1. सर्व इस्राएल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते.
2. तेव्हा इस्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहात आहात?”
3. परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुलेबाळे, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”
4. तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते मला ठार मारावयास उठले आहेत.”
5. परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडीलधारी म्हणजे पुढारी माणसे तुजबरोबर घे. नाईल नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती तू तुझ्याबरोबर घे.
6. होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल. मग लोकांनी ते प्यावे.” मोशेने हे सर्व केले आणि इस्राएल लोकांच्या वडिलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले.
7. मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते.
8. रफिदीम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
9. तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांना निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात धरून मी टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”
10. यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे,अहरोन व हूर हे टेकडीच्या माथ्यावर गेले.
11. जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा पिछेहाट होई.
12. काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. मोशे बरोबर असलेल्या लोकांना मोशेचे हात वर धरून ठेवण्यासाठी काही मार्ग शोधावयाचा होता. म्हणून त्यांनी मोशेला बसण्याकरिता मोठा दगड त्याच्या खाली ठेवला; नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर धरून ठेवले.
13. तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकांचा पराभव केला.
14. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयींच्या ह्या सर्व गोष्टी पुस्तकात लिहून ठेव म्हणजे येथे काय झाले त्याविषयी लोकांना आठवण राहील; आणि यहोशवाला सांग कारण मी अमालेकी लोकांना पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
15. मग मोशेने एक वेदी बांधली व तिला “परमेश्वर माझे निशाण.” असे नांव दिले.
16. आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासानावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यान्पिढ्या युध्द होईल.”