1. {#1प्रजेपुढे शमुवेलाचे भाषण } [PS]शमुवेल सर्व इस्राएलास म्हणाला, “पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येक गोष्ट ऐकून मी तुम्हावर एक राजा नेमला आहे.
2. तर आता पाहा, राजा तुम्हापुढे चालत आहे, आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे; पाहा, माझे पुत्र तुम्हाजवळ आहेत. व मी आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत तुम्हापुढे चाललो आहे.
3. मी हा येथे आहे; परमेश्वरासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरूद्ध साक्ष द्या, म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”
4. ते म्हणाले, “तुम्ही आम्हास फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, किंवा कोणा मनुष्याच्या हातून काही चोरले नाही.”
5. मग तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे.” ते म्हणाले, “परमेश्वर साक्षी आहे.”
6. शमुवेल लोकांस म्हणाला, “ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले, आणि ज्याने तुमच्या वडिलांना मिसर देशातून काढून वर आणले तो तर परमेश्वरच आहे.
7. तर आता, स्थिर उभे राहा, म्हणजे परमेश्वराने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हासाठी व तुमच्या वडिलांसाठी केली त्याविषयी मी परमेश्वरासमोर विनंती करतो.
8. याकोब मिसरात गेल्यावर, तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराकडे आरोळी केली. तेव्हा परमेश्वराने मोशेला व अहरोनाला पाठवले, त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले.
9. पण परमेश्वर त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा त्याने हासोराचा सेनापती सीसरा याच्या हाती, व पलिष्ट्यांच्या हाती, व मवाबाचा राजा याच्या हाती, त्यांना विकले आणि ते त्यांच्याशी लढले.
10. तेव्हा ते परमेश्वरास हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण आम्ही परमेश्वरास सोडून बआल आणि अष्टारोथ या मुर्तींची सेवा केली आहे. परंतु आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.
11. मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.
12. परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हावर आला असे तुम्ही पाहिले, तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा होता तरी, तुम्ही मला म्हणालात की, असे नको तर आम्हावर राजा राज्य करो.
13. तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले, तो हा पाहा; पाहा परमेश्वराने तुम्हावर राजा नेमला आहे.
14. जर तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची सेवा कराल, त्याची वाणी ऐकाल, आणि परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करणार नाही, तर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाही परमेश्वर तुमचा देव याला मानीत जाल तर बरे.
15. परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरूद्ध बंड कराल, तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांविरूद्ध होता, तसा तो तुमच्याविरुध्द होईल.
16. तर आता तुम्ही स्वतःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.
17. आज गव्हाची कापणी आहे की नाही? परमेश्वरास मी हाक मारीन, अशासाठी की, त्याने मेघांच्या गडगडाटसह पाऊस पाठवावा. मग तुम्ही जाणाल व पाहाल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने किती मोठे दुष्टपण केले.”
18. तेव्हा शमुवेलाने परमेश्वरास हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला. म्हणून सर्व लोकांस परमेश्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.
19. तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले, “आम्ही मरू नये म्हणून, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी या दुष्कर्माची भर टाकली आहे.”
20. मग शमुवेल लोकांस म्हणाला, “भिऊ नका. तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करा.
21. तुम्ही भलत्या गोष्टींकडे वळू नका कारण जे लाभदायक नाहीत व ज्यांच्याने तुमचे रक्षण करवत नाही कारण त्या निरोपयोगी आहेत.
22. कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले.
23. मी तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी परमेश्वराच्या विरूद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच राहो. चांगला व सरळ मार्ग मी तुम्हास शिकवीन.
24. केवळ परमेश्वराचे भय धरा आणि खरेपणाने वागून आपल्या संपूर्ण मनाने तुम्ही त्याची सेवा करा. कारण त्याने तुम्हासाठी केवढी महान कृत्ये केली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.
25. परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.” [PE]