: “हे झोपलेल्या जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल”.15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.16 जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत.17 म्हणून मूर्खासारखे वाग नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या.18 द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा,19 स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंत:करणात प्रभूसाठी गायन गा.20 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.21 ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा.22 पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा.23 कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. ख्रिस्त स्वत:च शरीराचा तारणारा आहे.24 पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.25 पतींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीति करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीति करा. त्याने तिच्यासाठी स्वत:ला दिले,26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे.27 यासाठी की, तो मंडळीला स्वत:साठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.28 याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नींवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वत:च्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वत:च्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वत:वर प्रेम करतो.29 कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो.30 कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.31 शास्त्र सांगते त्याप्रमाणे, “म्हणून मनुष्य त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील. आणि ते दोघे एकदेह होतील.”32 हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते.33 तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वत:च्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नी नेही पतीचा मान राखाला पाहिजे.