1. देव असे म्हणाला, “आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही. तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही. तुम्ही जागा देऊ शकणार नाही.
2. मी स्वत:च सर्व गोष्टी निर्माण केल्या. मी घडविल्या म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत.” परमेश्वर असे म्हणाला, “मला सांगा, मी कोणत्या लोकांची काळजी घेतो? मी गरीब आणि नम्र लोकांची काळजी घेतो. हे लोक फार दु:खी आहेत. माझ्या शब्दांचे पालन करणाऱ्या लोकांची मी काळजी घेतो.
3. काही लोक बैलांना मारून होमार्पण देतात, पण ते लोकांनाही चोपतात ते लोक होमार्पण अर्पण करण्यासाठी मेंढ्या मारतात पण ते कुत्र्यांच्याही माना मुरगळतात. ते डुकराचे रक्त मला अर्पण करतात. ते लोक आठवणीने धूप जाळतात, पण ते त्यांच्या शून्य किंमतीच्या मूर्तीवरही प्रेम करतात. ते लोक त्यांचे स्वत:चे मार्ग निवडतात. माझे मार्ग निवडत नाहीत. ते त्यांच्या भयानक मूर्तीवर प्रेम करतात.
4. म्हणून मी त्यांच्याच युक्त्या वापरायचे ठरविले आहे. ह्याचाच अर्थ ते ज्या गोष्टींना फार भितात, त्या वापरून मी त्यांना शिक्षा करीन. मी त्या लोकांना बोलाविले पण त्यांनी ऐकले नाही. मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांना ते ऐकू आले नाही म्हणून मी त्यांच्यासाठी तीच गोष्टी करीन. मी ज्यांना पापे म्हटले, त्या गोष्टी त्यांनी केल्या. मला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी निवडल्या.”
5. परमेश्वराच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकहो तुम्ही परमेश्वर ज्या गोष्टी सांगतो त्या ऐकाव्या. “तुमच्या भावांनी तुमचा तिरस्कार केला. ते तुमच्याविरूध्द गेले, कारण तुम्ही मला अनुसरलात. तुमचे भाऊ म्हणाले, ‘परमेश्वराचा सन्मान केला गेल्यावर आम्ही परत तुमच्याकडे येऊ. मग आम्हाला तुमच्याबरोबर राहण्यात आनंद होईल.’त्या वाईट लोकांना शिक्षा केली जाईल.”
6. ऐका! नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. त्यांना योग्य शिक्षा देव करीत आहे.
7. [This verse may not be a part of this translation]
8. [This verse may not be a part of this translation]
9. त्याचप्रमाणे मी सुध्दा नवीन निर्मिती होऊ न देता वेदना होऊ देणार नाही.” परमेश्वर पुढे म्हणतो, “जर मी तुम्हाला प्रसूतिवेदना दिल्या तर तुम्हाला नवीन राष्ट्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो.” तुमचा देव असे म्हणाला.
10. यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा! यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.
11. का? कारण आईच्या स्तनातून येणाऱ्या दुधासारखी दया तुम्हाला मिळेल, ते “दूध” तुम्हाला खरी तृप्ती देईल. तुम्ही ते दूध प्याल आणि तुम्ही यरूशलेमच्या वैभवाने खरोखरीच आनंदित व्हाल.
12. परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी तुम्हाला शांती देईन. मोठ्या नदीप्रमाणे ही शांती वाहत वाहत तुमच्याकडे येईल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल. पुराप्रमाणे हा संपत्तीचा ओघ येईल. तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल. मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन. मी तुम्हाला मांडीवर खेळवीन.
13. तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल. आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
14. खरोखरी आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि गवताप्रमाणे वाढाल. परमेश्वराचे सेवक त्याचे सामर्थ्य पाहतील आणि परमेश्वराचे शत्रू त्याचा राग अनुभवतील.
15. पाहा! परमेश्वर अग्नी घेऊन येत आहे. परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे. आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील. परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील.
16. परमेश्वर लोकांना न्याय देईल. मग तो लोकांना अग्नीने आणि त्याच्या तलवारीने नाश करील. परमेश्वर खूप लोकांचा नाश करील.
17. हे लोक त्यांच्या खास बागांमध्ये पूजा करण्यासाठी शुचिर्भूत व्हावे म्हणून स्नान करतात. ते एकमेकांच्या मागून खास बागांमध्ये जातात. मग ते मूर्तीची पूजा करतात. पण परमेश्वर त्या सर्व लोकांचा नाश करील. “ते लोक डुक्कर, उंदीर ह्यांचे मांस व इतर घाणेरडया गोष्टी खातात. पण ह्या सर्व लोकांचा एकत्रितपणे नाश केला जाईल.” (परमेश्वराने स्वत: ह्या गोष्टी सांगितल्या)
18. “ते लोक दुष्ट विचार करतात आणि पापे करतात म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी मी येत आहे मी सर्व राष्ट्रांना व सर्व लोकांना गोळा करीन. सर्व लोक एकत्र येऊन माझे सामर्थ्य पाहतील.
19. काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरूदरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील.
20. आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावा बहिणींना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमला, आणतील. तुमची ही भावंडे घोड्यांवरून गाढवांवरून, उंटांवरून, रथांतून आणि गाड्यांतून येतील. तुमची ही भावंडे म्हणजे जणू काही इस्राएलच्या लोकांनी निर्मळ तबकांतून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
21. ह्यातीलच काही लोकांना मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर हे सर्व म्हणाला.
22. “मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.
23. प्रत्येक पूजेच्या दिवशी, सर्व लोक माझी उपासना करण्यासाठी येतील. ते प्रत्येक शब्बाथला आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी येतील.
24. “ते लोक माझ्या पवित्र नगरात येतील. आणि ते जर नगराच्या बाहेर गेले तर त्यांना माझ्याविरूध्द गेलेल्या लोकांची मृत शरीरे दिसतील. त्या मृत शरीरांत कधी न मरणारे किडे पडतील कधी न विझणारा अग्नी त्या मृत शरीरांना जाळून टाकील.”