1. परमेश्वर मोशेला म्हणाला,
2. “इस्राएल लोकांना सांग: मी परमेश्वर तुमचा देव आहे.
3. तुम्ही ज्या मिसर देशात राहात होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.”
4. तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी कसोशीने पाळा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे.
5. म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
6. “तुम्ही कधीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीरसंबंध करु नये! मी परमेश्वर आहे:
7. “तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवू नयेत. ती तुमची आई आहे. म्हणून तिच्याबरोबर शारीरिक संबंध असता कामा नये.
8. तू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज जाईल.
9. “तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो, तू तिच्यापाशी जाऊ नको.
10. “तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; त्यामुळे तुझीच लाज जाईल!
11. “जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
12. “तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
13. तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
14. तू तुझ्या चुलत्याची लाज उघडी करु नको, म्हणजे त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको; ती तुझी चुलती आहे.
15. “तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे.
16. “तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल.
17. “एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शारीरिक संबंध ठेवू नको. कारण त्या तिच्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अति दुष्टपणाचे आहे.
18. “तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करुन तिला सवत करुन घेऊ नको; त्यामुळे त्या एकमेकींच्या शत्रू होतील; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
19. “स्त्री ऋ तुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋ तुकालात ती अशुद्ध असते.
20. “तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. त्यामुळे तू अमंगळ होशील!
21. “तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे.
22. “स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
23. “कोणत्याही पशूशी गमन करु नको! त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील! त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे!
24. “असल्याप्रकारच्या पाप कर्मामुळे स्वत:ला अशुद्ध करुन घेऊ नका! कारण मी राष्ट्रांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून देत आहे, आणि तो देश मी तुम्हाला देत आहे! कारण तेथील लोकांनी असली भंयकर पापकर्में केली!
25. म्हणून त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे! आणि आता तो तेथील रहिवाशांना, ओकून बाहेर टाकीत आहे!
26. “ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; हे नियम इस्राएल लोकांकरिता आणि त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीय लोकांकरिताही आहेत; तुम्हांपैकी कोणीही असली भयंकर अमंगळ पापकर्मे करु नये.
27. कारण तुमच्या पूर्वी ह्या देशात राहाणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ पापकृत्ये केल्यामुळे हा देश अमंगळ झाला आहे.
28. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्ही हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.
29. जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ पापी कृत्य करतील त्या सर्वाना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
30. इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ पापकृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ पापकृत्ये करुन तुम्ही आपणाला अमंगळ करुन घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे.”