1. सिद्कीया त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती यिर्मयाची मुलगी होती. तिचे घराणे लिब्ना येथील होते.
2. यहोयाकिम राजाप्रमाणेच सिद्कीयाने दुष्कृत्ये केली. हे परमेश्वराला आवडले नाही.
3. परमेश्वराचा कोप ओढवून घेतल्याने यरुशलेम व यहूदामध्ये भयंकर गोष्टी घडल्या. शेवटी परमेश्वराने यरुशलेम व यहूदा येथील लोकांना आपल्या दृष्टीसमोरुन दूर केले. सिद्कीया बाबेलच्या राजाच्या विरोधात गेला.
4. म्हणून सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमवर चाल केली. त्याने आपले सर्वच्या सर्व सैन्य बरोबर घेतले. त्या सैन्याने यरुशलेमच्या बाहेर तळ ठोकला. मग यरुशलेमचा तट ओलांडून जाण्यासाठी त्यांनी तटाभोवती उतरंडी तयार केल्या.
5. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला.
6. सहाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी उपासमारीचा कहर झाला. नगरीतल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता.
7. सातव्या दिवशी, बाबेलचे सैन्य यरुशलेममध्ये घुसले. यरुशलेमचे सैनिक पळून गेले. त्यांनी रात्रीच्या वेळी नगर सोडले. दोन भिंतींच्या मधल्या दारातून ते पळून गेले. ते दार राजाच्या बागेजवळ होते. बाबेलच्या सैन्याने वेढा घातला असतानासुद्धा ते सैनिक वाळवंटाकडे पळाले.
8. पण बाबेलच्या सैन्याने सिद्कीया राजाचा पाठलाग केला. त्यांनी सिद्कीयास यरीहोच्या मैदानात गाठले. सिद्कीयाचे सर्व सैनिक पळून गेले.
9. बाबेलच्या सैन्याने सिद्कीयाला पकडले मग त्यांनी त्यास रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. रिब्ला शहर हमाथ देशात आहे. बाबेलच्या राजाने, रिब्ला येथे, सिद्कीया राजाला शिक्षा ठोठावली.
10. रिब्लामध्येच बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना मारले आणि सिद्कीयाला मुद्दाम ते पाहायला लावले. यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांनाही त्याने ठार केले.
11. मग बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले. मग त्याला बेड्या घालून बाबेलला नेले. तेथे त्याने सिद्कीयाला तुरुंगात टाकले. सिद्कीया मरेपर्यंत तुरुंगातच होता.
12. बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा, नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 19 व्या वर्षीच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरुशलेमला आला. नबूजरदान बाबेलमधील एक महत्वाचा अधिकारी होता.
13. नबूजरदानने परमेश्वराचे मंदिर जाळले. त्याने राजवाडा व यरुशलेममधील इतर घरेही जाळली. त्याने तेथील सर्व महत्वाच्या इमारती बेचिराख केल्या.
14. बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. त्या सैन्याचा सेनापती राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता.
15. सेनापती नबूजरदानने यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांना कैदी म्हणून नेले. बाबेलच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरुशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.
16. पण नबूजरदानने काही अगदी गरीब लोकांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
17. [This verse may not be a part of this translation]
18. [This verse may not be a part of this translation]
19. 9राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने कुंडे, विस्तव ठेवण्याची पात्रे, वाडगे, पात्रे, दीपदाने. तसराळी आणि अर्पण केलेली पेयार्पणे ठेवण्याचे प्याले अशा सर्व वस्तू नेल्या. थोडक्यात त्याने चांदी सोन्याच्या सर्व वस्तू नेल्या.
20. दोन खांब, घंगाळ, त्याखालील बारा बैल व सरकत्या बैठकी अतिशप जड होत्या. शलमोन राजाने त्या परमेश्वराच्या मंदिरासाठी बनविल्या होत्या. ह्या वस्तूंसाठी वापरलेल्या पितळाचे वजन करणे अशक्य होते.
21. प्रत्येक खांब 31 फूट उंच होता. त्याचा घेर 21 फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता.
22. पहिल्या खांबाचा पितळेचा कळस 8 फूट उंच होता. जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे कोरुन तो सुशोभित केलेला होता. दुसऱ्या खांबावरही डाळिंबे कोरलेली होती. तो पहिल्या खांबासारखाच होता.
23. खांबांच्या बाजूंवर 96 डाळिंबे कोरलेली होती. खांबाच्या भोवती असलेल्या जाळीकामावर सर्व मिळून 100 डाळिंबे होती.
24. राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सराया व सफन्या यांना कैद करुन नेले. सराया महायाजक होता, तर सफन्या दुय्यम महायाजक होता. तीन द्वारपालांनाही कैदी म्हणून नेले
25. राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सैनिकांवर नेमलेला अधिकारी, तोपर्यंत नगरात असलेले राजाचे सात सल्लागार, सैन्यात भरती होणाऱ्यांची नोंद ठेवणारा लेखनिक, आणि नगरात असलेले साठ सामान्य लोक यांना कैद केले.
26. [This verse may not be a part of this translation]
27. [This verse may not be a part of this translation]
28. आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केले नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023 यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.
29. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 18 व्या वर्षी 832 लोकांना यरुशलेममधून नेले.
30. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 23 व्या वर्षी नबूजरदानने 745 लोकांना कैद केले. तो राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. एकूण 4600 लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले.
31. यहूदाचा राजा यहोयाकीन हा 37 वर्षे बाबेलच्या तुरुंगात होता. त्याच्या तुरुंगवासाच्या 37 व्या वर्षी बाबेलचा राजा अवीलमरदोख ह्यास त्याची दया आली व त्याने त्याची मुक्तता केली. त्याच वर्षी अवील-मरदोख गादीवर बसला होता. त्याने 12व्या महिन्याच्या 25व्या दिवशी यहोयाकीमची सुटका केली.
32. अवील-मरदोख यहोयाकीमशी गोड बोलला. त्याच्याबरोबर बाबेलमध्ये असलेल्या इतर राजांहून त्याने यहोयाकीमला सन्मानाची जाग दिली.
33. म्हणून यहोयाकीनने कैद्याचा पोशाख उतरविला उरलेल्या आयुष्यात त्याने नेमाने राजाबरोबर भोजन केले.
34. यहोयाकीनच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवशी बाबेलचा राजा त्याला भत्ता देत असे.