1. परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “त्या वेळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा देव असेन आणि ती सर्व माझी माणसे असतील.”
2. परमेश्वर म्हणतो: “काही लोक शत्रूकडून मारले गेले नव्हते. ते लोक वाळवंटात आश्रय घेतील. इस्राएल विश्रांतीच्या उपेक्षेने तेथे जाईल.”
3. खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल. परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठ मी कायमची सांभाळीन.
4. “इस्राएल, माझ्या वधू, मी तुझी पुन्हा निर्मिती करीन. तुझ्यातून देश निर्माण करीन. तू तुझी खंजिरी उचलशील आणि मौजमजा करणाऱ्या इतर लोकांबरोबर नृत्यात सामील होशील.
5. इस्राएलमधील शेतकऱ्यांनो, तुम्ही पुन्हा द्राक्षाच्या बागा लावाल. शोमरोन शहराच्या भोवतालच्या टेकडीवर तुम्ही द्राक्षवेलींची लागवड कराल. त्या द्राक्षमळ्यातील पिकांचा तुम्ही आस्वाद घ्याल.
6. अशी एक वेळ येईल की पहारेकरी ओरडून पुढील आदेश देतील. ‘या, आपण परमेश्वर देवाची उपासना करण्यासाठी वर सियोनला जाऊ या.’ एफ्राईम या डोंगराळ प्रदेशातील पहारेकरीसुद्धा ओरडून हा संदेश देतील.”
7. परमेश्वर म्हणतो, “आनंदित व्हा आणि याकोबासाठी गा. सर्व राष्ट्रांत अग्रेसर असलेल्या इस्राएलचा जयघोष करा. स्तुतिस्तोत्रे गा व ‘परमेश्वराने त्याच्या लोकांना वाचविलेअसे जाहीर करा. इस्राएलच्या जिवंत राहिलेल्या लोकांचे देवाने रक्षण केले.’
8. लक्षात ठेवा, मी त्या उत्तरेकडच्या देशातून इस्राएलला आणीन. जगातील दूरदूरच्या ठिकाणाहून मी इस्राएलच्या लोकांना एकत्र करीन. काही लोक आंधळे आणि पंगू असतील. काही बायका गर्भवती असतील आणि त्यांच्या प्रसूतींची वेळ आली असेल. पण खूप खूप लोक परत येतील.
9. ते लोक रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन व त्यांचे सांत्वन करीन. मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत. मी त्याना अशाच मार्गाने नेईन कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.
10. “राष्ट्रांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका! समुद्राकडील दूरच्या देशांत हा संदेश पोहोचवा. ‘देवाने इस्राएलच्या लोकांना पांगविले. पण देव त्यांना पुन्हा गोळा करील आणि तो आपल्या कळपावर (लोकांवर) मेंढपाळाप्रमाणे लक्ष ठेवील.’
11. परमेश्वर याकोबला परत आणील. परमेश्वराच्या लोकांपेक्षा बलवान असलेल्या लोकांपासून परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील.
12. इस्राएलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील आणि आनंदाने आरोळ्या ठोकतील. परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील. परमेश्वर त्यांना धान्य, ताजा द्राक्षरस, ताजे तेल, कोकरे आणि गाई देईल. भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल. इस्राएलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही.
13. मग इस्राएलमधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील. मी त्यांचे दु:खाचे सुखात रुपांतर करीन. मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन. मी त्यांच्या दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
14. मी याजकांना भरपूर अन्न देईन. मी दिलेल्या चांगल्याचुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
15. परमेश्वर म्हणतो, “रामामधून आवाज ऐकू येईल. तो भयंकर आकांत असेल खूप शोक असेल. राहेल आपल्या मुलांसाठी रडेल तिची मुले मेल्यामुळे ती कोणाकडूनही सांत्वन करुन घेणार नाही.”
16. पण परमेश्वर म्हणतो, “रडू नकोस! तुझे डोळे आसवांनी भरु नकोस तुझ्या कामाबद्दल तुला बक्षीस मिळेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “इस्राएलचे लोक त्यांच्या शत्रूंच्या देशातून परत येतील.
17. इस्राएल, तुला आशा आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “तुझी मुले त्यांच्या स्वत:च्या देशात परत येतील.
18. एफ्राईमला रडताना मी ऐकले आहे. एफ्राईमला मी पुढील गोष्टी बोलताना ऐकले आहे. ‘परमेश्वर तू खरोखरच मला शिक्षा केलीस आणि मी धडा शिकलो. मी बेबंद वासराप्रमाणे होतो. कृपा करुन मला शिक्षा करण्याचे थांबव. मी तुझ्याकडे परत येईन. तू खरोखरच, परमेश्वर, माझा देव आहेस.
19. परमेश्वरा, मी तुझ्यापासून भटकले होते. पण मी केलेली पापे मला कळली, म्हणून मी माझे मन आणि जीवन बदलले. मी तरुण असताना केलेल्या मूर्खपणाच्या गोष्टींची मला लाज वाटते. त्यामुळे मला ओशाळे वाटते.”
20. देव म्हणतो, “एफ्राईम माझा लाडका मुलगा आहे, हे तुम्हांला माहीतच आहे मी त्याच्यावर प्रेम करतो. हो! मी नेहमीच एफ्राईमवर टीका केली. पण तरीही मला त्याची आठवण येते. तो मला अतिशय प्रिय आहे आणि मी खरोखरच त्यांच्यावर दया करतो.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
21. “इस्राएलच्या लोकानो, रस्त्यांवर खुणांचे फलक लावा. घराकडे जाणाऱ्या वाटेवर खूण करा. वाटेवर लक्ष ठेवा. तुम्ही ज्या रस्त्यावरुन जात आहात. त्याचे स्मरण ठेवा. इस्राएल माझ्या पत्नी, घरी ये. तुझ्या गावांना परत ये.
22. तू विश्वासघातकी मुलगी होतीस. पण तू बदलशील. तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?” “परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे. स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.“
23. “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांसाठी मी पुन्हा चांगल्या गोष्टी करीन. कैदी म्हणून नेलेल्या लोकांना परत आणीन. त्या वेळी, यहूदाच्या शहरांत व गावांत राहणारे सर्व लोक म्हणतील, ‘सदगृह, पवित्र पर्वतावर, परमेश्वर तुझे कल्याण करो!“
24. “यहूदातील सर्व गावांतील लोक एकत्र येतील व तेथे शांतता नांदेल. यहुदामधील शेतकरी आणि (मेंढ्यांचे) कळप घेऊन फिरणारे सर्वजण शांतीने राहतील.
25. दुबळ्या आणि थकलेल्या लोकांना मी आराम आणि शक्ती देईन. मी दु:खितांच्या इच्छा पुऱ्या करीन.”
26. हे ऐकल्यानंतर, मी (यिर्मया) उठलो, आणि आजूबाजूला पाहिले. ती खरोखरच फार सुखद निद्रा होती.
27. “असे दिवस येतील,” हा परमेश्वराचा संदेश आहे. “की तेव्हा मी यहूदाच्या व इस्राएलच्या घराण्यांची वृद्धी होण्यास मदत करीन. मी त्यांच्या मुलांची व गुराढोरांचीही वृद्धी होण्यास मदत करीन. हे सर्व जणू काही झाडे लावून त्याची निगा राखण्यासारखे असेल.
28. पूर्वी मी यहूदा आणि इस्राएल यांच्यावर लक्ष ठेवले. व त्यांना उपटून काढण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली मी त्यांना फाडून काढले. मी त्यांचा नाश केला. मी त्यांच्यावर खूप संकटे आणली. पण आता, त्यांनी पुन्हा उभे राहावे व सामर्थ्यवान व्हावे म्हणून लक्ष ठेवीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
29. “आई-वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली,पण त्याची चव मात्र मुलांना चाखावी लागली.ही म्हण लोक पुन्हा कधीही वापरणार नाहीत.
30. प्रत्येकजण आपल्या पापाने मरेल. जो आंबट द्राक्षे खाईल, तोच त्याची चव चाखील.”
31. परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “मी इस्राएलच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करण्याची वेळ येत आहे.
32. मी त्यांच्या पूर्वजांशी केलेल्या कराराप्रमाणे तो असणार नाही. जेव्हा मी त्यांना हाताला धरुन मिसरच्या बाहेर आणले होते, तेव्हा तो करार केला होता. तेव्हा मी त्यांचा स्वामी होतो. पण त्यांनी त्या कराराचा भंग केला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
33. “भविष्यात, मी इस्राएलच्या लोकांबरोबर पुढीलप्रमाणे करार करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी माझी शिकवण त्यांच्या मनावर बिंबवीन आणि त्यांच्या हृदयावर कोरीन. मी त्यांचा देव असेन व ते माझे लोक असतील.
34. लोकांना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना परमेश्वराची ओळख करुन द्यावी लागणार नाही. का? कारण सर्वजण, लहानापासून थोरापर्यंत राजापासून रंकापर्यंत, मला ओळखत असतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन. मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”
35. परमेश्वर म्हणतो, “परमेश्वर दिवसा सूर्याला प्रकाशित करतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशित करतो. परमेश्वर समुद्र घुसळतो म्हणून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात. सर्वशक्तिमान परमेश्वर असे त्याला म्हणतात.”
36. परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे वंशज कधीही राष्ट्र बनल्याखेरीज राहणार नाहीत. सूर्य, चंद्र, तारे व समुद्र ह्यांच्यावरील माझे नियंत्रण ढळले, तरच असे होणे शक्य आहे.”
37. परमेश्वरा म्हणतो, “मी इस्राएलच्या वंशजांना कधीही नाकारणार नाही. लोक जर आकाशाचे मोजमाप करु शकले किवा पृथ्वीच्या पोटातील सर्व रहस्ये जाणू शकले, तरच हे घडणे शक्य आहे. तरच मी इस्राएलच्या वंशजाना नाकारीन. त्यानी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मगच मी त्यांना दूर करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
38. “असे दिवस येत आहेत की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे परमेश्वरासाठी यरुशलेम नगरी पुन्हा उभारली जाईल. हानानेलच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या दारापर्यंत सगळी नगरी पुन्हा उभारली जाईल.
39. ओळंबा कोपऱ्याच्या दारापासून थेट गारेबच्या टेकडीपर्यंत जाईल आणि तेथून गवाथकडे वळेल.
40. ज्या दरीत प्रेते व राख टाकली जाते, ती परमेश्वराला पवित्र वाटेल. ह्यात पूर्वेकडच्या किद्रोन दरीपासून घोडे दाराच्या कोपऱ्यापर्यंतच्या पठाराचा समावेश असेल. हा सर्व प्रदेश परमेश्वराला पवित्र वाटेल. यरुशलेमचा पुन्हा कधीही विध्वंस केला जाणार नाही वा तिचा नाश होणार नाही.”