1. {#1शमुवेलाचा जन्म } [PS]एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम या नगरामधील एक पुरुष होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता.
2. त्यास दोन स्त्रिया होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती.
3. तो पुरुष आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास देवाचे याजक होते.
4. यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे.
5. परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती.
6. परमेश्वराने तिची कुस बंद केल्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे.
7. ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे.
8. तेव्हा तिचा पती एलकाना तिला नेहमी म्हणत असे, “हन्ना तू कां रडतेस? तू का खात नाहीस? आणि तुझे मन का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?”
9. मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.
10. तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली.
11. ती नवस करून म्हणाली, “हे सैन्याच्या परमेश्वरा जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्यास त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वरास देऊन टाकीन आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.”
12. आणि असे झाले की ती परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे पाहिले.
13. हन्ना तर आपल्या मनात बोलत होती. तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती मद्य पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले.
14. तेव्हा एली तिला म्हणाला, “किती वेळ तू मद्याच्या नशेत मस्त राहशील? तू मद्याचा अंमल आपल्यापासून दूर कर.”
15. तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली, “असे नाही, माझ्या स्वामी, मी दु:खीत आत्म्याची स्त्री आहे. द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतत आहे.”
16. “आपली दासी दुष्ट स्त्री आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या यातना व क्लेश यांमुळे आतापर्यंत बोलले आहे.”
17. मग एली उत्तर देत म्हणाला, “शांतीने जा; इस्राएलाचा देव याच्याजवळ जे मागणे तू मागितले आहेस ते तो तुला देवो.”
18. ती बोलली, “आपल्या दासीवर तुमची कृपादृष्टी होऊ द्या.” मग ती स्त्री निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने अन्न सेवन केले व पुढे तिचे तोंड उदास राहिले नाही.
19. आणि सकाळी त्यांनी उठून परमेश्वराची उपासना केली; मग ते निघून रामा येथे आपल्या घरी परतले. आणि एलकानाने आपली पत्नी हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली.
20. नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्यास परमेश्वरापासून मागून घेतले.
21. पुन्हा एकदा तो पुरुष एलकाना, आपल्या सर्व कुटुंबासहीत परमेश्वरास वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला.
22. परंतु हन्ना वर गेली नाही; ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, “मुलाचे दूध तोडीपर्यंत मी वर जाणार नाही; त्यानंतर मग मी त्यास नेईन, जेणेकरून तो परमेश्वरापुढे हजर होईल व तो तेथे कायम वस्ती करील.”
23. तेव्हा तिचा पती एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो.” मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्यास स्तनपान दिले.
24. आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्यास शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल अजून लहानच होते.
25. मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले.
26. आणि ती म्हणाली, “हे माझ्या प्रभू! आपला जीव जिवंत आहे; माझ्या प्रभू, जी स्त्री परमेश्वराची प्रार्थना करीत येथे तुमच्याजवळ उभी राहिली होती, ती मीच आहे.
27. या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.
28. मी तो परमेश्वरास दिला आहे; तो जगेल तोपर्यंत तो परमेश्वरास समर्पित केलेला आहे.” तेव्हा तेथे एलकाना व त्यांच्या कुटुंबाने परमेश्वराची उपासना केली. [PE]