यहेज्केल धडा 24
1. मला परमेश्वराचा, माझ्या देवाचा, संदेश मिळाला. परागंदा काळातील नवव्या वर्षांच्या दहाव्या महिन्याच्या (डिसेंबरच्या) दहाव्या दिवशी हा संदेश आला तो म्हणाला,
2. “मानवपुत्रा, तू आजची तारीख व पुढील टीपण लिहून ठेव. ‘आज बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला.’
3. आणि ही गोष्ट आज्ञा पाळण्यास नकार देणाऱ्यांना (इस्राएलला) सांग त्यांना पुढील गोष्टी सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो.“‘भांडे चुलीवर ठेव. ते चुलीवर ठेवल्यावर त्यात पाणी ओता.
4. त्यात मासांचे तुकडे टाका. मांड्या आणि खांदे ह्याचा प्रत्येक चांगला तुकडा त्यात टाका. त्यात निवडक हाडे भरा.
5. ह्यासाठी कळपातील उत्तम जनावर निवडा. भांड्याखाली भरपूर लाकडे टाका आणि मांसाचे तुकडे शिजवा. हाडे शिजेपर्यंत रस्सा उकळवा.’
6. प्रभू, माझा परमेश्वर, असे म्हणतो. “यरुशलेमचे वाईट होईल. खुनी लोकांच्या नगरीला वाईट काळ येईल. यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे. ते गंजाचे डाग निघू शकत नाहीत. ते भांडे स्वच्छ नसल्याने, तुम्ही प्रत्येक मांसाचा तुकडा बाहेर काढा ते मांस खाऊ नका आणि त्या खाराब झालेल्या मांसातून काहीही याजकांना निवडू देऊ नका.
7. यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे. का? कारण खुनांचे रक्त अजून तेथे आहे. तिने रक्त उघड्या खडकावर पडू दिले. तिने ते जमिनीवर टाकून त्यावर माती टाकली नाही.
8. मग मीही तिचे रक्त उघड्या खडकावर टाकले. म्हणून ते झाकले गेले नाही निष्पाप लोकांना मारल्याबद्दल चिडून जाऊन लोकांनी तिला शिक्षा करावी, म्हणून मी असे केले.”
9. “परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो ‘खुन्यांनी भरलेल्या नगरीचे वाईटे होईल. मी आग भडकविण्यासाठी खूप लाकूडफाट्याचा ढीग रचीन.
10. खूप लाकडे भांड्याखाली सारा व पेटवा. मांस चांगले शिजवा. त्यात मसाले घाला हाडे जळू द्या.
11. मग रिकामेच भांडे विस्तवावर ठेवा. त्याच्या वरचे डाग चमकू लागेपर्यंत ते तापू द्या. ते डाग वितळून जातील. गंज नष्ट होईल.
12. “कदाचित् यरुशलेमने तिच्यावरील डाग घासून काढण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल. पण तो ‘गंज’ निघणार नाही. फक्त आगच (शिक्षा) तो काढील.
13. “तुम्ही माझ्याविरुध्द वागून पाप केले आणि पापांनी डागाळलात. तुम्हाला धुवुन स्वच्छ करण्याची माझी इच्छा होती. पण डाग निघाले नाही. माझा क्रोधाग्नी तुझ्याबाबतीत शांत होईपर्यंत मी तुला स्वच्छ करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही.
14. “मी परमेश्वर आहे. मी तुला सुनावलेली शिक्षा, तुला होईलच. मी तुला शिक्षा करायला कचरणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही. तू केलेल्या वाईट कृत्यांबद्दल मी तुला शिक्षा करीन.’ असे प्रभू, माझा परमेश्वर, म्हणाला.”
15. मग मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
16. “मानवपुत्रा, तू तुझ्या पत्नीवर खूप प्रेम करतोस, पण मी तिला तुझ्यापासून दूर नेत आहे. तुझी पत्नी अचानक मृत्यू पावेल. पण तू अजिबात शोक करु नकोस. तू मोठ्याने रडू नकोस. तू अश्रू गाळू नकोस.
17. पण तुझ्या दु:ख दाखविणाऱ्या खुणा तू मूकपणे केल्या पाहिजेस. मृत पत्नीसाठी मोठ्याने आक्रोश करु नकोस. तू नेहमी घालतोस, तेच कपडे तू घातले पाहिजेस. फेटा किंवा पागोटे बांध, जोडे घाल. तुझे दु:ख दाखविण्यासाठी मिशा झाकू नकोस. लोक साधारणपणे सुतकात पाठवितात, ते अन्न खाऊ नकोस.”
18. दुसऱ्या दिवशी सकाळी देवाचे म्हणणे मी लोकांना सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी, माझी पत्नी वारली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी देवाने सांगितल्याप्रमाणे केले.
19. मग लोकांनी मला विचारले, “तू असे का करीत आहेस? ह्याचा अर्थ काय?”
20. (20-21) मग मी त्यांना म्हणालो, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला. त्याने मला इस्राएलच्या लोकांशी बोलायला सांगितले आहे. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, ‘असे पाहा, मी माझ्या पवित्र स्थानाचा नाश करीन. तुम्हाला त्या स्थानाचा अभिमान वाटतो व तुम्ही त्याची स्तुतिस्तोत्रे गाता. तुम्हाला ते स्थान पाहायला फार आवडते. पण मी त्या स्थानाचा नाश करीन आणि तुम्ही मागे ठेवलेली तुमची मुले लढाईत मारली जातील.
21. 22. पण मी माझ्या पत्नीच्या मृत्यूच्या वेळी जसे वागलो, तसेच तुम्ही वागा. तुमचे दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मिशा झाकू नका. साधारणपणे सुतकात खातात, ते अन्न खाऊ नका.
23. पागोटी बांधा व जोडे घाला. तुमचे दु:ख बाहेर दाखवू नका. रडू नका. पण तुम्ही तुमच्या पापांमुळे झिजत जाल. तुम्ही मुकाट्याने एकमेकाजवळ उसासे टाकाल.
24. यहेज्केल, हे तुमच्यापुढे एक उदाहरण आहे. त्याने केले तेच तुम्ही कराल. शिक्षेची वेळ येईल. मगच तुम्हाला मी परमेश्वर आहे हे कळेल.”
25. (25-26) “मानवपुत्रा, ती सुरक्षित जागा (यरुशलेम) मी लोकांकडून काढून घेईन. ते सुंदर ठिकाण त्यांना आनंद देते. त्यांना ते ठिकाण पाहायला आवडते. त्यांना ते खरोखरच प्रिय आहे. पण त्या वेळी, मी लोकांकडून ती नगरी आणि त्यांची मुले काढून घेईन. वाचलेला एकजण यरुशलेमबद्दल वाईट बातमी घेऊन तुझ्याकडे येईल.
26. 27. त्या वेळी, तू त्या माणसाशी बोलू शकशील. तू अजिबात गप्प बसणार नाहीस. अशा रीतीने, तू त्यांना एक उदाहरण ठरशील मगच त्यांना मी देव आहे हे समजेल.”