1. परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या मी एक उन्हाळी फळांची टोपली पाहिली.
2. परमेश्वराने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे. ह्यापुढे मी त्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करणार नाही.
3. मंदिरातील गाण्याचे रूपांतर विलापिकेत होईल. परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील. लोक गुपचूप, प्रेते उचलतील आणि ढिगावर फेकतील.”
4. माझे ऐका! तुम्ही असहाय्य लोकांना तुडविता ह्या देशातील गरिबांचा नाश करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात.
5. तुम्ही, व्यापारीलोक म्हणता “प्रतिपदा केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू शकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हाला गहू विकता येईल? आम्ही किंमत वाढवू शकतो आणि माप लहान करू शकतो तराजू आपल्या सोयीचे करून आपण लोकांना फसवू शकतो.
6. गरीब कर्ज फेडू शकत नाहीत, तेव्हा आपण त्यांना गुलाम म्हणून विकत घेऊ. एका जोड्याच्या किंमतीत आपण त्या असहाय्य लोकांना विकत घेऊ. हो! आणि जमिनीवर सांडलेले गहू आपण विकू शकू.”
7. परमेश्वराने वचन दिले आहे त्याने त्याच्या नावाची, याकोबच्या अभिमानाची शपथ घेऊन वचन दिले. “त्या लोकांनी केलेली कृत्ये मी कधीही विसरणार नाही.
8. त्या कृत्यांमुळे सर्व भूमी हादरेल. ह्या देशात राहणारा प्रत्येकजण मृतासाठी रडेल. मिसरमधील नील नदीप्रमाणे, संपूर्ण देश वर फेकला जाऊन खाली आदळेल. देश हेलकावे खाईल.”
9. परमेश्वराने पुढील गोष्टीही सांगितल्या “त्या वेळी, मी सूर्याचा दुपारीच अस्त करीन. स्वच्छ निरभ्र दिवशी, मी जगावर अंधार पसरवीन.
10. मी तुमचे उत्सव शोकदिनांत बदलीन. तुमची सर्व गाणी ही मृतांसाठीची शोकागीते होतील. मी प्रत्येकाला शोकप्रदर्शक कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”
11. परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात उपासमार आणीन. ते दिवस येतच आहेत लोकांना भाकरीची भूक नसेल. ते पाण्यासाठी तहानेले नसतील परमेश्वराच्या वचनांचे ते भूकेले असतील.
12. लोक मृतसमुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.
13. (13-14) त्या वेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील. शोमरोनच्या पापाच्याजोरावर त्यांनी वचने दिली. ते म्हणाले, ‘दान, तुझा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वकआम्ही वचन देतो....’ आणि ते म्हणाले, ‘जितका बैर-शेबा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वक आम्ही वचन देतो....’ हे लोक पडतील, आणि ते परत कधीही उठणार नहीत.”
14.