1. इस्राएलभर शमुवेलचे नाव झाले. एली आता फार वृध्द झाला होता. त्याच्या मुलांचे दुर्वर्तन चालूच होते. याच सुमारास सर्व पलिष्टी इस्राएल लोकांविरुध्द एकत्र आले. इस्राएल लोक त्यांच्याशी लढण्यास निघाले. त्यांचा तळ एबन एजर येथे तर पलिष्ट्यांचा अफेक येथे होता.
2. पलिष्टी इस्राएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले. पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले.
3. इस्राएली सैनिक आपल्या तळावर परतले तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ट्यांमार्फत आपला पराभव करवला? आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.”
4. मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.
5. सैन्याच्या तळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इस्राएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या जयघोषाने भूमीही दणाणली.
6. पलिष्ट्यांपर्यंत हा आवाज पोहोंचला तेव्हा इब्रींच्या छावणीत हा जल्लोष कसला म्हणून ते विचारात पडले.
7. परमेश्वराच्या पवित्र कराराचा कोश छावणीत आणला गेल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. ते म्हणू लागले, “त्यांच्या तळावर परमेश्वर आला आहे. आता आपले कसे होणार? असे यापूर्वी कधी झालेले नाही.
8. या शक्तिमान परमेश्वरापासून आता आपल्याला कोण वाचवील, याची धास्ती पडली आहे. मिसरच्या लोकांना नाना तऱ्हेच्या पीडांनी हैराण केले ते याच परमेश्वराने.
9. पण पलिष्ट्यांनो, धीर धरा. मर्दासारखे लढा. पूर्वी हेच इस्राएल लोक आपले गुलाम होते. तेव्हा शौर्य दाखवा, नाहीतर तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल.”
10. तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले.
11. पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला.
12. त्या दिवशी एक बन्यामीन माणूस युद्धातून धावत निघाला. दु:खाने तो कपडे फाडत होता. डोक्यात धूळ घालून घेत होता.
13. तो शिलो येथे पोहोंचला तेव्हा एली वेशीजवळ आपल्या आसनावर बसला होता. त्याला कराराच्या कोशाची काळजी वाटत होती म्हणून तो वाट पाहात होता. त्याचवेळी या बन्यामीनाने तेथे येऊन सर्व वृत्तांत सांगितला. लोक तो ऐकून आकांत करु लागले.
14. [This verse may not be a part of this translation]
15. [This verse may not be a part of this translation]
16. तो म्हणाला, “मी नुकताच तेथून आलो आहे मी आज युद्धातून पळून आलो आहे.” एलीने त्याला सर्व हकीकत सांगायला सांगितले.
17. तेव्हा तो म्हणाला, “इस्राएलींनी पळ काढला आहे. इस्राएली सैन्यातील अनेक सैनिक प्राणाला मुकले. तुमची दोन्ही मुले मेली आहेत. आणि परमेश्वराचा पवित्र करारकोश पलिष्ट्यांनी ताब्यात घेतला आहे.
18. करारकोशाचे वृत्त समजताच वेशीजवळ आसनावर बसलेला एली तिथेच मागच्यामागे पडला आणि त्याची मान मोडली. तो वृध्द आणि स्थूल झाला होता. तात्काळ त्याचा प्राण गेला. वीस वर्षे तो इस्राएलचा शास्ता होता.
19. एलीची सून, फिनहासची बायको त्यावेळी गरोदर होती. ती प्रसूत व्हायची वेळ येऊन ठेपली होती. कराराचा कोश पळवल्याचे तसेच सासरा व नवरा यांचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. ते ऐकताच त्या धक्कयाने तिला कळा येऊ लगल्या आणि ती प्रसूत झाली.
20. तिच्या मदतीला आलेल्या बायका म्हणाल्या, “आता काळजी करु नको तुला मुलगा झालाय,” पण तिने लक्ष दिले नाही की काही उत्तर दिले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, “इस्राएलचे वैभव मावळले.” तिने मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवले आणि ती गतप्राण झाली.
21. करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभाव) असे ठेवले.
22. पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र करार कोश हस्तगत केला म्हणून “इस्राएलचे वैभव गेले” असे ती म्हणाली.