1. शौलने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे.
2. [This verse may not be a part of this translation]
3. [This verse may not be a part of this translation]
4. योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे.
5. गल्याथ पलिष्ट्याचा वध करताना त्याने आपले प्राण पणाला लावले. परमेश्वराने इस्राएलला विजय मिळवून दिला. तुम्हालाही ते पाहून आनंद झाला. मग तुम्ही त्याला का दुखावता? तो निरपराध आहे. त्याला कशासाठी मारायचे?”
6. शौलने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.”
7. तेव्हा योनाथानने दावीदला बोलवून सर्व काही सांगितले. मग त्याला तो शौलकडे घेऊन गेला. पूर्वीप्रमाणेच तो त्याच्याकडे राहू लागला.
8. पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला.
9. पण शौलवर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता.
10. शौलने हातातील भाला फेकून दावीदला भिंतीत चिणायचा प्रयत्न केला. पण दावीद उडी मारुन निसटला. भाल्याचा नेम चुकून तो भिंतीत गेला. त्या रात्री दावीद पळून गेला.
11. शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली.
12. तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला.
13. मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.
14. दावीदला पकडून आणण्यासाठी शौलने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.
15. जासूद परतले. त्यांनी राजाला वर्तमान सांगितले. राजाने त्यांना दावीदला पाहून यायला फर्मावले. शौल म्हणाला, “त्याला माझ्यापुढे हजर करा. त्याला शक्य नसेल तर पलंगावर झोपवूनच आणा. मग मीच त्याला मारतो.”
16. जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
17. शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदला पळून जायला मदत केलीस.” मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”
18. दावीद जो पळाला तो रामा येथे शमुवेलकडे गेला. शमुवेलला त्याने शौलने जे जे केले ते सर्व सांगितले. मग शमुवेल आणि दावीद संदेष्ट्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. दावीद तेथे राहिला.
19. दावीद रामा नजीकच्या छावणीवर असल्याचे शौलला कळले.
20. त्याने दावीदाच्या अटकेसाठी माणसे पाठवली. पण ती माणसे तिथे पोहोंचली तेव्हा संदेष्टे संदेश देत होते. शमुवेल त्यांचे नेतृत्व करत उभा होता. शौलच्या निरोप्यांवर ही परमेश्वराच्या आत्म्याचा संचार होवून ते ही संदेश देऊ लागले.
21. शौलच्या हे कानावर आल्यावर त्याने दुसरे दूत पाठवले. त्यांचीही तीच गत झाली. तेव्हा शौलने तिसऱ्यांदा जासूद पाठवले. तेही तसेच करु लागले.
22. शेवटी शौल स्वत:च रामा येथे आला. सेखू येथील खळड्या जवळच्या मोठ्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुवेल आणि दावीदाचा ठावठिकाणा विचारला. लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तळावर आहेत.”
23. तेव्हा शौल तेथे पोचला. परमेश्वराच्या आत्म्याचा संचार शौलमध्येही होऊन तोही संदेश देऊ लागला. रामा येथे पोचेपर्यंत त्याचे तेच चालले होते.
24. नंतर त्याने अंगावरची वस्त्रे उतरवली. शमुवेलच्या समोर तो संदेश देऊ लागला. दिवसभर आणि रात्रभर तो विवस्त्र अवस्थेत होता म्हणून लोक म्हणू लागले, “शौलही संदेष्टयांपैकी आहे की काय?”