1. {सभेत अप्रशस्त वर्तन} [PS] मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
2. मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता.
3. परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे
4. प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो.
5. परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.
6. जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे.
7. ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.
8. पुरूष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
9. आणि पुरूष स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
10. ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.
11. तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
12. कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
13. हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
14. पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय?
15. परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत.
16. जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही. [PS]
17. {प्रभूभोजनाचे भ्रष्टीकरण} [PS] पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते.
18. प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो.
19. यासाठी की, जे तुमच्यामध्ये स्वीकृत आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
20. म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन घेत नाही.
21. कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हातील प्रत्येकजण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा अतीतृप्त झालेला असतो.
22. खाण्यापिण्यासाठी तुम्हास घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजवता? मी तुम्हास काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करत नाही. मत्त. 26:26-29; मार्क 14:22-25; लूक 22:14-23 [PE][PS]
23. {प्रभू भोज} [PS] कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,
24. आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
25. त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
26. कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
27. म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.
28. म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
29. कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो.
30. याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत.
31. परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
32. परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये.
33. म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
34. जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही दंड मिळण्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करून देईन. [PE]